पाचोळा: समकालीनत्वाची पन्नास वर्षे

मी सहावीसातवीला असेन शाळेत. आमच्या चिमूटभर गावात शेजारच्या गावाहून एक टेलर आला. त्याआधी आमच्या गावात शिंपी होतेच, अर्थात. पण ते फक्त बाप्यांचं खमीस किंवा बायकांच्या चोळ्या किंवा पोराटोरांच्या आडमाप चड्ड्या वगैरे शिवत असत.  त्यांची दुकानं म्हणजे त्यांच्या घरातल्या ढाळजेत किंवा पुढच्या टीचभर ओट्यावर छपराचा आडोसा करून तिथे मांडलेलं शिवणयंत्र. कापड मोजायची टेपसुद्धा नसे त्यांच्याकडे. वीत–टीच, बोटे-कांडे अशा मापाने जुन्या कपड्यावरून अदमासाने बेतून ते खमीस शिवून द्यायचे. पोरांची चड्ड्यासदरे तर नुसत्या नजरेनेच माप घेऊन शिवली जात. ‘फिटिंगचे कपडे’ वगैरे काही मामलाच नसे. साधारण एकोणीसशे पंचाऐंशी-शहाऐंशीच्या दरम्यानची ही गोष्ट. गावाला शहरी वारा नव्हता अजिबात. मला आठवतं, गावातल्या कुठल्याही दुकानावर दुकानाच्या नावाचा बोर्ड नव्हता. दोनचार बारकी किराणा दुकाने होती. त्यांना फलाण्या मारवाड्याचं दुकान, बिस्तान्या वाण्याचं दुकान असं थेट मालकाच्या नावाने ओळखलं जायचं.  एकुणातच कृष्णधवल टीव्हीतल्या चित्रासारखा बिनमोहक काळ होता तो. अशात, बाहेरगावाहून आलेला तो टेलर स्वत:सोबत अनेक नव्या गोष्टी घेऊन आला. प्रथमदर्शनीच डोळ्यांत भरणारी गोष्ट म्हणजे त्याच्या दुकानावरची मोठी रंगीत पाटी. ‘फॅशन टेलर्स’. आणि पुढे ‘प्रो. अमुकतमुक’ असं लिहिलेलं. त्याने ती पाटी लिहायला पेंटरसुद्धा जवळच्या शहरातला म्हणजे अंबाजोगाईचा आणला होता. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याच्या दुकानात पुढच्या बाजूला सनमायकाचं मोठं चकचकीत काउंटर होतं. आणि सगळ्यांहून भारी गोष्ट, त्या टेलरच्या दुकानात एक सणसणीत टेपरेकॉर्डर होता आणि त्यातून अष्टौप्रहर भळभळती हिंदी गाणी वाजत असत. ‘फॅशन टेलर्स’ गावात आलं, आणि गावातले आधीचे खमीस शिवणारे शिंपी संथपणे दृश्यातून नाहीसे होत गेले. ते बादच होत गेले धंद्यातून. घरासमोरच्या कुडाच्या छपरातच शिंपीकाम करत बसणारा आमच्याच गल्लीतला नाना तेली नावाचा टेलर हळूहळू वावरात कामाला जायला लागला. काही काळ गेल्यावर तर नानाने त्याच्या ‘मिसनीचं मुंडकं’ पाट्यावरून उपसून घरात कायमस्वरूपी बंदोबस्तात ठेऊन दिलं आणि नानाच्या छपरात भोरग्याने झाकून ठेवलेलं मिसनीचं ‘खोड’ फक्त दिसत राहिलं. फॅशन टेलर्सने गावात आणलेल्या डिस्कोयुगातल्या फॅशनी कापडावर उतरणं हे नाना तेल्याच्या ताकदीबाहेरचं काम होतं. नाना मग कायमचा शेतमजूर होऊन गेला.

नाना तेल्याचं टेलरकीच्या धंद्यातून आपसूक नामशेष होणं ही गोष्ट बाकी गावाच्या दृष्टीने इतकी अदखलपात्र होती, की माझ्या त्या वयात तेव्हा कधी ती लक्षातच आली नव्हती.  फॅशन टेलर्सच्या दुकानाच्या दारावरून सकाळी शाळेत जाताना, दुपारी शाळेतून परतताना, दुकानातून वाहत बाहेर येणारी ‘बेताब’मधली ‘जब हम जवां होंगे, जाने कहां होंगे, लेकीन जहां होंगे, वहांपर याद करेंगे , तुझे याद करेंगे..’ वगैरे ‘दिलात काहूर उठवणारी’ गाणी हमखास ऐकायला मिळायची, तेव्हा आम्हा पोरांना वाटायचं की सालं फॅशन टेलर्स आपल्या गावात आलं ही केवढी मोठ्ठी गोष्ट आहे! त्या उठवळ हिंदी गाण्यांतून प्रेम, प्यार, इश्क, मोहब्बत, सनम, बालमा वगैरे नवीच भाषा ऐकून उल्लू झालेली तरणी पोरे आणि गावातले ऐपतदार दांडगे लोक, कुणी शर्यत लावावी, तितक्या वेगाने फॅशन टेलर्सचे गि-हाईक होऊन बसले. आणि गावातले नाना, दादा, आबा टेलर क्रमश: संपत गेले. कुणी स्वत:च्या वावरात लक्ष घालायला लागले, कुणी इतरांच्या वावरात मजूर म्हणून राबायला गेले.  

एका कुशल शिंप्याने काही तितक्याशा कुशल नसलेल्या कारागीरांना धंद्यातून उठवलं होतं. ‘उठवलं होतं’ म्हणणंही तितकंसं योग्य नाही. नव्या शस्त्रांनिशी आक्रमणं होतात, तेव्हा जुन्या जीर्ण राजवटी किंचितशाही धक्क्याने कोसळून पडतात, असं जगाच्या इतिहासात पानोपानी पाहायला मिळतंच.  

रा.रं. बोराडेंची पाचोळा ही कादंबरी मी त्यापुढे सहाआठ वर्षांनी माझ्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून वाचली. ती वाचताना मला नाना तेल्याच्या ‘पाचोळा असण्याचे’ संदर्भ लागत गेले असतील कदाचित. नाना तेली आणि गंगाराम शिंपी यांच्यात; आणि पाचोळातला गरड आणि आमच्यातला फॅशन टेलर यांच्यात काहीतरी सहसंबंध आहे, हे मला उमगलं असेल. ‘साहित्यातून आलेली ही गंगारामची गोष्ट’ भोवतालाची शिव ओलांडून प्रत्यक्ष आपल्या गावातही घडू शकते, असंही माझ्या लक्षात आलं असेल कदाचित. 

आता नक्की आठवत नाही, नक्की काय काय वाटलं होतं मला पाचोळा वाचताना. 

पाचोळातल्या, गावात बळजोर असणा-या कुणा ‘गरड’ आडनावाच्या ‘खलनायकाने’ पैशाचं बळ वापरून गावात नवा ‘आधुनिक’ टेलर आणून बसवला आणि गरडाच्या तुलनेत पाचोळ्याइतकीच शक्ती असलेल्या गंगाराम शिंप्याचं आयुष्य भविष्यात उद्भवू शकणा-या बेकारीच्या अटळ वावटळीवर स्वार होऊन निव्वळ वाराहुरा झालं, ही गोष्ट वाचताना मला कदाचित माझा एक सोयरासुद्धा आठवला असेल. हा सोयरा पिढीजात सुतारकाम करायचा. गावातल्या एका दांडगट आणि पैसेबुडव्या ‘गरडाचं’ औत तयार करून दिलं नाही, म्हणून त्या दांडगटाने याची सुतारकामाची हत्यारं उचलून नेली. सुतार त्याच्या मागे धावला- धावला, आणि बळजोर गरडाने आईबहिणीवरून दिलेल्या शिव्या न सोसवून, मनस्ताप आणि क्षोभ अनावर होऊन शिवारात गेला सैरभैर; आणि तिकडे कुणाच्या तरी बांधावरच्या बाभळीला त्याने गळ्यात दोर अडकवून घेतला. पाचोळातला गरड वाचताना मला माझ्या गावातला ‘गरड’ आठवला असणार. पाचोळातला गंगाराम शिंपी वाचताना मला गावातल्या नाना तेल्यासोबतच तो दुबळा सुतारही  आठवला असेल. 

दुबळ्यांना जागाच नसावी अशीच एकूण व्यवस्था आपली.

निदान त्या काळात तरी, किंबहुना आजही, गावगाड्यात असं होतं की तिथल्या रहाटीत एकट्यादुकट्या अशक्तांना काही किंमतच नसे. म्हणजे तुम्ही असा उलटा विचार केला की समजा गरडाचं त्याच्या ‘वाड्या’बाहेर मिसनकामाचं दुकान होतं आणि गंगाराम शिंप्याने आपल्या छपरात एक मिसन मांडून त्याला आव्हान द्यायचा प्रयत्न केला असता, तर काय घडलं असतं? तर कदाचित, गरडाने एखाद्या रात्री गंगारामचं छप्पर शिलगावून दिलं असतं. गरड जरासा अधिक रासवट असता, तर त्याने गंगारामला खापलूनसुद्धा टाकलं असतं. पाचोळातला गरड अधिक आतल्या गाठीचा आहे. तो अजगरासारखा संथपणे गंगारामाला गिळून गेला. 

कादंबरीत कुठेही स्वत:हून समोर न आलेल्या या ‘गरड’ नामक माणसाची एक विक्राळ अशी सावली कादंबरीच्या सबंध अवकाशाला व्यापून उरलेली आहे. गरड स्वत: समोर आला असता, तर त्याने स्वत:च्या बाजूने काही युक्तिवाद केलाही असता. पण कादंबरी पारबतीच्या मुखातून येते आहे. पारबती ही खेड्यातली एक अश्राप बाई आहे. तिच्या घराबाहेरच्या पुरुषांना तिच्या आयुष्यात जागा नाही, ती गरडाला त्याच्या कक्षेत जाऊन जाब विचारू शकत नाही. ती फक्त जागच्या जागी तळमळू शकते, शिव्याशाप देऊ शकते. ती नव-याला सावरण्याचा प्रयत्न करू शकते, किंवा ती मुलाला समजावण्याचा प्रयत्न करू शकते. त्यापलीकडच्या गोष्टी तिच्या परिघाबाहेरच्या आहेत. 

‘गंगाराम शिंपी’ हे एका ताठर हतबलतेचं नाव असेल, तर पारबती हे त्या हतबलतेतून होणा-या फरफटीचं नाव असतं. आणि गरड हे त्या हतबल फरफटीमागचं अमानवी ‘कळसूत्र’ आहे.  

पाचोळा वाचताना मला वाटलं असेल की दरेकच गावात निदान एकेकतरी गरड असतो, आणि तो दर गावातल्या कुणाही गंगाराम-पारबतीच्या, भानाच्या, तानीच्या आयुष्याचा पाचोळा करण्याची ताकद राखून असतो. 

आता, इतक्या वर्षांनी पाचोळाकडे पाहताना माझ्या लक्षात येतं, की, ‘पाचोळाचं मोठेपण’ हे आहे, की, ती दर काळात, दर गावात, दर व्यवसायातल्या माणसासोबत घडू शकणारी गोष्ट आहे. बळजोर आणि अशक्ताच्या दरम्यान दर युगात खेळला जाणारा क्रूर खेळ आहे हा. आणि त्या खेळाच्या पटावरचा मोहरा असलेल्या, स्वभावात विशिष्ट गुणदोष असलेल्या कुणाही माणसाची घडू शकेल अशी अपरिहार्य शोकांतिका म्हणजे ‘पाचोळा’ ही कादंबरी आहे!

एक बारीकसं पारंपारिक खेडेगाव आहे. तिथे गंगाराम शिंपी आहे. त्याची पारबती नावाची बायको आहे. कळत्या वयाच्या सीमेवर असलेला भाना नावाचा मुलगा आहे आणि सतत खायला मागणारी ‘तानी’ नावाची न-कळत्या वयाची एक पोरगी आहे. गंगाराम गावाचं ‘शिवणं’ शिवतो. पारबती घर सांभाळते आणि काही मोलमजुरीही करते. भाना शाळेत शिकतो. (तो वर्गातला पहिल्या-दुस-या नंबरातला विद्यार्थी आहे.) तानी अजून तान्ही आहे, तिला फक्त रडून दाखवता येतं. रडलो तरच आपल्याला खायला मिळतं, याची जाण त्या अजाण जिवाकडे आहे.  गंगाराम थोडा तापट स्वभावाचा आहे. गरीबाकडे असू नये, अशी त्याच्या मनात एक सणकी रगही आहे. भानाला शिकायचं आहे. पारबतीची आपल्या संसाराबद्दल फारशी काही तक्रार नाहीये. कादंबरीत ती पहिलंच वाक्य बोलते, ते “बरं चाल्लं व्हतं. कुणाचं एक न्हवतं का दोन न्हवतं.” असं.  

गोष्टीचं असं ‘बरं’ चाललेलं असताना, बापाच्या जुन्या धोतराला ‘दंड घालायला’ म्हणून तिथं गरडाचं कारटं येतं, गरड पैसापानी पाळून असलेला माणूस. तो ‘नवे कपडे तालुक्याहून शिवून आणतो, मग जुने माझ्याकडे कशाला घेऊन येतो?” अशी, गंगारामच्या मनात आधीच कधीतरी पडलेली ठिणगी भडकून उठते, आणि पारबतीच्या घरादाराची बरी चाललेली गोष्ट बिघडायला सुरुवात होते. मनातले तिढे बोलून न दाखवता मनातच ठेवून गरड उठतो आणि चारआठ दिवसात तो नवा शिंपीच गावात घेऊन येतो. 

गोष्ट सोपी आहे. तिच्यात फार आढेवेढे नाहीत, किंवा चकवे नाहीत. कथेची सुरुवात वाचल्याबरोबर तिच्यातून आकाराला येऊ शकेल अशा अंताचा अंदाज येऊ शकेल. कथेचा आरंभबिंदू ‘हा’ आहे, तर तिची ‘ठोस अटळ परिणती’ काय असू शकेल, असा अंदाज. या ‘सुरुवातीचा शेवट’ कादंबरीत झाला, तसाच होऊ शकतो केवळ. या गोष्टीला वेगळा शेवट संभवतच नाही, कारण गंगाराम शिंपी किंवा गरड यांचे स्वभावधर्म केवळ त्याच एका विवक्षित शोकात्म अंताला कारक ठरणारे आहेत. 

एरवीही, म्हणजे, या कादंबरीच्या बाहेरच्या जगातही, जगण्याच्या धारेत वाहत येणा-या गोष्टी नियंत्रित करणं गंगाराम शिंप्याच्या, त्याच्या पारबती नावाच्या बायकोच्या किंवा भाना नावाच्या मनस्वी पोराच्या हातात फारच क्वचितदा असतं.

जी.ए. कुलकर्ण्यांच्या कथांमधून सतत प्रकटत असते; तशी, नियती नावाची एक गोष्ट असते, आणि ती विशेषत: अशक्तांच्या आयुष्याचं फार जहरी नियंत्रण करत असते. तिथे त्या माणसाच्या कर्तृत्वाला काही संधीच नसते. ना त्याच्या इच्छेला काही जागा असते नियतीच्या पटावर. गंगाराम शिंपी मरून पडतो, तेव्हाही, भुकेने व्याकूळ होऊन वाटी आपटून आपटून काल्याचा घास मागत असलेली तानी नावाची नियती सतत फक्त आपला स्वत:चा घास मागत असते. नियती मानणा-या किंवा नियतीच्या डावात सोंगटी म्हणून वापरल्या जाणा-या कुणाच्याही हातात कथेचा शेवट बदलण्याचं बळ नसतं. पाचोळाचा शेवट कितीही जिव्हारी लागणारा असला, तरी तो तसाच अटळ असतो. 

कसलेली उमाळे न आणता, कुठलेही ‘साहित्यिक’ गहिवर न सांडता, एका तटस्थ बिंदूवर उभे राहून लेखक रा. रं. बोराडेंनी ही अटळ कादंबरी लिहिली आहे,  हे त्यांचं खास असं लेखकीय यश आहे. 

नवे कपडे शहरातून रोख पैसे देऊन शिवून आणणा-या गरड नावाच्या माणसाच्या फाटलेल्या धोतराला गंगाराम शिंप्याने फक्त एक ‘टीप’ घालून दिली असती, तर कदाचित हा शेवट वेगळा असला असता. पण मग कदाचित ही गोष्टच आकाराला आली नसती. मग गरडाने नवा टेलर गावात आणला नसता. नवा टेलर आला नसता, तर गंगारामने आपल्या भाना नावाच्या शाळेत अभ्यासात हुशार असलेल्या मुलाला त्याच्या मनाविरुद्ध शाळा सोडायला लावली नसती, त्याला ‘शिवणं’ शिकायला लातूरला ठेवलं नसतं, लातुरातल्या टेलरने भानाला शिवीगाळ केली नसती, दुखावलेला भाना परत घरी आला नसता, बापलेकांत झगडा उभा राहिला नसता, पोरगा तयार होत नाही म्हणून स्वत: गंगारामच ‘फॅशनेबल शिवणं’ शिकायला गेला नसता आणि त्याला लातुरातल्या टेलरने फसवलं नसतं, गंगाराम स्वत:ही तिथे मारामारी करून परत आला नसता, त्याच्या मिसनीचं मुंडकं चोरीला गेलं नसतं, अपु-या अन्नामुळे आणि जोरकस मानसिक ताणामुळे गंगारामला ‘खिया’रोग म्हणजे क्षयरोग डसला नसता आणि सगळ्यात शेवटी पोटच्या पोराने स्वत:च्या आईच्या गरोदरपणाचा उल्लेख नको त्या भाषेत केला नसता, तर ‘मानंखालनं रगताचा लोटच्या लोट’ येऊन घराच्या ओसरीवर गंगाराम शिंपी तसा एकाकी मरून पडला नसता. त्याच्या सबंध घरादाराचा पाचोळा झाला नसता.

पण, हे असं ‘अमुक घडलं नसतं, तर तमुक झालं नसतं’ असं म्हणण्यात काही अर्थ नाही. 

जे घडलं, ते घडलं, आणि त्यात गंगाराम पाचोळ्यासारखा उडून गेला, एवढंच खरं! अत्यंत बेतीव वाटतील अशा गोष्टी चहूबाजूंनी घडत जातात, तेव्हा गोष्टीचा असा अटळ शेवट होतो. म्हणजे सबंध कादंबरीत तुम्ही पाहा, एकही घटना, एकही प्रसंग असा घडत नाही, की वाचकाला वाटेल की आता गंगारामचं भलं होऊ शकेल. हाल आणि अपमान सहन करून भाना निमूटपणे लातूरमध्ये शिलाईकाम शिकला असता, तर चाललं असतं. पण शाळा सोडून लातूरला जाण्याचा विषय निघतो, तेव्हाच तुमच्या लक्षात यायला लागतं की हे असं होणार नाही. हा पोरगा तिकडे नीट राहू, शिकू, जगू शकणार नाही.  काहीतरी विपरीत होऊन, घडून, करून तो परत येणार आणि गंगारामपुढचा पेच बिकट करून ठेवणार. हेच सगळं असंच नेमकं गंगाराम स्वत: शिलाईकाम शिकण्यासाठी लातूरला जायला निघतो, तेव्हाही आपल्याला वाटत राहतं. लेखकाने (किंवा लेखनाबाहेरच्या जगात ‘नियती’ने) एक विशिष्ट असा पक्का आरंभबिंदू पकडलेला असला, की तिचा विवक्षित शेवटही ठरूनच गेलेला असतो. म्हणजे पुरुषोत्तम बोरकरांच्या मेड इन इंडियामध्ये पंजाबरावचा प्रवास शेवटाकडे जसा अत्यंत अकल्पितपणे वेगळ्या वाटेवर जातो, किंवा (अनेकांनी पाचोळाची जिच्याशी तुलना केली, त्या) उद्धव शेळकेंच्या ‘धग’च्या शेवटचं वाक्य जसं नामाच्या मनातली चिवट उमेद अजून सरलेली नाही, कादंबरी संपली असली तरी, कुठल्याही क्षणी त्याला मामाचं पत्र येईल आणि त्याच्या आयुष्यात उजेडाचा किंचितसा कवडसा येईल, असं वाटत राहतं, तसं काहीही पाचोळात घडत नाही. 

सगळ्या आशा सरून गेलेल्या अवस्थेत पाचोळा संपते. 

अटळ शेवट तो हाच. 

गोष्ट एवढीच आहे. पण ती एवढ्याचीच नाही. म्हणजे तिथे गंगाराम शिंप्याच्या कुटुंबांऐवजी (बोराडे स्वत:च कादंबरीच्या शेवटी दिलेल्या ‘जन्मकथेत’ म्हणाले आहेत, तसं,) ‘सुवर्णबंदी’च्या काळात धंद्यातून उखडलेला गंगाराम सोनार असू शकला असता. किंवा सोनार किंवा कुणीही. तिथे गंगाराम सुतार किंवा गंगाराम चांभार, गंगाराम कोष्टी, वीज-पूर्व-काळात विहिरींवर असत असलेली डिझेलची इंजिने दुरुस्त करणारा गंगाराम मिस्त्री किंवा गावात पाणीपुरवठा योजनेची टाकी येण्याअगोदर आणि नंतरच्या काळातला, रेड्यावरून पखालींनी पाणी आणून घरोघर देणारा गंगाराम पखाल्या असला असता, तरी, कादंबरीतल्या पेचप्रसंगांचा तपशील बदलला असता, पण तत्व कायम राहिलं असतं. म्हणजे आमच्या गावातल्या गणेश मारवाड्याने त्याच्या दुकानात नायलॉनची दोरखंडे ठेवायला चालू केल्यावर शिवारातून केकताड काढून आणून, ओढ्यात भिजवून, त्याचा वाख काढून कासरा, च-हाटं वळून देणारा गावातला किसन वाघमारे कसा आपोआप संपत गेला, ही गोष्टही पाचोळाच्या केंद्रस्थानी येऊच शकली असती.  

हे लिहित असताना, मला आठवले- पंधराएक वर्षांआधी गावोगाव असत असलेले ‘पेंटर’. देवाची ‘सेवा’ म्हणून गावातल्या हनुमानाच्या देवळातल्या भिंतींवर पौराणिक चित्रं काढणारे, दुकानांच्या पाट्या रंगवणारे, घरांच्या भिंती रंगवून तीवर किरकोळ जाहिराती लिहिणारे, पांढ-या कापडावर निळ्या किंवा तांबड्या ‘वार्निश’ने पुढा-यांच्या कार्यक्रमांचे बॅनर रंगवणारे पेंटर. काळाच्या रेट्यात, अचानकपणे डीटीपी आणि फ्लेक्स प्रिंटर अवतरले आणि हे गावागावात रंगकाम करणारे पेंटरलोक एका फटक्यासरशी ‘गंगाराम शिंपी’ होऊन बसले. 

पन्नास वर्षांच्या आधीचा गंगाराम शिंपी असू देत, किंवा पन्नास वर्षांनंतरचा, ‘लेथ जोशी’ नावाच्या चर्चित मराठी चित्रपटातला लेथ मशीनवर काम करण्यात हयात गेलेली असताना कॉम्प्युटरवर जॉब घडवण्याचं तंत्रज्ञान आल्याने एकाएकी बेकार झालेला लेथ जोशी असो; मध्यम किंवा उतारवयात असताना आपल्या हातातलं रोजगारनिर्मितीचं औजार नष्ट होणं, यातली विदारकता सगळीकडे समकालीन असणार.

या अर्थाने, ‘पाचोळा’ ही कादंबरी या निकषावर आज इसवी सनाच्या अर्धशतकभर सतत समकालीन उरलेली आहे.

कादंबरीचा पट फारसा विशाल नाही, पण वाचकाला संथपणे भाजत जाणारी एक धग तिच्यात आहे. कादंबरीतून क्रमश: उलगडत आणि उध्वस्त होत जाणारं पारबतीचं जग वाचकाला गलबलून सोडणारं आहे. बापाच्या एककल्ली हट्टापायी शिक्षण सुटून डोळ्यांसमोर आयुष्याची होळी होऊ पाहत असलेल्या पोरसवदा भानाची तगमग अस्वस्थ करणारी आहे, आणि निरामय जगण्याचं सूत्र आपल्या हातातून वेगाने सुटून जात असल्याच्या जाणीवेने होणारी गंगारामची दुबळी तडफड आपल्यालाही हताश करून सोडणारी आहे. 

लातूरच्या परिसरातल्या एका बारीकशा खेड्यातल्या पारंपरिकपणे सोशिक अशा स्त्रीसुलभ भाषेतून कथन होणारी ही गोष्ट तिच्यातल्या अनलंकृत भाषेमुळे वाचकांना अधिक भिडते. या कादंबरीतले सगळे प्रसंग, सगळ्या घटना पारबतीच्या कथनातून समोर येतात तेव्हा त्यात खेड्यातल्या अशिक्षित, राबणा-या बाईच्या मनातली आपल्या घरट्याबद्दलची सगळी ओल, ऊब, वत्सलता आणि कणव आणि खचत चाललेल्या संसाराला तोलत राहण्याची तिची धडपड या गोष्टींचं साहचर्य सतत जाणवत राहतं. 

संपूर्णपणे बोलीभाषेत लिहिलेल्या; तरीही साहित्याच्या ‘मेनस्ट्रीम’मध्ये दखलपात्र ठरलेल्या फार कमी कादंब-या मराठीत असतील, त्यात ‘पाचोळा’ पहिलीच असेल कदाचित. ती खेड्यातल्या दैनंदिन जगण्याची भाषा असल्यामुळे असेल, ग्रामीण साहित्याच्या चळवळीचे एक अध्वर्यू असलेल्या रा.रं. बोराडेंनी ही भाषा कुठेही दुर्बोध होऊ दिलेली नाही. किंबहुना, ‘पाचोळातून आलेली बोलीभाषा’ हा एका स्वतंत्र लेखाचा, अभ्यासाचा विषय होऊ शकेल.

एखादी साहित्यकृती सतत पन्नासभर वर्षे वाचकांच्या हातात रेंगाळत राहते, हे तिचं यश मोजण्याचे एक ‘एकक’ मानले, तर ‘पाचोळा ही या अर्धशतकातली एक महत्त्वाची कादंबरी आहे‘ हे विधान निर्विवादपणे मागे उरणारे आहे.

भौतिक, मानसिक पातळीवर वेगवान बदलांचा आणि एकूणच मूल्यांच्या आक्रमक फेरमांडणीचा काळ अवतरलेला असूनही पन्नास वर्षे सतत समकालीन उरणं, अजिबात सोपं नसणार. 

‘पाचोळा’ या सबंध संक्रमणकाळावर तरून राहिलेली साहित्यकृती आहे, एवढं नक्की! 

---0---

(पूर्वप्रकाशित- 'प्रतिष्ठान' -  जानेवारी-एप्रिल-2021)

-  बालाजी सुतार.

Comments

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध