काही अनवट वाटा, काही चिरंतन स्वर.

आपल्याच तंद्रीत गावातल्या अरुंद धूळवाटेने चालताना समोरून आलेल्या एका मोटारसायकलला वाट करून देण्यासाठी गडबडीने रस्त्याच्या एका बाजूला सरकलो आणि मध्येच वर आलेल्या दगडाला ठेचाळून पायाच्या अंगठ्याला खच्चून ठेच बसली. कळवळून खाली बसलो आणि एकाएकी आठवलं - इथंच, याच जागेवर आधीही कधीतरी आपल्याला ठेच लागली होती. हे नख याआधीही इथेच कुठेसं उलथलं आहे. कळ सोसत उठलो आणि चालता चालता काही क्षणांनी आठवलं की चड्डी आणि दप्तर सावरत शाळेतून येताना घरच्या ओढीने पळता पळता इथेच दगडाला अडखळून पडलो आणि गुडघे आणि हा अंगठा फुटला होता. घरी गेल्यावर आईने रस्त्यात उगवलेल्या दगडाला आणि माझ्या अवखळ धावण्याला शिव्या घालत त्यावर हळद माखली होती. ही तीच वाट, कदाचित हा दगडही तोच.

गाव मनात येतं, तेव्हा आपसूकच माझ्या मनात गावातल्या वाटा सरसरतात आणि सोबत काही आवाज तरारून येतात. गावातली माणसंही दिसतातच अर्थात; पण ती मागाहून. आधी धाब्याच्या माळवदी घरांचा, काही खानदानी दगडी वाड्यांचा आणि कुडाने उभारलेल्या अश्राप गरीब घरांचा; असा एक समुच्चय दिसतो आणि त्यापाठोपाठ मनावर उमटतात ते काही चिरंतन आवाज. ज्या आवाजांनी मनावर केलेलं गोंदण अजून किंचितही पुसट झालेलं नाही, ते खास वैशिष्ट्यपूर्ण आवाज. मग दिसतात त्या गावातल्या, गावाबाहेरून आत येणा-या आणि बाहेर जाणा-या लडिवाळ, टणक, सुबक, शालीन आणि स्वैर, उठवळ, मादक अशा सगळ्या वाटा. ज्या वाटांवरून चालत चालत आपण कणाकणांनी, क्षणाक्षणांनी घडत, वाढत गेलेलो असतो, त्या वाटा. आवाज, वाटा, घरं, घरांचे ओटे, काही झाडं आणि काही माणसं असं गाव.  

गावाचं स्मरण होतं तेव्हा सगळ्यात आधी मनातल्या पहाटेवर मशिदीतून अजानीचे स्वर उमटतात. लोकांची जराशी नीजमोड होते. मग काही वेळाने एक म्हातारा गावाच्या एका टोकाला असलेल्या नदीतल्या गुडघाभर डोहात डुबकी मारून तिथल्या बारीकश्या घुमटीतल्या महादेवाचं दर्शन घेऊन, तिथूनच तांब्याभर पाणी घेऊन, तशाच ओल्या अंगाने ‘शिराम राम जय जय राम..’ असा घोष करत गावाच्या दुस-या टोकाला असलेल्या मारुतीच्या देवळाकडे जातो, त्याच्या घोषाने अर्धवट निजेत असलेल्या बायाबापड्या जाग्या होऊन सडा सारवणं घालायला सुरुवात करतात. अंगणात सटकन शिंपडलेल्या सड्याचे सप् सप् आवाज उठत राहतात. मग गावाच्या मध्यभागी असलेल्या रामाच्या देवळातून आरतीचे स्वर उंचावत येतात. हळूहळू गावाला जाग येते. घराघरातून चहापाण्याच्या स्वैपाकाच्या धुराचा खाट आणि फोडण्यांचे वास वा-यावर उठत राहतात. रस्त्याने जरावेळ हालचाल दिसू लागते. आंघोळी करून पुरुषमाणसं उगीचच इकडून तिकडे हिंडायला लागतात. आडावरून हापशावरून पाण्याच्या घागरी घेऊन येणा-या बायका दिसतात. मग शाळेच्या पहिल्या दुस-या घंटेचे आवाज गावभर खणखणतात. रस्त्यावर वायरच्या पिशवीची दप्तरं खांद्यावरून पाठीवर टाकून चड्डी सावरत आणि नाक ओढत निघालेल्या पोरांची वर्दळ काही वेळ वाढते. मग शाळेतूनच प्रार्थनेचे, राष्ट्रगीताचे आवाज उठतात. त्यात बरीच पोरे मागे पुढे होत असतात, त्या मिश्र आणि उंच कोलाहलाच्या विरळसघन झुळुका गावभर ऐकायला जातात. मग हळूहळू लोकांची रानोमाळ पांगापांग होते. दुपार टळटळीत होत जाते. सुन्न स्तब्धता गावभर दाटत जाते. उन्ह चरचरीत होऊ लागतं. मग शौकतभाई कुल्फीचा हातगाडा बाहेर काढतो. गाड्याला खालच्या बाजूला टांगलेल्या घंटेची दोरी खेचत ठाण ठाण ठाण आवाज काढत तो ‘लघवीची इंट्रोल’ किंवा ‘जेवणाची मधली सुट्टी’तल्या पोरांना चाळवत काहीवेळ शाळेजवळ उभा राहतो. मग तशीच घंटा ठणकवत गावभर इथेतिथे थांबत सांज होईस्तोवर सावकाश हिंडत राहतो. दुपारी चंदू टेलरच्या दुकानातून टेपवर जुनी गाणी अनवरत गळत राहतात. ‘.. जब तलक कोई रंगीं सहारा न हो, वक्त काफ़िर जवानी का कटता नहीं..’ किंवा ‘गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मै तो गया मारा आके यहां रे, आके यहां रे..’ असलं ऐकत काहीजण तिथे मटक्याचे हिट काढत बसलेले असतात. मधूनच नेमका हिट सापडल्यावर होणारे त्यांचे उत्तेजित आवाज वेशीपर्यंत धडकतात. हिट गवसून आत्मे थंड झाले की हे लोक गावातल्या भानगडींवर बोलत राहतात. सरपंच ग्रामपंचायतीला कसा खाऊन टाकत आहे किंवा कुणाची बायको कशी उडंगी आहे किंवा कुणा दांडगट शेजा-याने रानातला बांध रेटल्याच्या कटकटी; असलं काहीबाही आणि मधूनच उठणारा हसण्याचा खोकाळा. पलीकडच्या गणाच्या कुडाच्या हॉटेलातून कॅरमवर बसलेल्या पोरांनी ‘टायगर’ला किंवा ‘कुईन’ला केलेली शिवीगाळ दुपारभर. दुपारी संध्याकाळी पुन्हा शाळा भरल्याच्या सुटल्याच्या घंटा गावशिवेपर्यंत ऐकू जातात. मधल्या वेळेत आणखी काहीवेळा अजान-नमाजीचे आवाज उठतात. आखूड चोळणे घातलेले काही मुसलमान लगबगीने इकडून तिकडे जाताना दिसतात. मग शाळा सुटते. तुरुंगातून सुटल्याइतका आनंदी गोंधळ करत पुन्हा दप्तर चड्ड्या सांभाळत पोरे गावभर वाराहुरा होतात. घरी जाऊन भाकरी खाऊन पुन्हा जरावेळ शाळेच्या, बाजाराच्या पटांगणात, पांढरीवर हुदुड्या घालतात. मग जलदीने सांज उतरू लागते. वावरातून येणारे दमगीर बाया-पुरुष, गुरेढोरे रस्त्यावरची धूळ उडवत चौवाटांनी गावात शिरतात. मग रस्त्यावरच्या लायटीच्या डांबावर धुरकट पिवळे बल्ब पेटतात. त्यांच्या उजेडात फक्त ते बल्ब दिसतात, बाकी काहीच दिसत नाही. मग घराघरातून पुन्हा स्वैपाकाचे फोडण्याचे वास दरवळू लागतात. उशीरभराने देवळात पोथी चालू होते. याच्या त्याच्या ओट्यावर तरणी पोरे चावटसावट गप्पांमध्ये रंगून जातात. उशिरा एखादा चुकार ‘देशीवादी’ आरोळ्या ठोकत हेलपाटत शेजा-याला किंवा बांधभावाला गाळ्या देत इकडून तिकडे जाताना दिसतो. अगदी शेवटपर्यंत गल्लीगल्लीतून कुत्र्यांच्या भांडणांचे आवाज उठत राहतात. त्यांना कानाआड टाकून हळूहळू गाव पुन्हा सकाळपर्यंत गुडूप झोपी जातं. अगदी शेवटून उरतात ते गर्द काळोख्या शांततेचे आवाज.

हे ते आवाज. हे चिरंतन वस्ती करून मनातल्या गावात. त्या त्या आवाजासोबत त्या त्या प्रकारच्या माणसांची कायमची गाठ मारलेली असते. 

ठराविक आवाज आणि ठरलेला माणूस आणि ठरलेल्या वाटा, असं एकजीव काहीतरी. 

गावातल्या वाटा फार लडिवाळ असतात तशा अशा अवचित दणके देणा-याही असतात. मघाशी ठेचाळलो तिथेच पलीकडे मी लहानपणी राहायचो ते घर होतं. नंतर मूळ मालकांनी ते विकलं. आता तिथे एक दणकट इमारत उभी आहे. ही वाट माझ्या त्या घराकडे जाणारी होती, पण आताही ती त्या जागेकडे जाते पण ‘त्या’ घराकडे नेत नाही. ते तीन खोल्यांचं दगडामातीने बांधलेलं जुनाट घर छान होतं. ही आताची वाट सिमेंटने बांधलेल्या दुमजली इमारतीकडे घेऊन जाते. ती इमारत आता ‘घर’ उरली नाहीय.

याच वाटेने मी इथून शाळेकडे जायचो आणि परत घरी यायचो. ही बाजूने जाणारी दुसरी वाट आहे ती गावाकडेच्या हापशाकडे जायची. गावात दोनतीनच हापशे होते, त्यामुळे लाईन मोठी असायची दरेक हापशावर. या वाटेवरून त्या लायनीत नंबर लावायला म्हणून मी मोठ्या बादलीत एक छोटी बादली, एखादी चरवी, एखादी तवली असं एका हातात आणि दुस-या हातात एखादी लोखंडी पत्र्याची घागर असं ओझं सांभाळत हापशावर जायचो. तिथे बादल्या, चरवी, घागर नंबरला लावायची आणि याच वाटेनं आणखी दहावीस पावलं पलीकडे पांढरीवर जाऊन नंबरावर लक्ष ठेवत तिथल्या पोरांशी गोट्यांचा डाव मांडायचा. कधी कधी गोट्यांच्या नादात नंबर येऊन गेल्यावर भान यायचं, कधी आई किंवा बहिण येऊन पाठीत धपाटे घालायच्या तेव्हा धूम पळत सुटायला हीच वाट सोबत असायची. पळून गेल्यावर सबंध गावाला वळसा घालून ती दुस-या बाजूने घराकडे आणून सोडायची. ही दुस-या बाजूने येणारी वाट आधी गावाच्या बाहेर जाते आणि एकदम मुरडून गावाच्या वेशीतून आत येते. या वाटेवरची सांजवेळ मोठी मोहक असे. रस्त्यावर अंधुक संधिप्रकाश असे आणि वेशीतच रस्त्याच्या दुतर्फा गोणपाट अंथरून चार सहा शेतक-यांच्या बायापोरांनी भाजीची दुकानं लावलेलं असत. त्यांचे कष्टाळू चेहरे त्या मावळत्या सूर्याच्या सोनेरी सांजेतही लक्षात राहत कायम. याच वाटेवरून चालताना वेशीपलीकडे असलेल्या मारुतीच्या देवळातून अधूनमधून घणघणणारे घंटेचे आवाज देवळाकडच्या दिशेने वहिवाट वाढल्याची द्वाही फिरवत असत. गावात काही भाविक अजून उरलेले असतात, ते नेमाने संध्याकाळी देवळात जाऊन तेलवात वाहतात आणि समोरच्या पारावर बसून समवयस्कांशी हवापाण्याच्या गप्पा मारत बसतात. बाहेरून गावात येतायेता देवळात डोकावून मग घराकडे जायचं असा शिरस्ता असण्याचा एक मोठाच काळ होता. इथूनच समोरून रानाशिवारातून येणा-या बायामाणसांच्या झपाझप चालण्याने वाटेवरची धूळ मऊसूत होऊन गेलेली असे. काही वेळाने या वाटेवरून गावात जाताना दुतर्फा घरांच्या मधून जात जात ही वाट गावाच्या सुगरणपणावर शिक्कामोर्तब करत जाई. घराघरातून स्वैपाकातल्या फोडण्यांचे दरवळ उठत आणि वाटसरू माणसाला भुकेची जाणीव होत राही. रात्र जराशी चढल्यावर याच वाटेवर या टोकापासून त्या टोकापर्यंत पोरांनी खेळांचे फड मांडलेले असत. लपनापानीच्या खेळात लपलेल्या पोरांना हुडकायला निघालेल्या पोराने लायटीच्या खांबावर दगडाने खणाखणा आवाज काढून दिलेला इशारा काळोख भेदून गावभर ऐकायला जाई. या वाटेवर माझं खूपसं बालपण सांडलेलं आहे. ही वाट माझी खेळभिडू होती.  

या इथून, अशी तिकडच्या बाजूने आणखी एक वाट जाते, ती मोठी वाट आहे. ती गावाच्या दुस-या वेशीतून बाहेर जाते आणि बाहेर गेल्यावर एकदम अंग आखडून घेऊन सडपातळ होत एका बारक्या ओढ्याच्या काठाशी लगट करत ओढ्याच्याच काठावर असलेल्या एका बारीकशा महादेवाच्या देवळाकडे जाते. तिथल्या बाहेरच्या नंदीला टेकून काही म्हातारे त्यांच्या काळातल्या गप्पा हाकत बसलेले असत. जत्रेतल्या कुस्त्यांचे तमाशांचे फड किंवा गावात पहिल्यांदा लाईट आली तेव्हा कसं वाटत होतं किंवा आडतीवरून पट्टी घेऊन येताना तालुक्याच्या गावातल्या ऐन स्टडवर आपला सगळाच पट्टीचा खिसा कसा कापला गेला होता किंवा फलाण्या कीर्तनकाराने बिस्ताण्या साली सप्त्यातल्या कीर्तनात कसली धमाल केली होती किंवा मग एखाद्या समवयस्काला त्याची पोरे सांभाळत नाहीत, आता ह्या कलयुगात असंच होत राहणार आणि जगबुडी काही लांब नाही आता; वगैरे ऐकत ऐकत तिथून वाहणारा ओढा देवळाच्या पायथ्याशी जरासा खोल होऊन तिथे एक डोहात उतरायचा. त्याच डोहात मी पोहायला शिकलो. ही वाट चालत तिकडे जातानाच डोहातल्या पाण्यात उतरण्याच्या कल्पनेचा गारवा आधीच मनात दाटवून अंगावर शहारे उमटवत तिकडे घेऊन जायची. पोहून येताना ही वाट आम्हा पोरांच्या आबदार कोवळ्या पायांना भारी टोचत असे, पण त्या टोचण्यामुळे या वाटेवर जडलेला जीव कधीच हळहळला नाही. या वाटेवर धुणं धुवायला जाणा-या बायांचा आणि काही धोब्यांचा कायम राबता असे. खडकावर धुणं आपटण्याच्या आवाजाने या वाटेवर दुपारभर आसूडासारखे फटके उठत असत.

याच वाटेने पुढे गेल्यावर अगदी वळणावळणांची एक पायवाट फुटते. ती अनेक शेतांना वळसे घालून मधूनच वरखाली चढत उतरत मैलभर दूर जाते, तेव्हा एकाएकी एक विस्तीर्ण माळ समोर येतो.  त्या माळावर 'माळावरची आई' नामक गावदेवीचं लैच बारकं देऊळ आहे. शेतातून, रानातून कधी ढेकळं तुडवत, कधी भर पिकातून वाट काढत, एक बारकासा वाहता ओढा पार करून नवरात्रात दहा दिवस गावातली कितीतरी माणसं देवीच्या दर्शनाला रोज पहाटे जाऊन उजडायला माघारा येतात. पहाटे थंडीत उठून लवकर माळावरच्या आईला जाऊन पहिल्यांदा मूर्तीवर पाणी कोण घालतं याची पोरांमध्ये चढाओढ असते. या वाटेवर ब-याचदा पोरे शाळेतल्या भांडणाचं उट्टं काढतात. वाटेवरची झाडी, वळणं, लवणं यांच्या आश्रयानं पोरांची झोंबी झडते. मातीनं पांढरे झालेले हातपाय, गुंड्या तुटलेला सदरा, पाण्यासाठी घेतलेला रिकामा तांब्या सांभाळत पोरे माळावर जातात. तिथं पुन्हा एक अगदीच बारकं म्हणजे जरासं लांबून हात पुढे केला तर दोन बोटांच्या चिमटीत धरता येईल एवढुसं तळं आहे. तिथून हातपाय धुवून तांब्याभर पाणी घेऊन देवळात जाऊन 'आई'च्या डोक्यावर ओतून, अत्यंत भक्तिभावानं साष्टांग दंडवत घालून होईस्तवर सकाळची कोवळी उन्हं बालभारतीतल्या त्या कुणाच्या की "पिवळे पिवळे ऊन कोवळे पसरे चौफेर .." कवितेसारखी माळावर 'यत्र तत्र सर्वत्र' मनमुराद पसरलेली असतात. असं हे दस-यापर्यंत सगळे दहा दिवस रोज चालतं. त्यानंतर कोजागिरीच्या दिवशी माळावर एक वावभर लांबीची बारकी जत्रा भरते. नारळ, देवीवर वाहायची पानं-फुलं, शेव-भज्यांची, भेंड-बत्तासे, गोडीशेव, रेवड्यांची, फण्या-कुंकवा-रिबिनांची, शिनिमाच्या फिल्मा, बारकीसारकी मोटारी, फुगे, शिट्ट्यांची पालं ठोकलेली दुकाने, त्याच गर्दीत 'आकडे' लावायच्या चक्र्या, तीन पत्तीवाले आणि चारच पाळणे असलेला हातांनी फिरवून गती द्यायचा रहाटपाळणा. आसपासच्या दोन पाच गावातले लोक या जत्रेला येतात. दिवसभर जत्रा गजबजून जाते. खरंतर आता जत्रेएवढा बाजार दर गावात दर आठवड्याला भरत असेल, पण जत्रेला यायचा मोह माणसांना सुटत नाही. देवीचं दर्शन हा भाग असतोच, पण बाळपणीपासून मनात रुजून तरारलेलं जत्रेचं आकर्षण माणसांना तिकडे खेचून घेऊन येतं. सकाळी नऊदहाला ठोकलेली दुकानांची पालं सांजेला पाच-सहाला उठतात. पायदळ मंडळी बिगीबिगी पायांनी, बैलगाड्यांवाली बैलांच्या शेपट्या मुरगळीत खडाखडा, आणि सायकलीवाली रेमटून पायडलं हाणीत पंचक्रोशीतल्या चार पाच गावच्या वाटांनी घर गाठायला निघतात. दुकानदार मंडळी आपापला पसारा बैलगाडीत किंवा टेम्पो-टमटमीत भरतात आणि आपापल्या खिशातलं दिवसभर जमलेल्या गल्ल्यातल्या नोटांचं बिंडल सांभाळत आपापल्या गावी कूच करतात. जत्रा पांगते. आमच्या गावाची वाट दमली पावलं टाकत पुन्हा मागची सगळी वळणंवाकणं पार करत गावात पहिल्या जागी येते.  

ही वाट गावानजीक जिथं परतून येते तिथून तिला आणखी एक फाटा फुटतो. त्या फाट्यावरून उलट वळून पुन्हा ओढ्याच्या काठाकाठाशी सलगी करत करत ही वाट एकदम दुस-या शिवारातल्या रानारानांत शिरते आणि डोंगराडोंगरातून जवळच्या काही वाड्यातांड्यांवर घेऊन जाते. गावाबाहेर पडल्यावर ही अरुंद वाट बरीच बेरकी होते. गवताने माखलेली आणि झाड झाडो-याने ग्रासलेली ही वाट चांदण्या रात्रीच्या वाटसरूला हमखास चकव्यात गुंगवते. फलाण्यावाडीला जायला निघालेला माणूस नेमका बिस्तान्यावाडीला जाऊन पोहचतो. हल्ली अशी रात्रीची पायदळ चाल करणारी माणसे उरली नाहीत आणि अशी वाटचाल करायची कारणंही नाहीत, पण ती होती तेव्हा या वाटेनं भल्याभल्यांना चकवे दिलेले आहेत. त्या चकव्यांच्या रम्याद्भुत कथा रात्री उशिरा गावातल्या पारावर धाबळ पांघरून बसलेल्या म्हाता-यांच्या तोंडून ऐकताना भारी गंमत वाटे.

रात्र चढत जाईल तसतशा चकव्यांच्या कथा भुतांच्या कथांकडे वळत जातात. गावाच्या दोन बाजूंना स्मशानं आहेत, तिकडून जाणा-या येणा-या वाटांवर आणि गावापासून काही अंतरावर शिवारात मांज-या खडक नावाचा एक माळ आहे त्यावर भुतांची मोठी वस्ती आहे. एखादा माणूस उशीर करून वावरात चाललेला निघालेला असला की मांज-या खडकावर हमखास त्याला एक श्वेतवस्त्रधारी सुंदर बाई आडवी येण्याचे प्रकार पूर्वी वारंवार घडायचे. ही बाई मंद हसून त्या वाटसरूला घोळात घेण्याच्या प्रयत्नात असे. पण आमचे गावकरी भारी चतुर आणि शूर असत. ते बाईला झुकांडी देऊन धूम पळत सुटायचे आणि धापा टाकत माघारा गावात किंवा वावरातल्या वस्तीवर जाऊन खालवर घोंगडं घेऊन गुडीगुप्प निजून राहायचे. पुढच्या दिवशीच्या चढत्या रात्री पारावर ही नवी थरारक कथा खतरनाक पद्धतीने गावक-यांसमोर ‘पेश’ केली जाई तेव्हा ती बाई कधीच न भेटलेली माणसे रोमांचित होऊन ऐकत आणि नंतर काळोखातून वाट काढत स्वत:च्याच घराकडे जातानासुद्धा जीव मुठीत धरून ‘राम राम’ म्हणत धडाडत्या छातीने जलद चाल करून गल्लीबोळ पार करत.    

आता ठेच लागली त्या जागेपासून जरासं पुढं गेल्यावर एक चौवाटा आहे, तिथली एक वाट वय वाढल्यावर भारी आवडायची. त्या वाटेवरून जाताना मनात हुरहूर उमलून येत असे. पौगंडावस्थेत या वाटेनं मनात फार गहिरे रंग पेरले होते. त्या वाटेवर ‘तिचं’ घर होतं. वाढत्या वयात हळूहळू अनेक नवनव्या गोष्टी घडत गेल्या जगण्यात; आणि हळूहळू त्या वाटेवरची वहिवाट मोडत गेली. पण अजूनही काही आठवणींनी ती वाट मनातल्या माळावर एक जत्रा गजबजून उठवून जाते. कधी गुंफलेल्या दोन वेण्यांपैकी पुढे छातीवर टाकलेली एक वेणी आणि तिच्या टोकाशी बांधलेलं रिबिनीचं लाल फुल आठवतं. कधी पोरीपोरींत काचकांग-या खेळताना आलेला खळाळून हसण्याचा कोवळा आवाज आठवतो आणि अजूनही जीव वा-यावर उडून जातो. ती वाट भारी हळवीकातर करून सोडते तिकडून जाताना. आता वय वाढलं तरी, विरून गेलेल्या मुठीतल्या अत्तराचा गंध मात्र शिल्लक उरावा, तसं त्या वाटेवर जाताना अजून कोवळीक मनात तरारून येते. 

त्याच वाटेनं जरासं पुढं गेल्यावर एक मोठं पटांगण लागतं. तिथे एक मोकळी बखळ होती आणि बाजूला एक पिठाची गिरणी. सांजेला दिवेलागण झाल्यावर पोरं तिथं सूरपाट्याचा डाव मांडत. एकीकडे गिरणीच्या मोठ्या टायरी पट्ट्याचा आणि गिरणीच्या जात्याच्या कायम लयदार घुमत असलेला आवाज आणि त्या पार्श्वसंगीतावर खेळणा-या पोरांचा टिपेला जाणारा कोल्हाळ अशा दुहेरी गदारोळाने ती वाट ऐन सवसांजेला जिवंत व्हायची.

त्याच जिवंत वाटेचं एक टोक गावाच्या दुस-या बाजूला असलेल्या मसणवटीकडे घेऊन जातं. ती वाट कायम मनात धडकी भरवून असायची. दोन्ही बाजूंनी वाटेवर कललेल्या झुडपांनी व्यापलेल्या त्या वाटेनं जायचं म्हणजे छातीतल्या नगा-यावर भयाची टिपरी सडकून पडायला लागे. विशेषत: दुपारभर त्या वाटेवर किरकि-यांची अखंड किरकिर चालू असे. ती मनातलं भयाचं सावट अजून गडद करून सोडे. सांज कलल्यावर त्या वाटेनं जाणं म्हणजे आम्हा पोरांचे प्राणच कंठाशी येत. गावातलं कुणी गेलं की बायाबापड्यांच्या रडण्याच्या स्वर पाठीवर घेऊन तिरडीवर निजलेला माणूस त्याच वाटेनं चार जणांच्या खांद्यावरून ती वाट शेवटची चालून जाई आणि काही वेळाने पलीकडच्या ओढ्याच्या काठावरून भडकल्या चितेच्या आगीचे लोट आणि धूर उसळलेला गावातून दिसे. त्या वाटेवरून तिरडीवर  गेलेली माणसं पुढे कधीच गावात दिसायची नाहीत. त्यातल्या काहींचं भूत झाल्याच्या वावड्यांनी त्या वाटेचाही थरकाप उडून जाई. त्या वाटेवरून जाताना जागजागी आधी गेलेल्या तिरड्या आठवून येत आणि अंगावर काटा उभा राही. 

या वाटेनं जायला नको-नको वाटे. अजूनही नको-नकोच वाटतं.

---0--- 

- बालाजी सुतार.
(पूर्वप्रकाशित- 2017, दिवाळी अंक-उद्याचा मराठवाडा)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध