डॉ. भालचंद्र नेमाडे आणि मी : एक प्रेमप्रकरण.



मनी मेली.

तिच्याबरोबरच तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली.

माणूस हा खानेसुमारीच्या उतरत्या रचनेला फुटलेल्या फांद्यांना लटकवलेला एक रकाना असतो फक्त. पुढच्या रकान्यांना जन्म न देता तो मरून जातो तेव्हा बाकी काय उरतं ? काही नाही. काहीच नाही. पुढच्या फांद्या नाहीत, फांद्यांना फुलं-फळं नाहीत, म्हणजे पुढची बीजं, पुढचे जन्म, पुढचे रकाने नाहीत. पुढे पार नसतो, तीर नसतो, उरलाच तर निर्वातातला काजळदाट काळोख फक्त उरत असणार.

मला अजून आठवतं, ‘तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशय गेलं.’ ही ओळ वाचल्यावर अतिशय सैरभैर होऊन मी ‘कोसला’ मिटून ठेवली होती. बी.ए.च्या पहिल्या-दुस-या वर्षात असेन तेव्हा ‘कोसला’ माझ्या हाती आली. अठरा एकोणीस वर्षे वय होतं माझं. पुस्तकातून मेलेली अनेक माणसं मी त्यापूर्वी वाचलेली होती. प्रत्यक्षातही कुणी म्हातारा, कुणी ऐन कर्तासवरता, कुणी लेकुरवाळी, क्वचित कुणी लहान मूलही मेलेलं मी ऐकलं, पाहिलेलं होतं. पाणी भरायला गेलेली असताना विहिरीत बुडून मरून गेलेल्या एका मित्राच्या छोट्या बहिणीचं पाण्यावर तरंगणारं शव आणि बारावीला असताना आमच्या एका वर्गमित्राने गळफास लावून आत्महत्या केली, ते झाडाच्या फांदीला लटकलेलं प्रेतही पाहिलेलं होतं. कुणाचा मृत्यू झाल्याचं ऐकलं की त्या कोवळ्या वयात दु:खापेक्षाही विक्राळ भयाच्या छायेनं मनाला ग्रासून टाकलं जाई. ‘मृत्यू’ या शब्दाने भयापलीकडे काही भावना त्यावेळी मनात आल्याचे आज आठवत नाही. मनीच्या मरणाने मात्र मृत्यूसंदर्भात पहिल्यांदाच काही वेगळ्या जाणीवा मनात आल्या. ही एकच ओळ पुन:पुन्हा वाचत मी मरणाचे अर्थ लावत राहिलो होतो. ‘मनीचं मरणं’ हे कुणा मनी नावाच्या मुलीचं एकटीचं मरून जाणं नसतं, जगाच्या अंतापर्यंत पोहचू शकला असता असा स्वत:चा अख्खा वंश गर्भाशयात घेऊन मनी मरते, केवढ्या मोठ्ठ्या अभविष्यत् मानवी साखळीला, तिच्या विस्ताराला, पुढच्या वंशातल्या प्रत्येकाच्या जगण्या-मरण्याच्या दरम्यानच्या इतिहासाला सोबत घेऊन मनी मरते, हे लक्षात आल्यावर मरणाचे, विशेषत: मुलींच्या मरणाचे माझ्या मनातले सगळेच संदर्भ बदलून गेले. मनीच्या मरणाने पहिल्यांदाच मरण्यातल्या गंभीर अन्वयार्थाकडे माझे लक्ष गेले.

मनीच्या मरणाच्या बिंदूवर भालचंद्र नेमाडे हा लेखक त्याच्या समग्र ताकदीनिशी मला असा आरपार थेट भिडला. नुसता भिडला असं नाही, स्वत:च्या आयुष्याकडे आणि भोवतालातल्या जगाकडे बघण्याची एक अत्यंत वेगळी दृष्टीही देऊन गेला.

एका बारक्या खेड्यातला मी. तिथे वाचायला फार काही मिळायचंच नाही. एक छोटी लायब्ररी होती. तिथे बाबा कदम, सुहास शिरवळकर वगैरेंची शेपन्नास पुस्तके होती. अगदी शाळकरी वयातच ती वाचून संपल्यावर आम्ही चार पाच वाचनवेडे मित्र अधूनमधून जवळच्या शहरात गेल्यावर स्टॅंडवरच्या बुकस्टॉलमधून हिंदी पॉकेट बुक्स विकत आणून आणि आळीपाळीने वाचून वाचनाची भूक भागवायला लागलो. (या जाडजूड हिंदी कादंब-या आठ-दहा रुपयांना मिळत म्हणून त्या आम्हाला परवडत. मराठी पुस्तकांच्या किंमती आमच्या आवाक्याबाहेरच्या होत्या आणि अभ्यासाच्या शिवायचं पुस्तक विकत घ्यायचं आहे असं सांगितलं असतं तर ते घ्यायला आम्हाला कुणी पैसेही दिले नसते. अभ्यासाशिवायची पुस्तकं वाचण्याचा नाद असणं, त्यात वेळ घालवणं हे ‘भिकेचे डोहाळे’ आहेत असं आमच्या वडीलधा-यांचं स्पष्ट मत होतं.) बारावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईच्या महाविद्यालयात आलो आणि तिथल्या ग्रंथालयातला पुस्तकांचा खजिना पाहून वेडा होऊन गेलो. महाविद्यालयातली ती सगळी वर्षे मी जवळजवळ रोज एक या वेगाने कादंब-या, कथासंग्रह, प्रवासवर्णने असं काय वाट्टेल ते वाचत असे. याच दरम्यान कधीतरी ‘कोसला’ माझ्या हातात पडली आणि नेमाडे नावाच्या भुताने माझं नखशिखांत ‘झाड’ करून टाकलं. वयाच्या विशीत पडलेली ही भूल आज चाळीशीतही जशीच्या तशी टिकून आहे.

कादंबरीच्या ‘उदाहरणार्थ’ भाषेपासून संपूर्ण आकृतिबंधापर्यंत, शंभरातल्या नव्व्याण्णवांना अर्पण करण्यापासून ते भटकत्या भुताला आवाहन करण्यापर्यंत नेमाडेंनी जपलेला चक्रमपणा, गावात माडीवरचे उंदीर मारण्यापासून ते पुण्यात हॉस्टेलवर गेल्यावर पहिल्याच दिवशी तेलाची बाटली फुटण्यापर्यंत, ‘पुण्यात वेश्या फार आहेत पण एवढं करूनही प्रत्येकीचा नवरा तिला बायकोच म्हणत असेल तर आपण काय करणार?’ असं म्हणण्यापासून ते ‘हा गृहस्थ साहित्य परिषदेच्या दारात तुमान घालून उभा आहे म्हणजे हा नक्कीच थोर लेखक असणार’, असं म्हणण्यापर्यंत, ‘शेवटी पुरुषांना एकमेकांत मिसळता येत नाही. शरीराने सगळी गोची करून ठेवलेली आहे.’ असं सुर्शाला सांगण्यापासून ते बुंदीच्या हाताला सिगरेटचा चटका देण्यापर्यंत, ‘व्यक्तिमत्व’ घडवण्यापायी मेसचा सेक्रेटरी होऊन भयानक आर्थिक फटका आणि मानसिक भोवरे सहन करण्यापासून ते असं व्यक्तिमत्व घडवणं ही अतिशय थोर निरर्थक गोष्ट आहे असा निष्कर्षाला येण्यापर्यंत, माझे वडील या खेड्यात रंगारूपाने प्रतिष्ठित आहेत.अशी सुरुवात करून मला एकवेळ सर्व काही आवडेल, पण उदाहरणार्थ कुणी मारलेलं सहन होत नाही. मी त्यांना म्हणालो की हे हिंदूधर्माला धरून नाही. तुम्ही देवळात फुकटच जाता.”, ‘मी वडलांचा खून करीन.’ असं उघड बंड करण्यापासून ते ‘काही झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वगैरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंट्यावर येऊन उभं राहिलेलं बरं.’ असं पराभूत अवस्थेला येण्यापर्यंत सगळीकडेच पांडुरंग सांगवीकरनेही जपलेला आहे. तोपर्यंत वाचलेल्या साने गुरुजींच्या, किंवा खांडेकर, फडक्यांच्या सदरा टोपी घालणा-या ध्येयवादी किंवा साईड बाय साईड देशसेवा करत ब्लेझर घालून आणि टेनिस रॅकेट घेऊन पोरींशी गूळ काढत हिंडणा-या रोमांटिक नायकांच्या पार्श्वभूमीवर जिथे तिथे नकार रुजवणारा हा पांडुरंग सांगवीकर नावाचा थेट माझ्या गावातलाच वाटणारा अत्यंत चक्रमोत्तम देशी गडी माझ्यासारख्या खेडवळ-अर्धशहरी तरुणाला आपला वाटला नसता तरच नवल होतं.

नेमाडेंच्या बाकीच्या चारही कादंब-या मी पुढे ओळीने वाचून काढल्या. पांडुरंग सांगवीकरच्या नंतर ज्याने माझा कब्जा घेतला तो चांगदेव पाटील या चार कादंब-यांमधून माझ्या आयुष्यात आला. नुसता पांडुरंग आणि चांगदेवच नाही, तर कोसलातले सुर्शा, इचल्या, कोड्डम, सोटम्या, गिरधर, लालाजी, लखूशेट आणि पुढच्या ‘चांगदेव चतुष्टय’मधले पवार, शबीर, शेख, चांगला देशपांडे, लठ्ठ आनंदी पापय्या देसाई, कॉपी करणा-या पोरांना च्यूते हो तुम. कुछ बी लिखते तो साठ सत्तर मारक मिलतेच रह्यते. कॉपी करने की जरुरतच क्या थी? असं विचारणारा उर्दूचा नखवी, हिंदुत्ववादी नामजोशी, ‘तिरपं घुसून दोन स्टेपमधी लॉग घेतला की भिनफट् उत्तर येतं भौ. करी तं पाहा तुम्ही.. असं खास गावाकडच्या भाषेत शिकवणारे जीजी, राजपूत, चांडक, नामदेव भोळे आणि टॉप गिअर मे मत जाओ, लोअर गिअर मे बात करो..अशासारख्या ट्रकड्रायव्हरीतल्या ‘टर्मा’ ‘प्रिन्सिपलकीत’ वापरणारा भल्ला किंवा काहीच्या काही इंग्रजी बोलणारा प्रोफेसर हुलीमणी असे अत्यंत चित्तचक्षुचमत्कारिक असे पाच-पन्नास प्राध्यापक, ‘व्यभिचार हा एक सुंदर कामव्यवहार असतो असं माझं मत होत चाललंय.’ असं म्हटल्यावर ‘तुमचं तसं मत होत चाललंय. मला तर तसं करावंच वाटायला लागलं आहे.’ असं म्हणणारा अत्यंत हातघाईवर आलेला गायकवाड, ‘पोरींना गरोदर करून सोडावं एकदम. लग्नबिग्न नंतरची गोष्ट’ असं मार्गदर्शन करणारे झोपे, कडकडीत उन्हात आयुष्य भाजून शहाणपण मिळवलेले आणि कोणत्याही विषयाच्या सर्व बाजू समंजसपणे मांडणारे सुलतानच्या फलाटीतले ते समंजस मुसलमान सुतार, गावोगावी परीक्षेत यशस्वीपणे ‘बेचाळीस जाईंट चीप सुपरिन्टेनशिपा’ करणारे प्राध्यापक गेंगाणे, अगदी सरतेशेवटीसुद्धा चांगदेवला व्यवस्थित बनवणारा प्यून चिलटे, तो अधून मधून उगवणारा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, अगदी लॉजवाला बोराशेठ आणि सर पे चढा फूल जो चमन से निकल गया, इज्जत उसी ने पायी जो वतन से निकल गया असला नेमका अस्सल मारवाडी शेर सुनावणारा लॉजचा गडी झुंबर हे सगळेच भिडू माझ्या जीवीचे मित्र झालेले आहेत. मनुष्यस्वभावाचे हे असंख्य नमुने हे नेमाडेंच्या एकूण लेखनातले मला अत्यंत आवडलेले एक थोर वैशिष्ट्य आहे. भोवतालाचं आणि भोवतालातल्या माणसांचं मूलभूत चौफेर आकलन आणि त्यांच्यातल्या परस्परव्यवहाराचं अत्यंत मूलभूत भान हे आणखी एक.

आणि या सगळ्यांहून खूप वेगळी अशी ती पारू सावनूर आणि ती टूरिझम डिपार्टमेंटमधली राजेश्वरी.

उदास सुंदर सावळी अप्रतिम पारू आणि उत्साहाने खळाळणारी सुंदर नटवी राजेश्वरी. काय लिहावं यांच्याबद्दल? ‘वाचक’ म्हणून माझ्या आजवरच्या आयुष्यात आलेल्या या सर्वात वेगळ्या, सर्वात सुंदर आणि सर्वात अधिक चटका लावून गेलेल्या नायिका आहेत. अगदीच अंतराचा तळ गाठून स्वत:ला तपासल्यावर माझ्या असं लक्षात येतं की पारूवर माझं स्वत:चं अफाट प्रेम आहे. खुद्द चांगदेवलाही कधी करता आलं नाही एवढं प्रेम आहे. अख्खं ‘चांगदेव चतुष्टय’ मी अनेक वेळा वाचलेलं आहे. ‘एका आध्यात्मिक रात्रीत राक्षसी भोव-यात या गोड प्रकरणाची हवा होऊन गेली.’ हे पारुचं प्रकरण संपवणारं वाक्य वाचताना दरवेळीच मी प्रचंड अस्वस्थ होतो. एवढ्या एकाच जागेवर चांगदेव पाटील या बेभरवशी अस्थिर गृहस्थाबद्दल माझ्या मनात पराकोटीचा संताप दाटून येतो. वैयक्तिक आयुष्यात बलात्कारासारखी जबर होरपळ साहिलेल्या, त्यातून पुन्हा उभी राहू पाहत असलेल्या, चांगदेवसोबत एका सुखी आयुष्याची स्वप्ने पाहू लागलेल्या विचारी, विवेकी आणि संवेदनशील आणि मुलींमध्ये आवश्यकच असतं ते व्यवहारी शहाणपणही बाळगून असलेल्या या मुलीला हा गधडा अगदीच का समजून घेत नाही? का हा दरवेळी आपली स्वत:ची फालतू तर्कटे चालवून त्याच्याबद्दल ओल बाळगून असलेल्या माणसांना दुखावतो ? का याला कुठल्याच भुईवर पाय रोवून रुजता येत नाही? असल्या विचारांनी भयानक संतापून मी मनातल्या मनात चांगदेव पाटलाला अस्सल गावठी शिव्या हासडतो. पारूच्या प्रकरणाची हवा होण्याच्या बिंदूशी, त्या तेवढ्याच बिंदूपुरताच का होईना, चांगदेव पाटील हा माझा लाडका नायक माझी सहानुभूती संपूर्णपणे गमावून बसतो. पारू सावनूर ही नेहमीच मला माझ्या मनातल्या महाकाव्याची नायिका वाटत आलेली आहे. ऐन निघतानाच्या क्षणी चांगदेवचं कडकडून चुंबन घेणारी ती राजेश्वरीही मला पुलंच्या नंदा प्रधानसारखी नेहमीच यक्षवत् वाटत असते.

पारू काय, राजेश्वरी काय किंवा कोसलातली आई, आजी, बुंदी, रमी, पांडुरंगच्या आईला गाणं म्हणून दाखवणारी आणि ‘एकंदर सारांश असा की आपण लग्न करू.’ असं न बोलता सुचवणारी ती कुणा सोय-याची मुलगी काय, चांगदेवची आई-बहिण, काकू, काकूची गुजराथी शेजारीण काय आणि ‘हिंदू’च्या अफाट पसा-यात ठिकठिकाणी आलेल्या असंख्य स्त्रिया काय; स्त्री-जीवनाचा वेध नेमाडेंनी घेतला तेवढ्या खोल ताकदीने इतर कुणी घेतलेला निदान माझ्या वाचनात कधी आलेला नाही. स्त्रीबद्दलची अपार करुणा, अफाट आस्था आणि अपरंपार ओल नेमाडेंच्या लेखनात जाणवते. ‘आतून धडक मारणारी ओल स्त्रवायला लागली की जगाचा अर्थ बदलतो. हिंदुस्थानसारख्या उष्ण देशात चिरंतन झरणारी ओल आयुष्यात असणं आवश्यक आहे. ती दुसरीकडून कशी आणणार? ती स्त्रीशीच सबंधित आहे. संसार म्हणजे प्रचंड ओलच. स्वैपाक म्हणजे शिजणारं पाणी, शिजवलेले वाफ घुटमळणारे ताजे पदार्थ, दूध दही ताक, घुसळणं, आंबवणं, गोडावणं, ओलावणं, खारवणं, तोंडाला सुटणारं पाणी आणि जठरात धावणारे पाचक रस, भांडी घासणं आणि धुणं आणि पुसणं, वाळवणं, ओले हात, संसार म्हणजे कपडे, चिरगुटं धुणं आणि पिळणं, दोरीवर वाळत घातलेली स्वच्छ छोटी छोटी झबली, लंगोट, चड्ड्या, फ्रॉक, ब्रेसिअरी, परकर, ब्लाउझ, बनियनं, साड्या, पायजमे, धोतरं आणि त्यांच्यातून टपकणारं स्वच्छ पाणी, थेंब, एकसारखी गोल गोल पुसत आणलेली फरशी, आंघोळी, न्हाणीघरातून आतपर्यंत उमटलेली लक्ष्मीच्या रांगोळ्यांसारखी सुंदर ओली पावलं, ऋतुस्त्राव नेमानं करणा-या रज:स्वला, नवविवाहित हट्टी बायकांचं स्फुंदून स्फुंदून रडणं, आसवं, ओठांवरची रसरशीत ओल, गालांवरची ओल, घरोघर ओल्या गर्भाशयांमध्ये वर्षणारे चपळ ओले रेतसंभार, समागमकारक योनिरस, गर्भाशयात ओल्या पोषक द्रवांमध्ये तुडुंब लपेटलेली अर्भकं, जननोन्मुख स्त्राव, लेकरांची दुधानं लाळेनं ओली झालेली झबली आणि डोळ्यातलं तेजस्वी पाणी, रडणा-या पोरांची आसवं, ओली वाहणारी शेंबडी नाकं, लेकरांचं घटकेघटकेला करमणुकीखातर मुतणं, स्तनांत दाटलेलं सूक्ष्म छिद्रांतून चुळचुळणारं लेकरांच्या ओठांतून वाहायला उत्सुक आयांचं दूध. सगळं आयुष्य ह्या ठिबकणा-या मऊ पोषक ओलीमध्येच वाढत असतं. चारी बाजूनी वाहत येऊन ही विश्वव्यापी ओल आयुष्यात साकळते आणि आयुष्य भिजवून मऊ करून टाकते. हे गुणगुणणारे स्त्रीसिध्द स्त्राव बेफिकीर तरुणपणाला बेफाम करून मग लोळवतात. सगळं सजीव अस्तित्व म्हणजे प्रचंड ओलच. आतल्या ओलीला वरून ही ओल मिळाली की कोणात तडफड अस्वस्थता राहणार नाही.’ हे वाचलं म्हणजे स्त्रीच्या – ज्याची अजिबातच दखल घेतली जात नाही, त्या -  दैनंदिन जगण्यात केवढे सूक्ष्म तपशील असतात हे तर उमगतंच, पण हे स्त्रीसिद्ध स्त्राव, ही स्त्रियांतून झरणारी शारीरिक, मानसिक चिरंतन ओल नसती तर कदाचित हे जगसुद्धा नसतं हे अत्यंत मूलभूत भानसुद्धा अतिशय खोलवर आतून उमगतं. स्त्रिया गरीब घरातल्या असू दे की श्रीमंत, सवर्ण असू दे की दलित-आदिवासी, आपल्या समाजव्यवस्थेत सर्वाधिक शोषण केला जाणारा घटक स्त्रीच असतो. पिढ्यानपिढ्या स्त्रियांच्या भाळावर व्यथांच्या रांगोळ्या जन्मजातच रेखलेल्या असतात, हे नेमाडेंनी विशेषत: ‘हिंदू’मध्ये रेखाटलेल्या स्त्री-व्यक्तिरेखा वाचल्यावर अधिक ठसठशीतपणे कळून येतं. ‘हिंदू’ हा खरोखर अतिशय अवाक करणारा विशाल पट आहे. लेखाच्या शब्दमर्यादा सांभाळून ‘हिंदू’बद्दल काही लिहिता येणं कठीणच.

अनेक लेखक आपल्याला आवडत असतात. मला स्वत:ला पुलंपासून जयवंत दळवी ते रवींद्र पिंगे, बाळकरामांपासून मिरासदार, ग.ल. ठोकळांपासून शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकरांपर्यंत, भारत सासणे ते सतीश तांबे आणि दि.बा मोकाशी ते राजन खान, रंगनाथ पठारेंपर्यंत, नारायण धारपांपासून रत्नाकर मतकरी, अनंत मनोहर ते अनंत सामंत, पुरुषोत्तम बोरकर ते कमलेश वालावलकर, प्रवीण बांदेकर ते अवधूत डोंगरे असे अनेक लेखक अनेक कारणांमुळे मनापासून आवडतात. भालचंद्र नेमाडे हा लेखक मात्र मला नुसता आवडतो असं नाही, मी या लेखकाच्या आकंठ प्रेमात आहे. त्यांचे लेखन हे रास्त कारण तर आहेच, पण त्यांची एकूण बंडखोरी, त्यांची प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटणारी अनेक मते (उदाहरणार्थ ‘आडव्या अक्षावरची जातीव्यवस्था मान्य असणं’ या विचाराशी सहमत होता येणं मला अवघड जातं.), मुंबई किंवा पुणे किंवा नाशकातल्या एखादा कार्यक्रमात एखादी ‘पुडी’ सोडून देऊन (उदाहरणार्थ ‘शिंगरोबा’ वगैरे हुबेहूब विनोदी प्रकरण) नेमाडे सिमल्याला किंवा थेट तिकडे आसामात वगैरे निघून जातात आणि इकडे टीव्हीतल्या येडपट चर्चकांपासून ते फेसबुकवरच्या समस्त दीडशहाण्यांपर्यंत सगळेजण नेमाडेंना यथेच्छ झोडपत असतात त्याची अवाक्षरानेही दखल न घेता पुन्हा कधीतरी मुंबईत किंवा पुण्यात किंवा नाशकात परत येऊन आणखी तिसरीच पुडी सोडून देणे (उदाहरणार्थ ‘समस्त इंग्रजी शाळा जागच्या जागी तातडीने बंद करून टाकल्या पाहिजेत.’) ही नेमाडे अनेकदा करत असलेली गंमत मला फार फार म्हणजे खूपच्या खूपच आवडत असते. (मी फेसबुकवर हे लिहित असतो तर इथे डोळा मारणारी स्मायली नक्की टाकली असती.)

हे बाकी काहीही असले तरी एक नक्की आहे, नेमाडेंच्या मुलाखती, त्यांची भाषणे, त्यांची समीक्षा आणि त्यातून व्यक्त होणारे त्यांचे विचार यांच्याशी आपण कितीही सहमत नसलो तरी, ‘कादंबरीकार नेमाडे’ ही नेहमीच मला अफाट गोष्ट वाटत आलेली आहे. पांडुरंग आणि चांगदेव आणि त्यांचा भौतिक-मानसिक भोवताल या गोष्टी निव्वळ कादंबरीतला काहीतरी काल्पनिक खेळ म्हणून सोडून देता येणा-या नाहीतच. अनेक पिढ्यांपासून गावाच्या मातीत रुजलेली मुळं उपटून खेड्यातून शहरात जाऊन तिथं ती पुन्हा रुजू न शकल्याने, गावात आणि शहरात अशा दोन्हीकडे कायम उपरेपण सोसत जगणारे असंख्य पांडुरंग आणि चांगदेव गावोगावी असतात. कमीअधिक प्रमाणात हे असलं उपरेपण कायम जगत आलेल्या माझ्यासारख्या असंख्य पांडुरंग आणि चांगदेवांच्या दृष्टीने, आमच्या सांगता न येऊ शकणा-या व्यथांचे नेमाडे हे उद्गाते आहेत. काहीतरी काल्पनिक प्रेमाचे खेळ रंगवणा-या तत्कालीन साहित्याच्या जगात पांडुरंग आणि चांगदेव यांची नुसती एन्ट्री करून देणंच नव्हे तर आज अर्धशतकभर अढळ झालेलं नायकत्वही त्यांना बहाल करून देणं हे नेमाडेंच्या लेखणीचं असामान्य कर्तृत्व आहे. आजवर सलग चार-सहा पिढ्या तहहयात कोसलाच्या प्रेमात पडून गेल्या, त्या उगीच नव्हे.

व्यक्तिश: माझ्यासंदर्भात बोलायचे तर कोसला आणि चांगदेव चतुष्टयबद्दल माझ्या मनात कितीही प्रेम असलं तरी खुद्द नेमाडेंशी परिचय होण्याचा कधी योग आला नव्हता. काही कारणही नव्हते. गेल्या वर्षी ‘साहित्य सूची’ या दिवाळी अंकाने ‘कोसला’, जीएंची ‘कैरी’ आणि बोकिलांची ‘शाळा’ या साहित्यकृतींचे सिक्वेल लेखन स्पर्धा आयोजित केली, त्यात मी लिहिलेल्या ‘कोसला’च्या ‘उत्तरार्ध’ या सिक्वेलला पहिले पारितोषिक जाहीर झाले. त्यानंतर संजय भास्कर जोशींच्या सांगण्यावरून मी ही छोटेखानी कथा नेमाडेंना पाठवली. ते ‘हिंदू’चे पुढचे भाग लिहिण्यात व्यस्त आहेत, सिमल्याला त्यांचे काही संशोधन चालू आहे, साहित्य अकादमीचेही काही काम ते पाहत असतात, वगैरे गोष्टी ऐकून होतो. असं काही लेखन त्यांच्याकडे पाठवून, त्यांना वाचायला लावून, त्यांच्याकडून त्यावर अभिप्राय मिळण्याची अपेक्षा ठेवणे ही गोष्ट मला त्यांचा महत्वाचा वेळ खाण्यासारखे वाटत होते. त्यामुळे काही दिवस टाळाटाळ करत राहून शेवटी कधीतरी मी ती कथा नेमाडेंना पाठवली आणि नंतर ती गोष्ट डोक्यातून काढून टाकली. दोनेक महिन्यांनंतर एकेदिवशी मला नेमाडेंचे हस्ताक्षरात लिहिलेले पत्र आले. त्यात ‘कोसला तुम्हीच लिहिली आहे की काय अशी मला शंका आली इतकी तुमची शैली मोह पाडणारी आहे.’ असे एक वाक्य होते. ते वाचताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला. ज्या लेखकाला आजवर आपण साहित्यातलं सर्वोच्च शिखर मानत आलो, त्यांच्याकडून आपल्या लेखनाबद्दल अशी एका वाक्यात का होईना तारीफ ऐकायला मिळणं ही माझ्यालेखी निव्वळ निव्वळ थोर गोष्ट होती.

मी संजय जोशींना म्हणालो, यापुढे साहित्यातलं कुठलंही बक्षीस मला मिळालं नाही तरी चालेल. नेमाडेंची दाद ही माझ्या लेखी कुठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाची गोष्ट आहे.’

संजय जोशी माझ्या या म्हणण्याशी शंभर हिश्श्यांनी सहमत झाले ही अत्यंत साहजिक गोष्ट होती. तुम्ही य:कश्चित् बालाजी सुतार असा की नावाजलेले लेखक-समीक्षक संजय भास्कर जोशी असा, भालचंद्र नेमाडे या लेखकाशी तुमचं प्रेमप्रकरण नाही असं घडूच शकत नाही. तुम्ही कबूल करा किंवा करू नका.

-  ‘कादंबरीकार भालचंद्र नेमाडे’ हे माझं प्रेमप्रकरण आहे, हे मला कबूल आहे.

-----0-----

 (पूर्वप्रकाशित- नवाक्षर दर्शन (ऑक्टो-नोव्हें-डिसें. २०१५ ) 
-  बालाजी सुतार, अंबाजोगाई.

Comments

  1. मला कोसला काही फार रुचलेली नाही, का ते ठाऊक नाही. त्यामुळे मी त्यांच्या प्रेमात वगैरे पडणं शक्य नाही. परंतु तुझ्या या लिखाणाच्या प्रेमात जरूर पडलेय. लेखकावर प्रेम करावं तर असं. तुझ्यासारखे रसिक लाभणं हे नेमाड्यांचं भाग्य.

    ReplyDelete
    Replies
    1. खरं सांगायचं तर असा लेखक लाभणं हे आमचं भाग्य.

      Delete
    2. दोन्ही रे. जिवंतपणी कौतुक पाहाणंही अनेक कलाकारांच्या नशिबात नसतं ना.

      Delete
  2. Kosala ani Hindu kharach premat padnya sarkhyach. Hindu bahyankar aani aafat aahe. kaal, jagaa aani tyatali manase pasaratach jatat. wachana sampalyawar apan kuthun kuthawar aalo yachi janiv hote. towar apan fakt nayaka sobata dang houn chalat rahayacha.
    Tumhi he je lihalay te jabardast, itarweli sarkhech!

    ReplyDelete
    Replies
    1. अगदीच. हिंदू निव्वळ अफाट आहे.

      Delete
  3. सिक्वल वाचू द्या कि आम्हाला

    ReplyDelete
  4. अप्रतिम लिहिलय तुम्ही...खरे म्हणजे एखादी गोष्ट जितकी जास्त आवडत असेल तिच्याविषयी नेमके आणि आटोपशिर लिहिणे हे तितकेच अवघड असते.मात्र तुम्ही जणू आवडण्याच्या भावनेतला धागा धागा सुटा करून उचलला आहे.कोसलाचा सिक्वेल वाचायला कुठे मिळेल?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, सर. त्या निवडक सिक्वेल कथांचा एक संग्रह येतोय. आला की मी सांगेन तुम्हाला इथेच.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध