Posts

Showing posts from January, 2016

चव्हाट्यावरची साहित्यिक आतषबाजी

बन्ये , आलीस तर तू एकदाची फेसबुकवर धडपणी !  ये , अशी कडेकडेने ये , ठेचाळशील एखाद्या पोस्टवर धांदरटासारखी. इथं कोण कधी कसली पोस्ट ठाप्पकन् टाकेल त्याचा नेम नसतो. काय म्हणतेस ? या भिंती कसल्या ? यांना ' वॉल ' म्हणतात गं बन्ये. या दरेक भिंतीवर एकेक विचारवंत , तत्वज्ञ , लेखक किंवा गेलाबाजार एकेक कवी राहतो. एकेक कवी ' गेलाबाजार ' असं म्हणालो खरं ; पण खरं सांगायचं तर दगडा-दगडाखाली विंचू असावा तसा इथल्या वॉलवॉलवर एकेक कवीच असतो. भेटायचं म्हणतेस इथल्या लोकांना ? बरं चल तर. भेटण्यालायक आहेतच इथले एकेक भिडू. ये अशी इकडून- ही वॉल बघ - ही तांबेबाबांची वॉल ! छे गं , बाबा म्हणजे कुणी अध्यात्मातला ' चिमत्कारी ' ह.भ.प. बाबा नव्हे. हे म्हंजे आपले मराठी लेखक ' ख.प.च. सतीश तांबेबाबा '. ख.प.च. म्हणजे ? काय की बा ! ' रसातळाला ख.प.च. ', ' मॉलमध्ये मंगोल ' असली संग्रहाचा एकदम खपच वाढेल अशी चमत्कारिक नावं कथासंग्रहाला द्यायची त्यांची सवय आहे. ह.भ.प. शी रसातळातल्या ख.प.च. चं यमक की काय ते जुळतं म्हणून ह.भ.प. च्या चालीवर हे ' ख.प

'जात' जाता जाता परत कशी आली?

‘गर्व आहे अमुकढमुक असल्याचा! ’ , किंवा ‘ भगवं, पिवळं, निळं वादळ!’ यापैकी काहीतरी लिहिलेलं असतं. नसेल तर कुणा महापुरुषाचा , नेत्याचा फोटो असतो. रस्त्यावरून गेलेल्या दहा गाड्यांपैकी निदान पाचांवर हे असतं. पायी चालणा-या कुणाकुणाच्या गळ्यात भडक रंगीत गमजे दिसतात. कपाळावर नाम दिसतो. मनगटांवर बांधलेल्या धाग्यांचे रंगसुद्धा काही निश्चित निर्देश करणारे . मुसलमानी चोळणे, टोप्या घातलेली, दाढ्या कोरलेली माणसं दिसतात. रस्त्यांवर जातनिहाय संघटनांच्या पाट्या, जातवार महापुरुषांच्या नावांचे चौक दिसतात. जागतिकीकरण आणि बाजारीकरणाची अवाढव्य चाके निर्दयपणे फिरत असताना, अवघ्या जगाचे व्यवहार रोकड्या अर्थकारणाशी निगडीत असताना, समकालीन प्रश्न टाळून विपरीत दिशेने जगाचा प्रवास घडवणा-या मध्ययुगीन विचारधाराही जोमाने सशक्त होताना दिसत आहेत. ग्रामीण जातवास्तवाचा शोध घेताना भोवताल असा चिरफाळलेला दिसतो. अवघ्या पंधरा - वीस वर्षांपूर्वी हा जातीय विखार एवढा तीव्र नव्हता. खरंतर दलित-सवर्णांमधला झगडा तेव्हाही उघडपणे होता. दलित अस्मिता जोरकसपणे गावकुसाला धडका मारत होत्या. पण हजारो वर्षांपासून कोंडलेल्

मुरली खैरनार- एक तेजस्वी ‘शोध’प्रवास

मुरली खैरनार गेले.   एका शोधप्रवासाची अखेर झाली. मराठी साहित्यविश्वाला एका चौफेर व्यासंगी अवलिया लेखकाचा शोध लागता लागताच हा कलंदर शोधयात्री दिगंतरापल्याडच्या शोधयात्रेला गेला . हे काही बरं झालं नाही . अजिबातच बरं झालं नाही. ‘ चव्हाटा ' या फेसबुक समूहावर आमची मैत्री झाली. अनेकदा वेळा संवाद झाला. काहीवेळा वादही झाले. त्यांचा अभ्यास आणि आमचा आडमुठेपणा अशी जुगलबंदीही काही वेळा झाली. प्रत्येक वेळी लक्षात आलं की हे रसायन काही वेगळंच आहे. क्षुल्लक वादावादीवरून इतरांना धारेवर धरणारे, अन्फ्रेंड किंवा ब्लॉक करणारे अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ प्रतिभावंत फेसबुकवर वावरत असतात. त्या पार्श्वभूमीवर यांचे उमदेपण अधिक ठसठशीतपणे जाणवत असे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय असो; की क्षुद्र स्वार्थासाठी आपापल्या सोयीच्या इतिहासाचे वर्तमानात माजवले जाणारे स्तोम असो; कुठल्याही विषयावर त्यांची स्वत:ची अशी एक खास मांडणी असायची. ती खोडून काढणे हे ' महाकठीण कर्म ' वाटावे इतकी ती मांडणी पक्की असायची. त्यांच्या लेखनाचा, आकलनाचा आणि चिंतनाचा प्रचंड आवाका लक्षात आल्यावर मी त्या