Posts

Showing posts from 2021

पाचोळा: समकालीनत्वाची पन्नास वर्षे

मी सहावीसातवीला असेन शाळेत. आमच्या चिमूटभर गावात शेजारच्या गावाहून एक टेलर आला. त्याआधी आमच्या गावात शिंपी होतेच, अर्थात. पण ते फक्त बाप्यांचं खमीस किंवा बायकांच्या चोळ्या किंवा पोराटोरांच्या आडमाप चड्ड्या वगैरे शिवत असत.  त्यांची दुकानं म्हणजे त्यांच्या घरातल्या ढाळजेत किंवा पुढच्या टीचभर ओट्यावर छपराचा आडोसा करून तिथे मांडलेलं शिवणयंत्र. कापड मोजायची टेपसुद्धा नसे त्यांच्याकडे. वीत–टीच, बोटे-कांडे अशा मापाने जुन्या कपड्यावरून अदमासाने बेतून ते खमीस शिवून द्यायचे. पोरांची चड्ड्यासदरे तर नुसत्या नजरेनेच माप घेऊन शिवली जात. ‘फिटिंगचे कपडे’ वगैरे काही मामलाच नसे. साधारण एकोणीसशे पंचाऐंशी-शहाऐंशीच्या दरम्यानची ही गोष्ट. गावाला शहरी वारा नव्हता अजिबात. मला आठवतं, गावातल्या कुठल्याही दुकानावर दुकानाच्या नावाचा बोर्ड नव्हता. दोनचार बारकी किराणा दुकाने होती. त्यांना फलाण्या मारवाड्याचं दुकान, बिस्तान्या वाण्याचं दुकान असं थेट मालकाच्या नावाने ओळखलं जायचं.  एकुणातच कृष्णधवल टीव्हीतल्या चित्रासारखा बिनमोहक काळ होता तो. अशात, बाहेरगावाहून आलेला तो टेलर स्वत:सोबत अनेक नव्या गोष्टी घेऊन आला. प्रथम

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

१. कविता लिहिणं एकुणात कितपत परिणामकारक असतं? कवीसाठी किंवा एकूणच समाजासाठी? कवी कविता लिहितो ती नेमकी कुणासाठी, कशासाठी? कसल्या का स्वरुपात असेना; माणसाला बोलावं वाटत असतं, हे खरं आहे. पण नक्की काय घडतं तेव्हा माणसाला वाटतं की आता आपण कागदावर लेखणी झिजवून कविता लिहायला हवी? हा किंवा असलाच काही प्रश्न कवींना विचारला तर प्रत्येकाकडून वेगवेगळी असंख्य कारणं समोर येतील. कुणी स्वत:तल्या आनंदाला वाट करून देण्यासाठी लिहित असतील, कुणी स्वत:त दाटून राहिलेल्या साकळल्या वेदनेचा दुखरा प्रवाह वाहता करण्यासाठी. काहींची तर अशीही समजूत असते की यमके जुळवत जुळवत करायची लेखी गंमत म्हणजेच कविता. जो तो आपापल्या त-हेने आपापल्या कविता कागदावर उतरवत असतो. कुणी-कुणी कविता लिहिणं हाच जीवनभराचा ‘धंदा’ असल्यासारखं कविता लिहित असतात आणि कुणी कुणी जीवनाबद्दल बोलण्यासाठी कवितेचा आधार घेतात. कुणाचं जीवन हीच एक कविता असते. कुणा-कुणाचं मात्र जरासं वेगळं असतं.  ओठांत कुठवर चिरडाव्यात  अंतरीच्या हाका  कवितेच्या सुईने किती  घालावा टाका?        जखम चिघळते  घातलेल्याच टाक्यातून  आकाश कोण ओवतं सुईच्या नाकातून?     या कवितेत

अवकाळाचा अभिलेख

“Power will go to the hands of ras¬cals, rogues, free¬boot¬ers; all Indian lead¬ers will be of low cal¬i¬ber and men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight amongst them¬selves for power and India will be lost in polit¬i¬cal squabbles. A day would come when even air and water would be taxed in India.” - Winston Churchill  “पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा येतात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे योग्य ठरेल.” - पं. जवाहरलाल नेहरू.  "गोरं घालविलं अन काळं आणलं. आमचं चुकलंच जरा! खुर्च्याच जाळायला पाहिजे होत्या त्या, मग खरं स्वातंत्र्य आ

सातपाटील : काळाची गोष्ट

'ज्याने त्याने आपला आपला वासोटा आणि कासोटा जिंकावा'. (सातपाटील कुलवृत्तांत. पृ.क्र. ६८१)  'वासोटा' हे महाराष्ट्रातल्या एका किल्ल्याचं नाव आहे, त्याचा कदाचित हा संदर्भ असेल. ज्याने त्याने आपापल्या आयुष्यात किल्यासारखं भव्य अवघड असं काही जिंकावं असा भावार्थ. आणि कासोटा जिंकावा. 'कासोटा' म्हणजे बाईच्या लुगड्याचा काष्टा, बहुधा. 'कासोटा जिंकणं' म्हणजे 'आपल्या आपल्या प्रेमाची बाई जिंकणं' हेसुद्धा किल्ला जिंकण्यासारखंच भव्य अवघड काम. वासोटा जिंकण्याइतकी धमक तुमच्यात असेल तर तुम्ही कासोटाही जिंकत राहता. म्हणजे साधा मेंढपाळ शिरपती असाल तरी तुम्ही ब्राह्मण एडके देशमुखाच्या स्त्रीला जिंकता, साहेबराव असाल तर पठाण आर्यानाबाईला जिंकता, दसरत असाल तर अफगाणी आफियाला, पिराजी असाल तर उल्फी कोल्हाटणीला, शंभूराव असाल तर देऊबाईला. माणूस जे जे काही करतो ते ते सत्ता, संपत्तीसाठी आणि अतिशय अंतिमत: सुंदरीच्या प्राप्तीसाठीच करतो, असं एरवी फ्राईड वगैरे लोकांनीही लिहून ठेवलेलं आहेच. फारतर असं म्हणता येईल की या तिन्ही गोष्टी एकमेकांचा अनुषंग म्हणूनच येतात. दुबळ्या, म्हणजे वास

काही अनवट वाटा, काही चिरंतन स्वर.

आपल्याच तंद्रीत गावातल्या अरुंद धूळवाटेने चालताना समोरून आलेल्या एका मोटारसायकलला वाट करून देण्यासाठी गडबडीने रस्त्याच्या एका बाजूला सरकलो आणि मध्येच वर आलेल्या दगडाला ठेचाळून पायाच्या अंगठ्याला खच्चून ठेच बसली. कळवळून खाली बसलो आणि एकाएकी आठवलं - इथंच, याच जागेवर आधीही कधीतरी आपल्याला ठेच लागली होती. हे नख याआधीही इथेच कुठेसं उलथलं आहे. कळ सोसत उठलो आणि चालता चालता काही क्षणांनी आठवलं की चड्डी आणि दप्तर सावरत शाळेतून येताना घरच्या ओढीने पळता पळता इथेच दगडाला अडखळून पडलो आणि गुडघे आणि हा अंगठा फुटला होता. घरी गेल्यावर आईने रस्त्यात उगवलेल्या दगडाला आणि माझ्या अवखळ धावण्याला शिव्या घालत त्यावर हळद माखली होती. ही तीच वाट, कदाचित हा दगडही तोच. गाव मनात येतं, तेव्हा आपसूकच माझ्या मनात गावातल्या वाटा सरसरतात आणि सोबत काही आवाज तरारून येतात. गावातली माणसंही दिसतातच अर्थात; पण ती मागाहून. आधी धाब्याच्या माळवदी घरांचा, काही खानदानी दगडी वाड्यांचा आणि कुडाने उभारलेल्या अश्राप गरीब घरांचा; असा एक समुच्चय दिसतो आणि त्यापाठोपाठ मनावर उमटतात ते काही चिरंतन आवाज. ज्या आवाजांनी मनावर केलेलं गोंदण अजू

साहित्यिकांतोंडी फुल्या फुल्या..

ओळीने ‘फुल्याफुल्या..’, ‘फुल्याफुल्या..’ असा घोष आणि सोबत मोठ्यांदा ठोकलेली बोंबही कानावर पडली, तेव्हा मी वैतागलो. इतक्या ‘रामाच्या पा-यामंदी’ कोण इतकी ब्येक्कार शिवी पुन:पुन्हा देत चालला आहे, हे कळेना. म्हणून अंथरुणावरून उठून रस्त्यावर डोकावलो तर समोरच्या चौकातल्या छैनु वाण्याच्या दुकानाच्या ओट्यावर अवधूत परळकर दाढीमिश्यांसहित बसलेले दिसले. परळकर दिसल्याबरोब्बर माझ्या लक्षात आलं की ते ‘फुल्याफुल्या..’, ‘फुल्याफुल्या..’ अशा शिव्या घालत नसून केवळ सवयीने ‘गोधरा.. गोधरा..’ असा कल्ला करत बोंबा मारत आहेत. ‘गोध्रा’ हे कुठल्याशा अश्लील शिवीशी ‘फुल्ल -हायमिंग’ असल्यामुळे, आणि योगायोगाने आज होळीच असल्यामुळे, आपल्याला त्या ‘फुल्याफुल्या’ वाटल्या. परळकर सकाळीच जनजागृतीच्या मोहिमेवर निघालेले आहेत त्याअर्थी याच मोहिमेवरच्या मुग्धा कर्णिकही इकडेच कुठेतरी असणार अशा विचाराने नजर फिरवली तेव्हा कायमस्वरूपी संतप्त मुद्रा धारण केलेल्या मुग्धा कर्णिक समोरूनच येताना दिसल्या. आल्या, आणि परळकरांच्याच पलीकडे ओट्यावर ठिय्या देऊन बसल्या. त्याही सवयीनुसार ‘गोध्रा.. गोध्रा..’ असा कल्ला करत आणि शंखध्वनी (म्हणजे बों

उत्तरार्ध

मी पांडुरंग सांगवीकर.  आज उदाहरणार्थ पंचाहत्तर वर्षांचा आहे.  माझ्या वयाची पहिली पंचवीस वर्षेसुद्धा अशी उदाहरणार्थ वगैरेच निघून गेली हे मी तुम्हाला आधी कधी सांगितलं होतं का? पूर्वी काय काय कसं कसं झालं होतं आणि मी कधी कधी कुणा कुणाला काय काय सांगितलं होतं हे तंतोतंत पंचाहत्तर वर्षे एवढ्या वयोमानामुळे हल्ली मला हुबेहूब आठवत नाही हे साहजिकच आहे. पूर्वी माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या सद-यांनाही नीटच माहित असायच्या. हल्ली त्या मलाच नीट माहित नसतात. हेही थोरच वगैरे. मात्र ज्याअर्थी हे माझं मलाच कधी कुठे काय कसं झालं हे हुबेहूब आठवत नाही त्याअर्थी पहिल्या पंचविसासारखीच ही पुढची पन्नास वर्षेही आधीसारखीच निव्वळ उदाहरणार्थ निघून गेली असावीत असं म्हणायला वाव आहे. आजवर इतकी वर्षे आपण इथे थेट वगैरे काढलीच अशी घमेंड अजूनही असल्यामुळे आणखी निदान पंचवीस तरी वर्षे आपण इथे थेट काढूच असं पूर्वी वाटायचं. तसं आता जग आधीपेक्षा ज्यास्तीच भयंकर थोर झालेलं असल्यामुळे आधीसारखं फारसं थेट वगैरे जगता येत नाही हे मात्र खरे आहे. वय झालंय हे खरंच आहे पण पंचाहत्तर म्हणजे काही फार थोर वय नाही हे म्हणणे पंचाहत्तरी उलटलेल्