मुरली खैरनार- एक तेजस्वी ‘शोध’प्रवास



मुरली खैरनार गेले.  
एका शोधप्रवासाची अखेर झाली. मराठी साहित्यविश्वाला एका चौफेर व्यासंगी अवलिया लेखकाचा शोध लागता लागताच हा कलंदर शोधयात्री दिगंतरापल्याडच्या शोधयात्रेला गेला. हे काही बरं झालं नाही. अजिबातच बरं झालं नाही.

चव्हाटा' या फेसबुक समूहावर आमची मैत्री झाली. अनेकदा वेळा संवाद झाला. काहीवेळा वादही झाले. त्यांचा अभ्यास आणि आमचा आडमुठेपणा अशी जुगलबंदीही काही वेळा झाली. प्रत्येक वेळी लक्षात आलं की हे रसायन काही वेगळंच आहे. क्षुल्लक वादावादीवरून इतरांना धारेवर धरणारे, अन्फ्रेंड किंवा ब्लॉक करणारे अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ प्रतिभावंत फेसबुकवर वावरत असतात. त्या पार्श्वभूमीवर यांचे उमदेपण अधिक ठसठशीतपणे जाणवत असे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय असो; की क्षुद्र स्वार्थासाठी आपापल्या सोयीच्या इतिहासाचे वर्तमानात माजवले जाणारे स्तोम असो; कुठल्याही विषयावर त्यांची स्वत:ची अशी एक खास मांडणी असायची. ती खोडून काढणे हे 'महाकठीण कर्म' वाटावे इतकी ती मांडणी पक्की असायची. त्यांच्या लेखनाचा, आकलनाचा आणि चिंतनाचा प्रचंड आवाका लक्षात आल्यावर मी त्यांच्या पोस्ट्स वाचण्याकडे अधिक गंभीरपणे पाहू लागलो. कुठल्याही चर्चेत त्यांचा तोल ढळला नाही. कुणाच्या विसंगत शेरेबाजीने विचलित झाले नाहीत किंवा त्यांनी कधी कुणाबद्दल आकस बाळगला आहे असंही कधी जाणवलं नाही. अभ्याससिद्ध अशी स्वत:ची पक्की मते बाळगणारे ते कुणाच्या अज्ञानाला हिणवून हसल्याचे कधी दिसले नाही. अत्यंत उमदा, अत्यंत अभ्यासू आणि ठोस मांडणी करतानाही अत्यंत लवचिक दृष्टिकोन असा त्यांचा एकुणात वावर असे. एका संध्याकाळी त्यांचा मेसेज आला की, "उद्या अंबाजोगाईत येतोय. भेटूयात." दुस-या सकाळी अगदी सूर्योदयाच्या सुमारास आद्यकवी मुकुंदराजांच्या समाधीस्थळी आम्ही भेटलो. तिथल्या डोंगरदरीतून इकडेतिकडे हिंडलो. नंतर गावात येऊन त्यांचे जुने मित्र असलेल्या अमर हबीब यांच्या घरी गेलो. मग त्यांचं 'शोध'चं लेखन आणि त्यासाठीचा त्यांचा अभ्यास, प्रवास, निरीक्षणं, नोंदी या गोष्टींवर गप्पा झाल्या. या भेटीतही या माणसाच्या अभ्यासातलं पक्केपण आणि स्वभावातली ऋजुता पुन:पुन्हा जाणवत राहिली. 

नंतर अधूनमधून फोनवरून, मेसेजेसमधून आम्ही बोलत राहिलो. पण त्यात फारसं सातत्य नव्हतं. ‘शोध’च्या संदर्भात केलेल्या डायरीच्या स्वरूपातल्या नोंदी ते नेमाने पोस्ट करत असत. लेखनप्रक्रियेविषयीचे त्यांचे विचार, त्यातल्या अडचणी, त्यातून काढलेले मार्ग या संदर्भातल्या या नोंदी असत. त्या नोंदींच्या माध्यमातून मी त्यांना वाचत मात्र राहिलो. अनेकदा अवाक् होत राहिलो. एका लेखकाने आपल्या कादंबरीसाठी एवढा प्रवास, अभ्यास, चिंतन, परिशीलन, चर्चा करणं, (स्वत: कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीने ग्रासलेलं असताना, त्याचा कुठेही उल्लेख न करता, त्यातून होणा-या मृत्यूदर्शनाचे विक्राळ ओझे सहजी झुगारून देऊन) त्यासाठी अफाट असे कष्ट उपसणं हा प्रकार निदान मराठीत यापूर्वी क्वचितच घडलेला असेल. लेखकाने आपल्या लेखनप्रक्रियेबद्दल लिहून ठेवणे आणि त्या नोंदी सर्वांसाठी खुल्या ठेवणे ही गोष्ट आपल्याकडे फारशी झालेली नाही. सामान्यपणे लेखक आपल्या साहित्यकृतीबद्दल बोलताना दिसतात. ती कृती घडताना आपल्या स्वत:मध्ये काय प्रकारचे मंथन घडले, कुठल्या प्रोसेसमधून जावे लागले यासारख्या गोष्टींबद्दल बोलताना-लिहिताना कुणी दिसत नाहीत. मुरली खैरनारांनी यासंदर्भात केलेल्या नोंदींचे एक स्वतंत्र पुस्तक यावे, एवढ्या त्या नोंदी महत्वाच्या आहेत.

यथावकाश 'शोध' प्रसिद्ध झाली. मराठीतली पहिली अस्सल थरारकथा असा तिचा लौकिकही झाला. मला अर्थातच अंबाजोगाईमध्ये ही प्रत मिळाली नाही. कधीतरी पुण्याला गेल्यावर ती विकत घेऊ असं मनाशी म्हणत होतो. पण पुण्याला जाणं या ना त्या कारणाने लांबणीवर पडत गेलं. त्यानंतर ही कादंबरी वाचण्याचा योग आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आला. मित्रवर्य महेंद्र  मुंजाळ यांनी कादंबरीची प्रत पाठवली आणि यावर काही लिही असे सुचवले. दोन-तीन रात्रींत झपाटल्यासारखी मी ती वाचत होतो. ही कादंबरी लिहिण्यासाठी केवढा अभ्यास केला आहे, केवढे परिश्रम घेतले आहेत याची साक्ष 'शोध'च्या पानापानांतून प्रत्ययाला येते. काय नाही या कादंबरीत? ऐतिहासिक सत्य आणि समकालीन कल्पिताची अत्यंत अद्भुत अशी सरमिसळ इथे वाचायला मिळते. यात शिवकालीन इतिहासाचे आजवर अज्ञात असलेले पदर आहेत, नाशिकच्या परिसरातल्या भूगोलाचे अत्यंत सूक्ष्म बारकावे आहेत, Laptop पासून जीपीएसपर्यंत, हेलीकॉप्टर ते थेट ड्रोन विमानांपर्यंत अनेक प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची, उपकरणांची, त्यांच्या वापराची अत्यंत अभ्याससिद्ध अशी उदाहरणे आहेत, थरारक पाठलाग आहे, पंचवीस लाख कोटींच्या शिवकालीन खजिन्याच्या शोधार्थ आजच्या लोकांनी थंडपणे केलेल्या हत्या आहेत, डोंगर भागातल्या आदिवासींचं जगणं, त्यातल्या (कदाचित आजवर अंधारातच राहिलेल्या) प्रथा-परंपरा-देव-देवस्की यांचं विलक्षण दर्शन आहे, राजकीय-पोलिसी यंत्रणांचे आणि जबरदस्त ताकद बाळगून असलेल्या उद्योगसमूहांचे लालसांनी बरबटलेले अमानुष चेहरे आहेत. वाचकाला विस्मयचकित करून सोडणारं आणखीही बरंच काही आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्याकडून एक लाख रुपयांची अभ्यासवृत्ती लाभलेल्या आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कादंबरीच्या निमित्ताने ऐतिहासिक घटना आणि समकालातले काही काल्पनिक पदर यांचा अत्यंत रोचक पद्धतीने विणलेला असा गोफ अगदी पहिल्यांदाच मराठी वाचकांच्या समोर आला आहे. कादंबरीची सुरुवात होते ती उपोद्घाताने. शिवाजी महाराजांनी सुरत या शहराची एकूण दोन वेळा लूट केली. पैकी इ. स. १७६० मध्ये दुस-याच्या लुटीच्या वेळी सुरतेतून मिळवलेली अपरंपार संपत्ती दोन भागांत विभागून त्यातला एक भाग स्वराज्यात घेऊन येणा-या गोंदाजी नारो या मराठा सरदाराला मुघलांनी गाठले. निसटण्याचा कोणताही मार्ग उरलेला नसलेल्या गोंदाजीने सात हजार जनावरांवर लादलेला, तब्बल अकराशे टन एवढ्या वजनाचा, बघणा-याची छाती दडपून टाकेल इतका संपन्न असा हा खजिना नाशिकजवळ सप्तशृंगीच्या परिसरात कुठेतरी दुर्गम जागी लपवून ठेवला. नंतर झालेल्या लढाईत गोंदाजीचे बहुतेक सगळे सैन्य मारले गेले. जखमी अवस्थेतल्या गोंदाजीला जिवंतपणे कैद केले गेले. या संपत्तीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी मुघलांनी त्याचा प्रचंड छळ केला पण गोंदाजीने तोंड उघडले नाही. कैदेत असताना सोबत असणा-या आणि लवकरच सुटून जाणा-या एका इंग्रज कैद्याजवळ गोंदाजीने एक सांकेतिक नकाशा तयार करून दिला आणि तो शिवाजी महाराजांकडे पोहचवायला सांगितले. पण हा कैदी सुटून गेल्यावर त्याला तातडीने इंग्लंडला जावे लागले. नंतर गोंदाजीही कैदेतच मरून गेला. तो नकाशा शिवाजी महाराजांपर्यंत कधीच पोहचला नाही. त्या नकाशाचं काय पुढे झालं, ती अपरंपार संपत्ती नेमकी कुठे लपवली आहे, याचा शोध; आणि हा शोध घेणारी आजची माणसे, त्यांच्यातला निर्मम संघर्ष, त्या संघर्षातला थरार या गोष्टी केवळ वाचूनच अनुभवता येण्यासारख्या आहेत. सबंध कथानक इथे सांगण्याचे कारण नाही, पण या इतिहासात घेऊन जाणा-या उपोद्घाताची पाठपोट दोन पाने संपल्यानंतर कादंबरी थेट तीनशे सत्तेचाळीस वर्षांचा प्रदीर्घ काळ ओलांडून वर्तमानात (खरंतर भविष्यात) ३० नोव्हेंबर २०१७ या दिवसाला भिडते आणि वाचकाला खिळवून ठेवणा-या एका अत्यंत वेगवान घटनाचक्राची सुरुवात होते. ३० नोव्हेंबरला चालू झालेले हे चक्र 4 डिसेंबर २०१७ या दिवशी स्थिरावते. एक रोमांचक ‘शोध’ संपलेला असतो. अवघ्या पाच दिवसांचा हा शोध एकूण चारशे सत्त्याण्णव पानांवर ‘मांडत’ असताना त्यातले कंगोरे, त्यातली अमानुषता, विलक्षण तणावातल्या माणसांच्या भाव-भावनांचे अद्भुत ताणेबाणे, त्यांची निर्दय तटस्थता, लक्ष्य गाठण्याप्रतिची अविचल निष्ठा, उत्स्फूर्तपणे उसळून येणारे प्रेम आणि तरीही बाळगावा लागणारा सावधपणा, थंड डोक्याने घडवल्या जाणा-या हत्या, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नातलं हिंस्त्रपण अशा अनेकानेक पैलूंनी घडलेली शोध; हा वाचकाला त्या अवकाशात पुरता गुंगुवून टाकणारा एक अप्रतिम वाचनानुभव आहे. पिढ्यानपिढ्या या संपत्तीचा शोध घेणारा ‘खोजनार’ समाज, खजिन्याच्या शोधार्थ आज अवाढव्य शक्ती लावलेला ‘स्कायलार्क’ हा प्रचंड मोठा उद्योगसमूह, शौनक, केतकी, आबाजी, विक्रांत देशमुख, जयंत, धवल, राकेश, नीरज ही यातली परस्परविरोधी गटांतली माणसे, त्यांचे साथीदार, यांच्या किंवा त्यांच्या बाजूने काम करणारी लालची पोलीस यंत्रणा, नाशिकमधले गुंतागुंतीचे गल्ली-बोळ आणि सप्तशृंगीच्या सात डोंगरांची माळ, तिथले गड-किल्ले, द-या, साडेतीन-चार हजार फुटांवर हवेत अधांतरी स्थिर केलेले हेलीकॉप्टर, चॉपर्स, जमिनीच्या गर्भाचे वेध घेणारे अत्याधुनिक सेन्सर्स, कधी तीस फुट खोल डोहात तर कधी हजारो फुट उंचीवरच्या दुर्गम डोंगराच्या कपारीत जाऊन शोध घेणं असल्या अनेक कल्पनातीत प्रसंगांची मालिका ! ‘ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाऊनेबल’ अशा सार्थ शब्दांत लेखक-समीक्षक संजय भास्कर जोशींनी वर्णन केलेली ‘शोध’ हा निर्विवादपणे चक्रावून टाकणारा एक विशाल पट आहे.

शिवकालातील अस्सल संदर्भ आणि वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती यांच्या पार्श्वभूमीवर श्वास रोखून धरायला भाग पाडणारा हा पट उभा ठाकतो तेव्हा त्यातल्या विलक्षण चित्रदर्शी अशा नाट्याने वाचक स्वत: या शोधमोहिमेचा भाग होऊन जातो. आधी नकाशाचा शोध घेणं, सापडल्यावर त्या नकाशाचे लागणारे वेगवेगळे अगम्य अर्थ, आपण लावला तो अर्थ चुकीचा आहे हे लक्षात आल्यावर पुन्हा नवे अर्थ लावण्यासाठी धडपड करणं, दर वेळी नव्याने चक्रावून टाकणारा हा नकाशा वाचण्यासाठी इतिहासतज्ञांची मदत घेणं, त्यातून नव्या भिंती उभ्या राहणं किंवा नवे मार्ग सुचणं, मग पुनश्च नव्या दिशेनं शोधाला आरंभ करणं, इप्सित साध्य करण्यासाठी जीव देण्या-घेण्याची क्षमता राखून असणं अशा धोकादायक चक्रव्यूहातून मार्ग शोधत; एकीकडे साधी पण कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि छातीत अफाट हिंमत असलेली केतकी देशपांडे आणि दुस-या बाजूला जबदरस्त आर्थिक-राजकीय पाठबळ असलेले आबाजी आणि सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभा असलेला स्कायलार्क हा उद्योगसमूह यांच्यातल्या अत्यंत विषम सामन्याचे अतिशय प्रत्ययदायी असे दर्शन ‘शोध’ मधून घडते.

ही कादंबरी लिहिण्यासाठी खैरनारांनी केलेल्या इतिहाससंशोधनातून सामान्य वाचकाला आजवर अज्ञात असलेल्या काही गोष्टीही प्रकाशात आल्या आहेत. उदाहरणार्थ, अभिनव भारत संघटनेच्या अनंत कान्हेरे यांनी ज्या कलेक्टर जॅक्सनची नाशिकमध्ये हत्या केली, त्या ए.एम.टी. जॅक्सन यांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल जी माहिती ‘शोध’मधून उजेडात येते ती मराठी माणसाला सर्वस्वी अविश्वसनीय वाटेलशी आहे. सामान्यपणे ‘एक निर्दय ब्रिटीश अधिकारी’ अशीच ओळख असलेला जॅक्सन हा जागतिक कीर्तीचा मानववंशशास्त्रज्ञ होता, इतिहास, प्राच्यविद्या आणि पुरातत्वशास्त्रातला मोठा विद्वान होता, इतिहास आणि प्राच्यविद्या या विषयांवर तेव्हाच्या सर्व हिंदुस्थानी आणि युरोपियन नियतकालिकांतून त्याने चाळीसहून अधिक लेख लिहिले, त्याची तीन पुस्तकेही प्रकाशित झाली होती असल्या ‘शोध’मधून येणा-या माहितीमुळे कलेक्टर जॅक्सनची एक वेगळीच ओळख घडते. आजवर कधीही पुढे न आलेली ‘खोजनार समाज’ किंवा ‘उद्धारक समाज’ यांच्याबद्दलची माहिती असेल किंवा डोंगरभागातल्या गावक-यांचे जगणे, त्यांच्या खेळा, भायाचा उत्सव, रानखळा, माऊल्या वगैरे थेट निसर्गाशी नाते सांगणा-या प्रथापरंपरांचे विलोभनीय दर्शन असेल किंवा सुरतेची बाजारपेठ एवढी समृद्ध होण्यामागची ‘शोध’मधून येणारी कारणे असतील, या सगळ्या गोष्टी खैरनारांच्या चौफेर अभ्यासाची साक्ष देणा-या तर आहेतच, पण आजवर वाचकाला अज्ञात असलेल्या अनेक वेगळ्या पैलूंची ओळखही घडवणा-या आहेत.

'थरार कथा' हा प्रकार मराठी साहित्यात यापूर्वीही आलेला आहे. शशी भागवतांनी आणि नंतरच्या काळात संजय सोनवणींनी लक्षणीय अशा थरार कादंब-या लिहिलेल्या आहेत. त्या वाचकप्रियही ठरलेल्या आहेत. ग्रंथालयांतून वाचणा-या बहुसंख्य सर्वसामान्य वाचकांची पसंती ‘रंजक साहित्य’ हीच असते. पण कायम अभिजाततेच्या किंवा प्रयोगशीलतेच्या प्रभावाखालच्या मराठी साहित्याने आणि समीक्षेने अशा लेखनाची फारशी दखल कधीच घेतलेली नाही. ‘थरार’ हा कायम दुर्लक्षित राहिलेला साहित्यप्रकार 'शोध'च्या निमित्ताने पहिल्यांदाच अत्यंत ताकदीने मराठी वाचकांच्या समोर आला आहे. कुणाची इच्छा असो की नसो, मराठी साहित्यविश्वाला दखल घ्यावीच लागेल, एवढे हे लेखन दमदार आहे. ‘क्लास’ पासून ‘मास’ पर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाचकांना खिळवून ठेवू शकणारे आणि मराठी साहित्यविश्वाला अधिक समृद्ध करू शकेलसे थरार-कादंबरीचे एक वैभवशाली दालन ‘शोध’च्या निमित्ताने मुरली खैरनारांनी खुले करून ठेवले आहे, हे नक्की. अवघ्या चार महिन्यात ‘शोध’ची दुसरी आवृत्ती आली, हे या कादंबरीचे व्यावसायिक यशही मुद्दाम नमूद करावे असेच आहे.   

मागच्या काही महिन्यांत खैरनारांशी थेटपणे काही बोलणं झालेलं नव्हतं. हा लेख लिहिणं चालू असताना काही गोष्टींबद्दल त्यांच्याशी बोलायचे म्हणून तीस नोव्हेंबरला सायंकाळी मी त्यांना कॉल केला. वहिनींनी तो घेतला आणि त्या म्हणाल्या, "मुरली हॉस्पिटलमध्ये आहे. आजारी आहे. त्याची तब्येत ठीक झाली की तुझ्याशी बोलायला सांगेन त्याला." मी म्हणालो, "ठीक आहे". ताप किंवा सर्दी असलं काहीतरी किरकोळ दुखणं असेल असा माझा समज झाला होता.

सहा डिसेंबरला दुपारी गोपाल तिवारी या मित्राचा फोन आला आणि त्याने मुरली खैरनारांचं निधन झाल्याची बातमी सांगितली तेव्हा मी एवढा गडबडून गेलो की काय बोलावे तेच काही क्षण लक्षात येईना. एखादा माणूस असा एकाएकी कसा जाऊ शकतो? कसला शोध घेण्यासाठी मुरली खैरनार असे घाई करून निघून गेले? मला काही कळेचना. त्यांचं काही दुखत-खुपत असल्याचं ते कधी बोलले नव्हते. साधी सर्दी झाली तरी आम्ही त्याच्या पोस्ट्स लिहितो आणि ‘गेट वेल सून!’ अशा कॉमेंट्स येण्याची वाट बघत बसतो. खैरनारांनी असलं काही लिहिल्याचं मला स्मरत नव्हतं. धक्क्यातून बाहेर आलो तेव्हा मी घाईघाईने नाशिकला राहुल बनसोडेला फोन केला. बातमी खरी असल्याचे राहुलने सांगितले. ‘त्यांना कॅन्सर होता, त्यातच पक्षाघात झाला. शेवटचे चार दिवस ते कोमात होते आणि आज सकाळी गेले’ असं राहुल म्हणाला. मनावर आणि सबंध देहभानावर केवढं जबरदस्त ओझं पेलून धरत खैरनारांनी ‘शोध’चं लेखन पूर्ण केलं हे लक्षात येताना मी हादरून गेलो. आपण आजारी आहोत तर त्याची जाहीर वाच्यता करावी, कुणी आपल्याला सहानुभूती दर्शवावी हे त्यांना अजिबात न मानवणारं होतं. भोवतालात घोंगावणा-या मृत्यूशी लढवय्या शौर्याने झुंज देत त्यांनी कादंबरी लिहून पूर्ण केली. नंतर नेहमीच्याच उमदेपणाने त्यांनी मृत्यू स्वीकारला असेल याबद्दल मला खात्री आहे.

आज मुरली खैरनार नाहीत. त्यांच्यात सदैव जाणवत आलेली प्रखर उर्जा विलुप्त झाली आहे. त्यांचं असं अकस्मात जाणं ही व्यक्तिश: माझ्यासारख्या अनेकांसाठी खूप मोठी हानी आहे. त्याहीपलीकडे, प्रखर बुद्धिमत्ता आणि असामान्य कल्पनाशक्ती असलेल्या या लेखकाचं असं अचानक आणि अकाली जाणं, ही मराठी साहित्याचेच नव्हे तर एकूणच सांस्कृतिक अवकाशाचे अतोनात नुकसान करणारी घटना आहे.

अज्ञातातला एक ‘शोध’ प्रकाशात आला आहे आणि एक प्रखर तेजस्वी शोधप्रवास कायमचा थांबला आहे.

----0----

(पूर्वप्रकाशित- महाराष्ट्र साहित्य पत्रिका- ऑक्टो-नोव्हें-डिसेंबर-२०१५)     

- -      बालाजी सुतार, अंबाजोगाई.

Comments

  1. खिन्न करणारी अन लिहित्या हाताना उमेद देणारा सुंदर लेख.

    ReplyDelete
  2. माझी त्यांची प्रत्यक्ष भेट नव्हती, तरीही त्यांचं जाणं चटका लावून गेलं. तू खैरनार आणि शोध दोन्हींना न्याय दिला आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. त्यांचं जाणं अनेक अर्थांनी चटका लावणारं आहे. मराठी साहित्य एका चौफेर व्यासंगी लेखकाला मुकलं आहे, ही सगळ्यात मोठी हानी.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध