सातपाटील : काळाची गोष्ट

'ज्याने त्याने आपला आपला वासोटा आणि कासोटा जिंकावा'. (सातपाटील कुलवृत्तांत. पृ.क्र. ६८१) 

'वासोटा' हे महाराष्ट्रातल्या एका किल्ल्याचं नाव आहे, त्याचा कदाचित हा संदर्भ असेल. ज्याने त्याने आपापल्या आयुष्यात किल्यासारखं भव्य अवघड असं काही जिंकावं असा भावार्थ. आणि कासोटा जिंकावा. 'कासोटा' म्हणजे बाईच्या लुगड्याचा काष्टा, बहुधा. 'कासोटा जिंकणं' म्हणजे 'आपल्या आपल्या प्रेमाची बाई जिंकणं' हेसुद्धा किल्ला जिंकण्यासारखंच भव्य अवघड काम. वासोटा जिंकण्याइतकी धमक तुमच्यात असेल तर तुम्ही कासोटाही जिंकत राहता. म्हणजे साधा मेंढपाळ शिरपती असाल तरी तुम्ही ब्राह्मण एडके देशमुखाच्या स्त्रीला जिंकता, साहेबराव असाल तर पठाण आर्यानाबाईला जिंकता, दसरत असाल तर अफगाणी आफियाला, पिराजी असाल तर उल्फी कोल्हाटणीला, शंभूराव असाल तर देऊबाईला. माणूस जे जे काही करतो ते ते सत्ता, संपत्तीसाठी आणि अतिशय अंतिमत: सुंदरीच्या प्राप्तीसाठीच करतो, असं एरवी फ्राईड वगैरे लोकांनीही लिहून ठेवलेलं आहेच. फारतर असं म्हणता येईल की या तिन्ही गोष्टी एकमेकांचा अनुषंग म्हणूनच येतात. दुबळ्या, म्हणजे वासोटा जिंकता आला नाही अशा, माणसाला सत्ता किंवा सुंदरी मिळणं अवघड. मिळाली तरी लाभणं, टिकणं अवघड.   

थोडक्यात असं, की, ज्यांनी आधी वासोट्याला गवसणी घातलेली असते,  त्यांना पुढे त्यांचा त्यांचा कासोटाही जिंकता येतो. (बदल्यात एखाद्याला कधीकधी स्वत:चं 'आंडदोर' तोडून घेण्याच्याही वाटेवर प्रवास करावा लागतो, पण ‘वासोटा’ इतपत विलक्षणही असूच शकतो.). फार आदिकाळापासूनच लढाईची सांगड पौरुषाशी घालतात आपल्याकडे. लढाईत जय झालेला पुरुष म्हणजे पौरुषवान नर. आणि पौरुषाची सांगड इप्सित स्त्रीच्या किंवा एकूणच स्त्रीच्या प्राप्तीशी. स्त्री-पुरुषाच्या दरम्यानचे, ज्यात मुख्यत: शरीरसंबंध गृहीत धरलेले असतात, ते, आदिम आणि प्रमाथी संबंध, निदान एकेकाळी तरी पुरुषाचं शरीरसामर्थ्य आणि स्त्रीचं शारीरसौंदर्य याच पायांवर आधारलेले असत. स्त्री-पुरुषांची ही देहवैशिष्ट्येच त्यांची बलस्थाने असतात असं मानलं जाई. आणि ते निदान शंभरएक वर्षांआधीपर्यंत तरी खरंच असणार. किंवा नंतर म्हणजे देवनाथ सातपाटलाचा जन्म होईपर्यंतच्या काळापर्यंतही. पुढे भरपूर मालमत्ता किंवा चांगल्या पगाराची नोकरी ही पुरुषाने स्त्रीला आकृष्ट करून घेण्यातली कारक-शक्ती ठरलीही असेल, पण ‘स्त्री-पुरुष व्यवहारात’ ती फारच बाजारू गोष्ट ठरते. पुरुषाची बुलंद हिंमतवान छाती आणि स्त्रीचं खेचक सौंदर्य याच मुळातल्या गोष्टी, अर्थात त्यापलीकडचं व्यवहारी असंही काही असू शकेलच. उदाहरणार्थ शंभूराव सातपाटलाला खानावळवाली देऊबाई स्वच्छपणे म्हणते की ‘मी अशी अशी आहे आणि तुम्ही मला आवडता, तर तुम्ही मला 'ठेवा'. मी तुमच्याकडे राहीन’. हा स्वच्छ व्यवहाराचा भाग दिसत असला तरी, त्यातही शंभूरावाची ‘ठेवण्याची’ आणि देऊबाईची ‘राहण्याची’ क्षमता, याच गोष्टी अधिक मूलभूत. देऊबाईला 'ठेवून' घेतल्यावर नावापुरतं तिचं विठोबाशी लग्न लावून देऊन तिला मूल व्हायला आल्यावर विधीसंमत बायको तेजबाईच्या आग्रहावरून आणखी एका विधीसंमत तुळसाबाईशी लग्न करून घेणं हा व्यवहाराचा भाग असला तरी त्यातही शंभूराव सातपाटलाचं सामर्थ्यच प्रकटत असतं मूलत:. शिवाय ‘मुकी निजवली हाक ना बोंब’ हे केवळ मुकीबद्दलच घडवलं जातं, असं नसतं. ते विठोबासारख्या मुक्याबाबतही घडवून आणता येतं. ज्याचं ‘मनगट खंबीर, तोच हंबीर’ असं सातपाटीलमध्ये जागजागी दिसून येतं. हे केवळ कादंबरीतलं कल्पित नसतं, ती वहिवाटच असते जगाची. हे खंबीर मनगट दिसल्यावर पुढे सातपाटलाची ती देखणी आंजीसुद्धा भरला संसार सोडून उस्मानअलीसोबत बेभान निघून जाते. आणि ती गेल्यावरही तुळाजी सातपाटील हा तिचा नवरा अखेरपर्यंत तिच्या अभिलाषेतच जन्म काढतो, तो तिच्या ‘देण्याची’ क्षमता आणि रिझवण्याची असाधारण हातोटी सतत आठवत राहते, म्हणूनच. 

सातपाटलांच्या वंशातल्या या मेंढपाळ, ब्राह्मण, मराठा, पठाण, कुणबी, अफगाण, कोल्हाटी, इंग्रज आणि मुसलमान इतक्यांनी एकमेकांच्या मनगटाला मनगट जुळवण्याच्या आणि रक्तामध्ये रक्त मिसळवण्याच्या ‘सरमिसळीचा’ प्रवास जिवंत, ताजा, खळाळता वाहायला लागतो, तो थेट बाराशे एकोणनव्वदपासून, अल्लाउद्दीन  खिलजीच्या काळापासून, इसवी सनाच्या दोन हजार एकोणिसाव्या वर्षापर्यंत. उणीपुरी सव्वाआठ शतके म-हाटा, ब्राह्मण, पठाण, अफगाण, कोल्हाटी, अंग्रेज रक्त मिसळत राहतं एकमेकांत. आणि मनगटाला जुळणारं मनगट शोधून, ते दिसलं त्याच झंझावाती जागेवर उभं आयुष्य उधळून देणा-या पुढच्या आंजी आणि उस्मानअलीच्या पिढ्या जन्मत राहतात. 

माणसांमध्ये जे आदिम असतं, जे अंतिमही उरेल अशा चिरंतन तत्वांचा प्रवास चितारणारी, सांगणारी, अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे.

वंश-जात-धर्म श्रेष्ठत्वाचे गंड बाळगून असणा-या (आणि नसणा-याही) लोकांनी नक्की वाचावीच अशी - सातपाटील कुलवृत्तांत!

अर्वाचीन संदर्भाने बोलायचे झाले, तर, या कादंबरीने काळाच्या एका विवक्षित बिंदूवर मराठी साहित्याच्या पटावर प्रवेश केला आहे. असा काळ, जो जातीयतेने भयावह बजबजलेला आहे. नुसत्या जातीयतेनेच नव्हे, विखारी धार्मिकतेनेही छिन्न झालेला समकालाचा तप्त, होरपळता, आणि हजार लांच्छनांनी जखमी झालेला पट. आमच्या जातीने केवढा इतिहास गाजवलेला आहे, आमचे पूर्वज केवढे शुद्ध तेजस्वी निळ्या रक्ताचे होते आणि म्हणून आम्ही स्वत:ही कसे थोर आहोत, एवढंच प्रत्येक जातीतल्या लोकांना सांगायचं आहे. कसंही, बादरायण पद्धतीने का असेना, हे जातीचं, वंशाचं आणि कुळाचं थोरपण सिद्ध करता आलं की ही जातवान माणसं सुखाने मरायला तयार असतात, असा काळ वर्तमान म्हणून अवतरलेला आहे. जातीय, वांशिक श्रेष्ठत्वाच्या भाल्यांनी इतरांना भोसकून मारायचं आणि आपण प्राचीन वंशातले जेते आहोत असा सांगत राहायचं, हीच एक गोष्ट दरेक जातीचा माणूस आक्रमक हिरीरीने करत असल्याचं दिसतं आहे, अशा काळात सातपाटलांचा हा कुलवृत्तांत एका वंशाच्या गावठाणात किती वेगळ्यावेगळ्या शिवारातले ओघ सामावून घेत वाहत आल्याचं सांगतो आहे, हे लक्षात आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनात अधोरेखित होतं ते लेखकाचं धैर्य. रंगनाथ पठारे हे तशा धैर्यासाठी ओळखले जाणारे लेखक आहेतच. त्यांच्या कुठल्याही कादंबरीतून अशा जागा ठिकठिकाणी आहेत, की जिथे लेखकाला हिंमत बांधून लेखणी कागदावर ठेवावी लागावी. नुसती उल्फी अमुक एका जातीची ‘दाखवली’ आहे, हे त्या जातीवर केलेलं आक्रमण आहे एवढंच कुणाच्या मनात यायला उशीर. आणि तिथे उल्फीच असावी असं नाही. एडके देशमुखाची बायको असू देत, किंवा देऊबाईची जात कळू देत लोकांना.

काळ बिकट आहे, आणि रंगनाथ पठारे सातपाटलांच्या रक्तातल्या सरमिसळीची गोष्ट सांगू पाहत आहेत.  

सातपाटील हा नुसता एका जातीतल्या एका घराण्याचा इतिहास आहे का? 

नसावा.

सातपाटील ही नुसती कल्पनेची भरारी आहे का? तसंही नसणार. 

सातपाटील ही  स्त्री-पुरुषसंबंधांच्या दर पिढीतल्या, जशाच्या तशा आधीसारख्याच, आवर्तनांची वर्तुळे आहेत का? वाटत नाही तसंही. सातपाटीलमधून दिसणा-या काळाच्या त्या टप्प्यावर नावे बदलून तीच ती कहाणी पुन:पुन्हा घडताना दिसते,  हे खरं असलं तरी शेवटी देवनाथ सातपाटलाच्या कथनामध्ये त्याचा कारण येतं आहे. या देशात इंग्रजांचं राज्य स्थापन होण्याच्या अगोदरच्या हजारो वर्षांत राजवटी कितीही आणि कुणाच्याही आल्या, स्थिर झाल्या, कोसळल्या आणि नव्यांच्या स्थापित झाल्या असल्या, तरी इथली गावे ठार अचल अविचल अवस्थेतच होती. कुठेतरी दूर राजधानीत राजा बदलला गेला, तरी गावात गावाचा पाटील आणि कुलकर्णी हे जवळजवळ अढळपदावरच बसलेले असत. त्याअर्थाने गावाच्या कारभारात आणि सामान्यांच्या दैनंदिन जगण्यात काही बदल व्हायचं कारणच नव्हतं. कुणबीक करा, रान पिकवा, उरलेल्या वेळेत तलवार हातात घेऊन लढायला जा, हाती लागेल ते लुटून आणा. त्यात मेलात तरी हरकत नाही, घरोघर पोरवडा कमी नसतो. एक मेला तरी जग बुडत नाही. मुख्य म्हणजे अमुक एक राजा आपला आहे, म्हणून त्याच्याच बाजूने लढा असल्याही भानगडी नाहीत. सातपाटीलमध्ये पहिल्याच भागात अवतरलेला शिरपती अल्लाउद्दिन खिलजीच्या बाजूने देवगिरीच्या यादवांच्या विरोधात तलवार चालवून परत गावी येतो, पुन्हा फिरायला म्हणून पैठणला जातो, किंवा आदिलशाहीत सुलतानी सेवेत मराठे सरदार-सैनिक होते किंवा पानिपतच्या वेळी अब्दालीला आमंत्रण देऊन बोलावणारे आपलेच देशी लोक होते, पण त्या त्या काळात त्यांना कुणीही ‘गद्दार’ म्हटलेले नाही. आठशे वर्षांच्या आधीपासून आणि तीनशे वर्षांच्या आधीपर्यंत सैन्यांतून लढण्याविषयक जी समज इथल्या लोकांत होती, ती आजच्या कथित राष्ट्रवादाइतकी एकारलेली अजिबातच नव्हती. आठशे वर्षांआधी स्त्रीने आपला पुरुष निवडण्यासंदर्भात जी समज स्त्रियांमध्ये होती, तीही आजच्या कथित खानदानी स्त्रियांइतकी एकारलेली दिसत नाही. म्हणजे एडके देशमुखाची बायको शिरपतीसारख्या मेंढरे पाळण्याचा धनगरी धंदा करणा-या पुरुषासोबत हिमालयात जाऊ म्हणते, तेव्हा तिच्या मनात कसलेही गंड प्रकटत नाहीत. स्त्रीने आपला पुरुष; किंबहुना मादीने आपला नर निवडावा तितका शुद्ध प्रकार सातपाटीलमध्ये पिढ्यांमागून पिढ्यांमध्ये पुन:पुन्हा घडताना दिसतो.  हे अर्थातच आजच्या मापाने तितकंसं ‘ब्राह्मणी भाषेत सांस्कृतिक’ किंवा ‘बहुजनी भाषेत खानदानी’ वगैरे वाटत नसलं तरी हे त्याहून अधिक मूलभूत आणि मानवी आहे, हे आपल्याला कबूलच करायला लागेल. 

‘सांस्कृतिक किंवा खानदानी असणं’ हे खरंतर आधुनिक जात-पुरुषवर्चस्ववादी काळाने आपल्यावर लादलेलं मूल्य आहे. जसजसे आपण आधुनिक होत गेलो (किंवा स्वत:ला आधुनिक मानत गेलो) तसतसे आपण अधिकाधिक जातीय अधिकाधिक पुरुषवर्चस्ववादी होत गेलो. कधीकाळी इथे मातृसत्ताक व्यवस्था होती, हे कल्पित वाटावं इतकं आपण बदलत गेलो. केवळ निसर्गाशी इमान राखून निखळ, नितळ, शुद्ध जगत आलेल्या आदिम जमातींमध्ये आजसुद्धा असलं कृत्रिम खानदानी काही नसतं. आणि सांस्कृतिकतेभोवती मालकी हक्कांची एक क्रूर साखळी असते. उदाहरणार्थ मध्ययुगात, सबंध जन्मात फारतर एखाददोन वेळा जिच्याशी संग घडला असेल, त्या राणीला किंवा बेगमेला; किंवा अन्य पुरुषांपासून तिला दूर ठेवण्यासाठी पुरुषत्व खच्ची करून तिच्याभोवती उभ्या केलेल्या बलदंड पुरुषांना, तिथे तिथे तसं हात बांधून उभं करणंही सांस्कृतिकच मानलं जात असणार. लग्नाच्या बाईला ‘राखून’ तळमळत ठेवणं आणि पुरुषांनी नवनव्या बायका ठेवणं, या दोन्हीही गोष्टी त्या त्या काळात खानदानी सांस्कृतिकच मानल्या जाणा-या होत्या. आता हे जर असंच असेल, तर मग सातपाटील ही जाणीवपूर्वक प्रच्छन्नतेला बळ देणारी गोष्ट सांगितली गेली आहे का? रंगनाथ पठारेंच्या अन्य लेखनातूनही बळजोर स्वरुपात समोर येतं, तेच स्त्री-पुरुष संबंधांतलं बलशाली सूत्र अधिक ठळकपणे त्यांना इथेही मांडायचं आहे का? की सातपाटील हा कुणब्यांच्या क्षत्रिय मराठ्यांमध्ये रुपांतरीत होण्याची, दर पिढीत नव्या गावठाणात रुजण्याची, ‘कॅल्क्युलेटेड’ धोका पत्करत सुंदर मादित्व असलेली बाई भोगण्याची आणि ते ब-याच अंशी खळाळतं उत्स्फूर्त जगणंभोगणं पुढपुढच्या पिढ्यांमध्ये प्रवाहित होत राहण्याची ही गोष्ट आहे? 

एकुणातच सातपाटील हा ‘कुलवृत्तांत’ असला तरी तो मुख्यत: फिरतो तो सातपाटलांच्या ‘वासोट्या आणि कासोट्या’च्याच भोवती. म्हणजे यात एकदाही असं येत नाही की सातपाटलांच्या घरचे सणवार कसे साजरे होत, किंवा त्यांच्या बायका कुठली व्रतवैकल्ये करत किंवा किंवा पोरांचे नामकरण सोहळे म्हणजे बारशी कशी साजरी करत किंवा त्यांच्या शेताच्या बांधावर राखणकरी म्हसोबा असे की नसे, किंवा त्यांच्या घरातल्या आडात किंवा वावरातल्या विहिरीत आसरा असत किंवा नसत; वगैरे, किंवा गावातल्या महारा-रामोशाला वेठीस धरण्याची रहाटी किंवा अलुत्याबलुत्यांना ते कितपत सौजन्याने किंवा दाबात ठेवून वागवत असत, याबाबत; किंवा आपल्या मनगटाला मनगट जुळणा-या गावातल्या लोकांना हुरडा खायला वावरात बोलावण्याची किंवा पोपटी करून खाण्याची प्रथा सातपाटलांच्या कुळात कधी होती की नव्हती, असलं काहीच यात येत नाही. लेखकाला हे सांगायचंच नाहीय का? बहुधा नसावं. या कादंबरीच्या आत असलेल्या सूत्रधार लेखकाला या गोष्टी सांगायच्याच नाहीयत, कारण त्याला यापेक्षा खोल, मूलभूत, मानवी गोष्टींबद्दल बोलायचं आहे. या सगळ्या गोष्टी किंवा यातलं काहीकाही या पाटील मंडळींच्या घरी-शिवारात घडत असणारच. पण तो प्रकार काही ब्राह्मणांच्या कुलाचारासारखा, गाभ्यातल्या कर्मठ निष्ठेचा भाग नसणार. कुठल्याच पिढीचा कुणी सातपाटील देवाधर्माचा जरासासुद्धा नादीक दिसत नाही. त्यातला बहुतेक प्रत्येकजण लढाया करण्यात आणि जमीनजुमला मिळवण्यात राखण्यात मात्र प्रवीण असतो आणि कुणी तशीच कणखर बाण्याची आणि बांध्याची देखणी बाई मात्र मिळतच राहते त्याला, दर पिढीत. आणि पुढे ती बाई आणि तो पुरुष एकमेकांना रानवट शैलीने सुखेनैव भोगत राहतात आयुष्यभर. अपवाद फक्त एखाद्या पिराजीचा आणि उल्फीचा. त्यातही उल्फीला अगदीच अल्पशा होरपळीनंतर लगेचच तिला ‘ठेवून’ घ्यायला जय्यत तयार असा अँथनी ब्लॅकस्मिथसारखा ताकदवान आणि सत्ताधारी पुरुष लाभतोच. ‘देण्या-घेण्या’ची ताकद असली की सगळं सुरळीत होतं, असा स्वच्छ मानवी व्यवहार. सारांश असा की, सातपाटील ही, एखाद्या ‘कुळाच्या पराक्रमाची’ असण्यापेक्षाही, आठशे वर्षांतल्या बायापुरुषांच्या रक्ताच्या सरमिसळीची कहाणी आहे.  

रंगनाथ पठारेंच्या इतर कादंब-यांच्या तुलनेमध्ये सातपाटील कुठल्या जागी उभी दिसते? मुदलात तिला त्या तुलनेमध्ये उभं करावं का?

दिवे गेलेले दिवस, ताम्रपट, दुःखाचे श्वापद, टोकदार सावलीचे वर्तमान, हारण, कुंठेचा लोलक, रथ, भर चौकातील अरण्यरुदन, चक्रव्यूह - प्रत्येक पुस्तकात 'रंगनाथ पठारे' या लेखकमाणसाने माझ्या मना-मेंदूचा समग्र असा कब्जा घेतल्याचे मला आठवते. समकालीन सामाजिक, राजकीय, जातीय जाणीवांचे आणि समूहाच्या आणि व्यक्तिगत मानसिकतेचे रंगनाथ पठारेंचे आकलन अत्यंत चकित करणारे आहे. आणि कथा-कादंबरीच्या पटांवर हे आकलन मांडताना नेहमीच जाणवत असलेली त्यांची निर्दय अलिप्तता वाचकाला भयचकित करणारी असते. 'लेखकाने निर्दय असायला हवं' असं राजन खानांच्या 'सत ना गत'च्या पार्श्वपृष्ठावर लिहिलेल्या मजकुरामध्ये पठारेंनी म्हटलेलं आहे, यातलं 'निर्दयपण' स्वतः पठारेंच्या लेखनामध्ये पुरेपूर अनुभवायला मिळतं. लेखनातल्या पात्रांच्या सुखदुःखाने स्वतः लेखक उल्हसित किंवा व्यथित झाला आहे, असं पठारेंच्या कुठल्याही कथेत किंवा कादंबरीत तुम्हाला जाणवणार नाही. कथा-कादंबरीच्या विषयवस्तूच्या अत्यंत परीघाबाहेर राहून तिच्या खोल केंद्रातली गोष्ट सांगणं, ही अत्यंत कठीण कोटीची बाब असते. मराठीत ज्या फारच कमी लेखकांना हे जमलेलं आहे, त्यात रंगनाथ पठारे हे नाव नक्कीच असेल. सातपाटीलमध्ये देवनाथ सातपाटील एकूण कथेचा सूत्रधार निवेदक आहे आणि शेवटच्या भागात तो त्याची स्वत:चीही कथा गरज भासेल तिथे अधूनमधून सांगत असतो. ती देवनाथची कथा वाचताना पहिल्यांदाच असं वाटून गेलं की ‘लेखक रंगनाथ पठारे’ इथे स्वत: ‘इन्वॉल्व्ह’आहेत.  कथा, कादंबरी किंवा कविता हे तिच्या रचयित्या लेखक-कवीचं स्वत:चं आत्मकथन नसतं, ही ते लेखन वाचताना वाचकाने आधीच गृहीत धरावीशी अगदीच मूलभूत बाब असते. मात्र, या कुलवृत्तांतामध्ये देवनाथचा भाग वाचताना असं वाटून जातं की 'कादंबरीच्या आतल्या सूत्रधार लेखकाची' नव्हे, तर खुद्द कादंबरीच्याच लेखकाची गोष्ट आहे. अगदी ‘दिवे गेलेले दिवस’ या रंगनाथ पठारेंच्या पहिल्या कादंबरीची आठवण देणारी कादंबरीसुद्धा देवनाथ सातपाटील या निवेदकाने लिहिलेली आहे. शिवाय रवींद्र चावरेकरांसारख्या कादंबरीबाहेरच्या वास्तवातल्या संशोधक लेखकाचे संदर्भही कादंबरीमध्ये कथानक पुढे घेऊन जायला लागतात तेव्हा असं वाटून जातं की नेहमीच्या अलिप्त लेखकीय तटस्थतेला रंगनाथ पठारेंनी इथे फाटा दिलेला आहे. याआधी, ताम्रपटमधल्या एकूण सामाजिक, राजकीय आणि वैयक्तीकही मूल्य-हासाची गोष्ट सांगताना हा लेखक स्वत:ही व्यथित  झाला आहे असं कधी दिसलं नव्हतं, ना लेखक हारणच्या आयुष्यातल्या वेगवान स्थित्यंतराने किंचितही गांगरून गेला होता, किंवा वाचणा-याला फारच खोलवर जखमी करणारं ‘दु:खाचे श्वापद’ लेखनातून जिवंत करताना लेखक कधीच भावविवश झालेला दिसला नव्हता. 

इथे सातपाटीलमध्ये मात्र काही काही जागांवर नुसता निवेदकामधला लेखकच नव्हे तर, क्वचित कादंबरीचा लेखकही-  तटस्थतेच्या परिघावरून आत केंद्राकडे सरकताना दिसल्यासारखा वाटतो. लेखक स्वत: इथे ही गोष्ट ‘रचतो’ आहे, किंवा तो आपली, आपल्या कुलाची बाजू मांडतो आहे, असं वाटावं अशाही जागा काही वेळा दिसतात. सातपाटील हे कल्पित आहे की इतिहास?

जे काय असेल ते असो! ‘समीक्षक वगैरे कुळांतले लोक’ त्याचा उहापोह करतच असतील; वाचक म्हणून आपण पाहायचं एवढंच की ही कादंबरी सातपाटलांच्या निमित्ताने त्या त्या काळातल्या माणसांच्या जगण्यातलं अस्सल आपल्यासमोर मांडत राहते. जगण्यातलं अस्सल देखणेपण आणि जगण्यातलं अस्सल हीनही. आणि दरम्यानच्या असंख्य करड्या छटा,   

थोडं अधिक नेमकं  म्हणायचं असेल तर असं म्हणता येईल की सातपाटील हा जात-धर्म-वंश-कुलशुद्धतेच्या अनेक अवास्तव आणि अशुद्ध गंडांच्या अवाजवी फुगवलेल्या फुग्यांना टाचणी लावणारा धारदार टोकदार दस्तऐवज आहे. आणि म्हणूनच तो वर्तमानाच्या पटावर एक अतिशय समकालीन अशी मांडणी करणाराही आहे. 

कथा-कादंबरी म्हणजे एरवीही काळाचा एक चिमूटभर किंवा तळहातभर तुकडा शब्दांत पकडणंच असतं. सातपाटलांचं हे रंगनाथ पठारे-लिखित कूळ, सातपाटलांपुरत्याच, पण तब्बल आठ शतकांइतक्या विस्तीर्ण काळाला आपल्या खांद्यावर पेलून धरतं आहे. 

‘लेखक लिहितो’ म्हणजे तो ‘काळ’च सांगत असतो. सातपाटील ही ‘सात पाटलां’ची नव्हे, तर त्यांच्यापुरत्या, त्यांच्या काळाची गोष्ट आहे. 

--0--

- बालाजी सुतार.

(पूर्वप्रकाशन- 'शब्दालय' दिवाळी अंक- 2020)


Comments

  1. रंगनाथ पाठरेंच्या कादंबऱ्याचं घेतलेला धावता वृत्तांत अगदी भावला.त्यांच्या कादंबऱ्या वाचण्यास आपण प्रवृत्त केलंय.

    ReplyDelete
  2. ओघवता वृत्तांत खूप आवडला.रंगनाथ पठारे सरांची पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळाली.

    ReplyDelete
  3. रंगनाथ पठारे यांची पुस्तके वाचायला हवीतच

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध