चव्हाट्यावरची साहित्यिक आतषबाजी



बन्ये, आलीस तर तू एकदाची फेसबुकवर धडपणी ! 

ये, अशी कडेकडेने ये, ठेचाळशील एखाद्या पोस्टवर धांदरटासारखी. इथं कोण कधी कसली पोस्ट ठाप्पकन् टाकेल त्याचा नेम नसतो. काय म्हणतेस? या भिंती कसल्या? यांना 'वॉल' म्हणतात गं बन्ये. या दरेक भिंतीवर एकेक विचारवंत, तत्वज्ञ, लेखक किंवा गेलाबाजार एकेक कवी राहतो. एकेक कवी ' गेलाबाजार' असं म्हणालो खरं; पण खरं सांगायचं तर दगडा-दगडाखाली विंचू असावा तसा इथल्या वॉलवॉलवर एकेक कवीच असतो. भेटायचं म्हणतेस इथल्या लोकांना ? बरं चल तर. भेटण्यालायक आहेतच इथले एकेक भिडू. ये अशी इकडून-


ही वॉल बघ - ही तांबेबाबांची वॉल ! छे गं, बाबा म्हणजे कुणी अध्यात्मातला 'चिमत्कारी' ह.भ.प. बाबा नव्हे. हे म्हंजे आपले मराठी लेखक 'ख.प.च. सतीश तांबेबाबा'. ख.प.च. म्हणजे ? काय की बा ! 'रसातळाला ख.प.च.', 'मॉलमध्ये मंगोल' असली संग्रहाचा एकदम खपच वाढेल अशी चमत्कारिक नावं कथासंग्रहाला द्यायची त्यांची सवय आहे. ह.भ.प. शी रसातळातल्या ख.प.च. चं यमक की काय ते जुळतं म्हणून ह.भ.प. च्या चालीवर हे 'ख.प.च. सतीश तांबेबाबा' ! यांची पांढरी दाढी पाहून लोक यांना 'बाबा' म्हणत असतील किंवा हे जिथे उभे राहतात तिथे लगोलग "मठ" स्थापन होतो म्हणूनही यांना बाबा म्हणत असतील. ते काही असो, हा गृहस्थ कुठल्याही बाबा-दादा महाराजापेक्षाही जास्त 'पोचलेला' आहे, एवढं खरं. एखादी 'फुल्ली लोडेड' पोस्ट टाकून कॉमेंटकांची गंमत बघत बसणे हा यांचा आवडता छंद आहे. पण, बन्ये, पोष्टी कितीही लोडेड टाकत असला तरी, तांबेबाबा हा माणूस एकदम अजातशत्रू की काय म्हणतात नं, त्या प्रकारचा आहे. जुनाट जाणत्यांपासून ते नवाट पोराटोरांपर्यंत सगळ्यांशी यांचा दोस्ताना असतो. यांच्या वॉलवरून जरा जपून चाल बरं, इथं कॉमेंटा लिहिणा-यांची फार गर्दी असते, हरवशील त्या भाऊगर्दीत.

ही बघ ही "डू डिस्टर्ब" अशी पाटी लावलेय नं, ती कविता महाजनांची वॉल ! त्यांच्या वॉलला 'ग्राफिटी वॉल' असंही एक नाव आहे. थांब, थांब, बन्ये, एकदम घुसू नकोस तिकडे. त्या 'स्त्री लेखिका' असल्यामुळे साहजिकच 'स्त्रीवादी'ही असल्यामुळे कुणीही बाईमाणूस दिसलं की तिला "ब्र" काढता येतो की नाही हे त्या आधी चेक करतात. तू आधी "ब्र" काढणं शिकून घे आणि मग त्यांच्याकडे जा. त्या स्वत: अत्यंत जबरी "ब्र" उच्चारतात. मागे एकदा हैद्राबादमध्ये एका रिक्षावाल्याने "ब्र" च्या ऐवजी "चकार" शब्द उच्चारणेच कसे योग्य आहे, हे त्यांना हैद्राबादी हिंदीत समजावण्याची "कोशिस" केली तेव्हा यांनी त्याला चपलेनं हाणला होता, एवढं त्यांचं "ब्र" या शब्दावर प्रेम आहे, आहेस कुठं तू बन्ये ! कुहू ? नाही गं बाई, 'कुहू' ही त्यांची मल्टीमीडिया कादंबरी आहे. त्याचा त्यांच्या आवाजाशी काही संबंध नाही. त्या गाणं-बिणं म्हणताना सोड, कुणाचं गाणं शेअर करतानासुद्धा दिसत नाहीत कधी. शिवाय त्यांनी स्वत: कितीही कुहूकुहू असा सुस्वर काढायचा ठरवलंच तरी लोकांना सवयीने त्यातून "ब्र" "ब्र" एवढाच स्वर ऐकू येणार हे स्वत: कविता महाजनांनाही माहित आहे. त्यामुळे त्याही त्या फंदात पडत नाही. आपण बरं की आपला "ब्र" बरा असाच त्यांचा खाक्या असतो.  

ही बघ, ही इकडे अनेक पेपरांचे माजी संपादक आणि एका नाटकाचे आजी संगीतनाट्य दिग्दर्शक गणेश दिघेंची वॉल. नाही, ते आता इथे नसतील. ते 'लाली चायवाली' नावाच्या एका 'फेकायडी' ने फेसबुकवर चालवलेल्या 'व्हर्च्युअल हाटेलात' बसलेले असतील. लाली नसते तेव्हा हे आणि हे नसतात तेव्हा लाली, असे दोघे आलटून-पालटून तिथे गल्ल्यावर बसलेले असतात. तिथे नसलेच तर मग ते "मेघदूत" या संगीत नाटकाच्या तालमीत असतील. काय म्हणालीस? प्रयोग कधी आहे मेघदूतचा ? एक प्रयोग झालाय मागेच बालगंधर्वमध्ये पुण्यात. पुढचा कधी ते तू त्यांनाच विचार. पुण्यात विघ्नसंतोषी लोक अतोनात संख्येने राहतात हे तुला माहीतच असेल, तर त्यापैकीच काही लोक दोनेक वर्षांपासून यांच्या प्रयोगात कायम अडथळे आणत असतात. पण, तुला सांगतो, बन्ये, गणेश दिघे हा गृहस्थ तसल्या लोकांना बधणारा नव्हेच. तत्सम पुणेकरांच्या नाकांवर टिच्चून ते पुढचेही प्रयोग जोसात लावतीलच. हो तर ! आपण जाऊच की त्यांच्या प्रयोगाला 'पासा'वर ! फक्त तिथे गेल्यावर नेहमीप्रमाणे झोपू नकोस म्हणजे झालं. नाटक 'संगीत' असल्यामुळे आपल्यासारख्यांना झोप लागायची शक्यता असते म्हणून सांगितलं गंयांच्या कवितांना मात्र जरा सांभाळून राहात हां बन्ये, खुद्द ग्रेसांना बुचकळ्यात टाकतील असल्या कविता हे करतात. गृहस्थ बरा असला तरी त्यांच्या कवितांच्या नादाला आपण साध्याभोळ्या माणसांनी लागू नये. चल पुढे -

- कायतरीच काय विचारतेस, बन्ये ? ही नरेंद्र मोदींची भिंत कशी असेल? ही मुंबई विद्यापीठातून रिटायर झालेल्या प्रसिद्ध समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरातांची भिंत आहे. मोदी आणि डॉ. थोरात एकमेकांसारखे दिसतात फक्त. तेवढं ते मोदींसारखं दिसणं सोडलं तर, तुला सांगतो, बन्ये, थोरातसर म्हणजे अत्यंत सज्जन समीक्षक गृहस्थ !  त्यांच्या पोस्टी वाचायच्या म्हणतेस ? नको !  नकोच ! "सिद्ध भ्रमांच्या वसाहतीत वास्तव्य करताना, उभे करू आडबाजार पर्यायी टाकसाळीचे, ध्वन्यर्थाला वेसण घालू नाचवू.." ह्या त्यांच्या कवितेतल्या ओळी आहेत. यावरून त्याचं गद्यपोस्टलेखन कसं आणि किती अवघड घाटाचं असेल हे कळेल तुला. आपलं सोड बन्ये, भलेभले लेखक-विचारवंतसुद्धा थोरातसरांच्या पोस्टवर गेले की निव्वळ त्यांच्या समीक्षकीय भाषेला घाबरून आणि गांगरून जातात आणि निष्कारणी भानगड नको म्हणून 'लाईक' करून मोकळे होतात. एकुणातच आपली मराठी लेखक मंडळी  वाटत नसली तरी भयंकर मुत्सद्दी असतात. थोरातसरांच्या पोस्टवरच्या लाईक्स हे या मुत्सद्दीपणाचेच निदर्शक !
 
तिकडे नको पाहूस, बन्ये. ती तिघा-चौघा म्हाता-या म्हणजे वयोवृद्ध आयडींच्या गोग्गोड कॉमेंटांनी चहूबाजूंनी घेरलेली वॉल दिसतेय नं, ती एका सुंदर कवयित्रीची वॉल आहे. म्हणतेस काय बन्ये ? वाचायला हव्यात कविता ? बन्ये, बन्ये, मी कवयित्रीला सुंदर म्हणालो गं ! कवितेला नाही. वेडी रे वेडी !  सुंदर कवितांचा काळ कधीचाच सरून गेला आहे, बायो ! फेसबुकवर यच्चयावत जागजागी सापडतात त्या कवितेसदृष्य पदार्थाला 'कविता' नाही म्हणवत मला. शप्पथ !
 
नाही, बन्ये, तिकडे तर अजिबात म्हणजे अजिब्बातच पाहू नकोस. तिकडे "चव्हाटा" नावाचा एक 'फेसबुक ग्रुप' उर्फ 'इरसाल लोकांची यंग्राट वस्ती' आहे. कुणीएक पांडुरंग सांगवीकर नावाचा अतोनात आडमुठा इसम तिकडे असतो आणि इतर कुणी तिकडे आला की लगोलग त्याला 'नारळ' देतो, अशी त्याच्याबद्दल आख्यायिका आहे. आपल्याला तूर्त नारळाची गरज नसल्याने आपण तिकडे जायला नको. तुझी वहिनी नारळाच्या वड्या बनवायचं 'ख्याट' काढील तेव्हा जाऊयात आपण तिकडे. नाही, 'हा' पांडुरंग सांगवीकर म्हणजे 'तो' कोसल्यातला उदाहरणार्थ वगैरे पांडुरंग सांगवीकर हुबेहूब नाही. फेसबुकच्याच भाषेत सांगायचे तर हा मघाच्या 'लाली चायवाली'सारखाच 'फेकायडी' आहे. 'फेक आय-डी' म्हणजे काय? काही नाही गं, स्वत:च्या नावापेक्षा वेगळ्या नावाने भिंत बांधणा-याला 'फेकायडी' असं म्हणून हिणवायची इथं प्रथा आहे. मरू दे ! आतापुरता या वस्तीला वळसा घालून आपण आपल्या घरी सुखरूप जाऊयात कसे ! उरल्या लोकांच्या ओळखी तुला पुढच्या वेळी करून देईन.

चल, उचल पाय बिगीबिगी..

----0---- 

(पूर्वप्रकाशित दै. दिव्य मराठी 'रसिक' - दिनांक. 3 नोव्हेंबर 2013)

- बालाजी सुतार, अंबाजोगाई.   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध