चव्हाट्यावरची साहित्यिक आतषबाजी
बन्ये , आलीस तर तू एकदाची फेसबुकवर धडपणी ! ये , अशी कडेकडेने ये , ठेचाळशील एखाद्या पोस्टवर धांदरटासारखी. इथं कोण कधी कसली पोस्ट ठाप्पकन् टाकेल त्याचा नेम नसतो. काय म्हणतेस ? या भिंती कसल्या ? यांना ' वॉल ' म्हणतात गं बन्ये. या दरेक भिंतीवर एकेक विचारवंत , तत्वज्ञ , लेखक किंवा गेलाबाजार एकेक कवी राहतो. एकेक कवी ' गेलाबाजार ' असं म्हणालो खरं ; पण खरं सांगायचं तर दगडा-दगडाखाली विंचू असावा तसा इथल्या वॉलवॉलवर एकेक कवीच असतो. भेटायचं म्हणतेस इथल्या लोकांना ? बरं चल तर. भेटण्यालायक आहेतच इथले एकेक भिडू. ये अशी इकडून- ही वॉल बघ - ही तांबेबाबांची वॉल ! छे गं , बाबा म्हणजे कुणी अध्यात्मातला ' चिमत्कारी ' ह.भ.प. बाबा नव्हे. हे म्हंजे आपले मराठी लेखक ' ख.प.च. सतीश तांबेबाबा '. ख.प.च. म्हणजे ? काय की बा ! ' रसातळाला ख.प.च. ', ' मॉलमध्ये मंगोल ' असली संग्रहाचा एकदम खपच वाढेल अशी चमत्कारिक नावं कथासंग्रहाला द्यायची त्यांची सवय आहे. ह.भ.प. शी रसातळातल्या ख.प.च. चं यमक की काय ते जुळतं म्हणून ह.भ.प. च्या चालीवर हे ' ख.प...