Posts

Showing posts from November, 2022

बाप घर के दरख़्त होते हैं..

- दिवस आहे की रात्र आहे की काय आहेय आत्ता? दिवस - रात्री - प्रहरांचे हिशेब नष्ट होऊन गेले आहेत मेंदूमधून. काही आवाज येतायत. कुणी धडपडल्याचे, कुणी दटावत असल्याचे. कुणी शिव्याही देत आहे का? माझे डोळे उघडता उघडता नाहीयत. दोन रात्री आणि दोन दिवस आणि पुन्हा ही आताची अर्धी रात्र असा जवळजवळ पन्नाससाठ तास मी नीट झोपलेलो नाही. आत्ता हे आवाज येतायत तर ते फार अस्पष्टपणे मेंदूपर्यंत पोहचतायत, जवळपास काहीतरी घडतं आहे, असं फार धूसरधूसर जाणवतं आहे, आटोकाट प्रयत्न करून मी माझे डोळे ताणून उघडायचा प्रयत्न करतो, पण डोळ्यांतून, मस्तकातून जणू गरम वाफारे ओसंडत आहेत, पराकाष्ठा करूनही देहामनामेंदूमध्ये भिनलेला थकवा झोपल्या जागेवरून उठू देत नाही. मी दमलो आहे अतिशय. जणू छातीवर, डोळ्यांच्या पापण्यांवर अपरिमित जडशीळ ओझं लादलं आहे. आटोकाट प्रयत्न करूनही पापण्या वर उचलल्याच जात नाहीयेत. निद्रा-जागृतीच्या ऐलपैल झगड्यात शेवटी झोप माझ्यावर मात करते. कानांवर आदळणारे धडपडण्याचे, दटावण्याचे, ओरडण्याचे सगळे आवाज झुगारून देऊन मी पुन्हा कधी झोपी जातो, मला अजिबात कळत नाही. प्रचंड दमून रात्री बाराएक वाजता गाडीत येऊन