साहित्यिकांतोंडी फुल्या फुल्या..

ओळीने ‘फुल्याफुल्या..’, ‘फुल्याफुल्या..’ असा घोष आणि सोबत मोठ्यांदा ठोकलेली बोंबही कानावर पडली, तेव्हा मी वैतागलो. इतक्या ‘रामाच्या पा-यामंदी’ कोण इतकी ब्येक्कार शिवी पुन:पुन्हा देत चालला आहे, हे कळेना. म्हणून अंथरुणावरून उठून रस्त्यावर डोकावलो तर समोरच्या चौकातल्या छैनु वाण्याच्या दुकानाच्या ओट्यावर अवधूत परळकर दाढीमिश्यांसहित बसलेले दिसले. परळकर दिसल्याबरोब्बर माझ्या लक्षात आलं की ते ‘फुल्याफुल्या..’, ‘फुल्याफुल्या..’ अशा शिव्या घालत नसून केवळ सवयीने ‘गोधरा.. गोधरा..’ असा कल्ला करत बोंबा मारत आहेत. ‘गोध्रा’ हे कुठल्याशा अश्लील शिवीशी ‘फुल्ल -हायमिंग’ असल्यामुळे, आणि योगायोगाने आज होळीच असल्यामुळे, आपल्याला त्या ‘फुल्याफुल्या’ वाटल्या. परळकर सकाळीच जनजागृतीच्या मोहिमेवर निघालेले आहेत त्याअर्थी याच मोहिमेवरच्या मुग्धा कर्णिकही इकडेच कुठेतरी असणार अशा विचाराने नजर फिरवली तेव्हा कायमस्वरूपी संतप्त मुद्रा धारण केलेल्या मुग्धा कर्णिक समोरूनच येताना दिसल्या. आल्या, आणि परळकरांच्याच पलीकडे ओट्यावर ठिय्या देऊन बसल्या. त्याही सवयीनुसार ‘गोध्रा.. गोध्रा..’ असा कल्ला करत आणि शंखध्वनी (म्हणजे बोंबाच. उगाच ‘स्त्रीदाक्षिण्य’ म्हणून ते स्वरविशेषण सौम्य करून ‘शंखध्वनी’ म्हणायचं, एवढंच.) करत होत्याच. मोदी तिकडे पंप्रपदाचे उमेदवार झाले आणि इकडे परळकर आणि मुग्धाबाई यांनी ‘हा कल्ला आणि शंख करत राहणं’, हेच आपलं एकमेव राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा स्वत:चा समज करून घेतला. मोदी पंप्र होऊन आता तीन वर्षे झाली तरी यांचा तो समज तसाच कायम आहे. मोदी सत्तेवरून गेल्यावर पुढेही तीनेक तरी वर्षे यांची ही ओरड करण्याची सवय जाणार नाही, हे नक्की.

‘यांचं हे रोजचंच आहे, हे दोघे कधीच सुधारणार नाहीत, ‘देशभक्ती’ म्हणजे काय हे यांना या जन्मात उमगणार नाही, यांना पाकिस्तानातच पाठवायला पाहिजेय’, असं मनाशी म्हणत परत वळून मी पुन्हा अंथरुणावर पडलो. 

जरा डोळा लागतो न लागतो तेवढ्यात मोठ्या कल्लोळाचा आवाज येऊन मी खाडकन उठून बसलो. ‘आयला आक्शिडन झाला का काय?’ असं म्हणत दाराशी येऊन पाहिलं तर छैनु वाण्याच्या दुकानाच्या ओट्यापुढे मोठाच जत्था गोळा झालेला दिसला. त्यातले सगळेचजण एकमेकांशी तारस्वरात ओरडून बोलत होते. ‘भगवी बरणी’, ‘भगवी बरणी’ असं काहीतरी त्या गोंगाटातून ऐकायला येत होतं. ही कसली नवीच ‘बरणी’ छैनुने दुकानात आणलीय म्हणून मी बारकाईने दुकानात न्याहाळलं पण छैनु नेहमीसारख्याच मख्ख मुद्रेने कुणा गि-हाईकाला हिंगाची पुडी बांधून देताना दिसला. “च्यामारी!” असं मनाशी म्हणत मी पुढचा जत्था निरखला. प्रवीण बांदेकर, गणेश विसपुते, वीरधवल परब यांची तोंडे माझ्या दिशेने असल्यामुळे ते मला लगेचच ओळखता आले, त्यांच्यासमोर आणखीही काही भिडू उभे होते, ते येशू पाटील, नीतिन रिंढे ‘आणि सहकारी’ असणार. हे लोक ‘उत्तरायण’ नावाच्या कुठल्याशा ‘परिक्रमे’ला निघालेले आहेत, हे मी ऐकून होतो. “कुठली आलीय परिक्रमा? असल्या नावाखाली हे मस्त सहली काढून हिंडून येतात. ‘उत्तरायण’ वगैरे नावं देऊन आपल्या सहलीच्याही बातम्या पेपरातून छापून येण्याची सोय करतात हे.” – एक हिंदुत्ववादी लेखक माझ्याजवळ खाजगीत म्हणाला होता, ते मला आठवलं, आणि, ज्याअर्थी हे बांदेकरादि लोक आहेत, त्याअर्थी ते म्हणतायेत ती ‘भगवी बरणी’ नसून ‘भगवी विचारसरणी’ असणार हे लक्षात येऊन स्वत:ला ‘भले शाब्बास’ असं म्हणून घेत मी पुन्हा अंथरुणासनस्थ झालो. ‘भगवी विचारसरणी’ केवढी खतरनाक असते’ हीच एक गोष्ट हे लोक मागच्या दहापंधरा वर्षांपासून कायम एकमेकांनाच बजबजावून सांगत असतात. यांच्या या ओरड्यामुळे होते एवढेच की ज्या नेमस्त लोकांना ही ‘भगवी सरणी’ माहित नसते, त्यांनाही ती माहित होते आणि केवळ यांना अधिक भडकवून मजा बघण्याखातर त्यातले बरेचसे लोक तिचे पाईक होऊन जातात. आपल्या ओरड्यामुळे भगवे लोक वाढत वाढत जात आहेत, हे यांच्या लक्षात येईल ‘तोच सुदिन’!

‘झोपमोड झालीचंय, आता उठून चहा मारावा’ अशा विचारात असताना पुन्हा गलका ऐकू आला. यावेळी खुद्द छैनु वाणी ओरडा करत होता. काय झालं म्हणून पुन्हा बाहेर आलो तर मघाच्या लोकांत डॉ. हरिश्चंद्र थोरात हॅट घालून दिसले. त्यांच्यासोबत सतीश तांबेही होते. ‘दृग्गोचर’, ‘अर्थनिर्णयन’, “आकृतिबंध’, ‘आशयसंपृक्तता’ असले शब्द वापरून डॉ. थोरात काहीतरी बोलत होते आणि ते ऐकून भडकलेला छैनु “असल्या काईच्याबाई अवघड भाश्येतली शिईगाळ हितं दुकानाच्या दारात करायचं काम न्हाई. सांगून ठिवतोय.. निस्ती भाश्या आयकून यकांदं गिराईक मरंल मायला जागच्या जागी. आज होळी है म्हून आपुन कायबी आयकून घ्येनार न्हाई..” असं त्यांना सुनावत होता. सतीश तांबेंना या असल्या गंमतीजमती मुळातच आवडत असल्यामुळे दाढीतल्या दाढीत मिश्कील हसत ते थोरातांना अधिकच उत्तेजन द्यायच्या प्रयत्नात दिसले. ‘दृग्गोचर’ वगैरे आपला संबंध नसलेल्या शब्दांनी छैनु इतका का भडकला, अशा विचारात असतानाच छैनुच्या आड उभे असलेले संजय भास्कर जोशी अचानक दृग्गोचर झाले आणि ‘छैनुच्या असंतोषाचा जनक कोण?’ हा प्रश्न विचारण्याचे कारणच उरले नाही. जमलेल्या गर्दीत काहीजण ‘भक्त’ लोकांपैकी होते. ते ‘नरेंद्र मोदी ह्याट घालून असली कसली मराठी बोलत आहेत?’ या अचंब्यात पडलेले दिसत होते. छैनु मोदींशीच वाद घालतो आहे अशा समजुतीने त्यातले काही भक्त तिथल्या तिथेच छैनुला ‘देशद्रोही’ ठरवून ‘सीमापार’ टोलवण्याच्याही प्रयत्नात होते. तेवढ्यात रस्त्याने चाललेल्या आमच्या गल्लीतल्या नवकवी सुकुमार दांडगे यांनी थोरातांना ओळखून ‘हे साहित्यातले समीक्षक हरिश्चंद्र थोरात असून हे नरेंद्र मोदी अजिब्बात नाहीयेत.’ असं शपथपूर्वक सांगून भक्तांपासून छैनुला वाचवले. अदरवाईज छैनुचे सीमापार टोलवले जाणे टळणे अशक्यच होते. नवकवीच्या या सांगण्यामुळे भक्त पांगले आणि छैनुही थंड झाला. त्याने आपखुशीने दुकानातली एक अखंड सुपारी अडकित्त्याने बारीक कातरून डॉ. थोरातांच्या हातात ठेवली आणि प्रकरण मिटवून घेतले.

एक घनघोर समीक्षक छैनुसारख्या कंजूष वाण्याकडून बारीक कातरलेल्या अखंड सुपारीचा फुकटात बोकणा मारत आहे हे मनोरम दृश्य मी पाहत असतानाच ठळक अक्षरात ‘डू डिस्टर्ब’ असं लिहिलेला फलक हातात धरून एकटीनेच मोर्चा काढल्यासारख्या चालत कविता महाजन आल्या आणि “हालो कोssन? कविता म्हाजन म्याडम हैत का? आज ह्याठिकानी आमच्या वार्डाचे नगर्श्येवक मान्न्नीय आडमुठराव पाटील भौंच्या बड्डेच्या वाढदिव्सानिमित कविस्म्मेल्नाचं उद्घाटन तुमच्या शुभ्हस्ते करायचा ठराव झाल्याच्यानं तुम्ही हितक्या वाजून हितक्या मिन्टानी वार्डात येताव का?” अशी विचारणा करणारा एक फोनकॉल आला तेव्हा पलीकडच्या इसमाला आपण कसकसा ‘झटकून काढला’ याची कथा खुदुखुदू हसत सगळ्यांना सांगू लागल्या. ही कथा याच लोकांना सांगण्याची त्यांची आजची ही सत्ताविसावी खेप असल्यामुळे त्या स्वत: वगळता इतरेजण भयंकर डिस्टर्ब झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पण कविता महाजनांच्या हातातच ‘डू डिस्टर्ब’ अशी पाटी असल्यामुळे ‘पण तुम्ही आम्हाला का डिस्टर्ब करताय?’ असं त्यांना विचारणंही बाकीच्यांना अशक्य झालं. 

महाजनांची कथा संपता संपता दुपार होत आली. हे लोक कितीवेळ इथे गि-हाईकांची वाट अडवून राहणार अशी चिंता छैनुच्या तोंडावर दिसू लागली. उभं राहून राहून पायाला आलेल्या मुंग्या घालवण्यासाठी मी गाढवासारखा आळीपाळीने हवेत पाय झटकत असतानाच आतापर्यंतच्या सगळ्या गर्दीला मागे टाकील एवढा मोठ्ठा जत्था समोरून येताना दिसला. त्यातल्या प्रत्येकाच्या हातात लाकडंही होती. तिथे आघाडीवर रामदास फुटाणे, फ.मुं. शिंदे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे ही सेनापती मंडळी आणि मागच्या मावळ्यांच्या गर्दीत महाराष्ट्रातले यच्चयावत ‘मंचीय’ कवी ‘बुरा न मानो होली है..’ असा घोष करत चालत होते.

ही मिरवणूक पाहताक्षणीच साहित्यिकांना आगामी संकटाची सुस्पष्ट जाणीव झाली. आणलेल्या लाकडांची आता इथे होळी पेटवून हे तमाम ‘मंच्यूरियन’ लोक तिच्याभोवती कवितांची मैफल भरवणार आणि मागच्या तीसचाळीस वर्षांपासून सलग ऐकत आलेल्या यांच्या त्याच त्या अमर कविता पुन्हा एकदा ऐकाव्या लागणार या कल्पनेने भस्सदिशी छातीत धडकी भरून आधीच्या साहित्यिकांची एकदम दाणादाणच उडाली. 

संताजी-धनाजीच्या फौजेने अचानक हल्ला चढवल्यावर मोगलांची पळापळ व्हावी, तसे चित्र काही क्षण गल्लीभर दिसायला लागले. चौकातलं एकूण एक माणूस शून्य मिनिटात लापता झालं. खुद्द छैनुने घाईघाईने दुकानाच्या फळ्या लावायला घेतल्या. मलाही उभ्या जागी हिवताप आल्यागत होऊन अंगभर थरकाप सुटला. गडबडीने दार लावून घेऊन मी पुनश्च अंथरुणावर गोधडीनशीन झालो.

शेवटचं मला दिसलं ते हे की, या दाणादाणीतलं काहीही मनावर न घेता साऊथच्या सिनेमातल्या व्हिलनसारखं विकट हास्य करत कवींनी चौकात लाकडं रचायला सुरुवात केली होती.

---0--- 

- बालाजी सुतार.


पूर्वप्रकाशित:-  'रसिक' दै. दिव्य मराठी, दि. 12 मार्च, 2017.

(दिव्य मराठीच्या 'होळी' विशेषांकात लिहिलेल्या या लेखात दिवंगत कविता महाजनांचा उल्लेख आहे. कविताताई आता नाहीत, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. बाकी लेखात ज्यांचे उल्लेख आलेले आहेत त्या सर्व आदरणीय साहित्यिकांनी कृपया हलके घ्यावे, अशी विनंती लेख प्रकाशित झाला तेव्हा केली होती. तीच विनंती त्यांनी याठिकाणी पुनश्च लागू करून घ्यावी ही विनंती. ☺)

Comments

  1. भन्नाट ....खरेच ठणठणपाळ आठवला

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच एकदम यंग्राट

    ReplyDelete
  3. हसून हसून दमलो

    ReplyDelete
  4. खरंच, मराठीला खूप दिवसांनी प्रतिभावंत लेखक मिळालाय.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध