व्यथांच्या जळत्या रांगोळ्या..




गोष्टी किती साध्या असतात आणि कुठल्या कुठे जाऊन भिडतात.

चपलेचा पट्टा शिवून घेणा-या मित्राला म्हटलं, नवी घे की आता चप्पल. शिवण्यासारखं काय उरलंय याच्यात? मित्र म्हणाला, घेतो.. घ्यायचीयच.. जरा पाऊसपाणी पडू दे. दुष्काळात नवी चप्पल घेऊन काय करू?

क्वचित पिणारा, पण सहसा कधी आरडाओरडा न करणारा शांत स्वभावाचा गल्लीतला माणूस नेमाने संध्याकाळी बायकोला शिवागाळ करायला लागला. एका सकाळी मी विचारलं, वहिनी, भाऊ जरा कालवा करत होता रात्री. काय झालं होतं? वहिनी समजूतदारपणे म्हणाल्या, ‘काय नाय हो, ह्ये पाऊसपानी पडंना, त्याच्यानी डोस्कं चिनभिन व्हायलंय त्येंचं. येरी आमचे मानसं कालवा करना-यापैकी न्हवंत.. ह्या वावराच्या इचारानं काहूर उटायलंय उरात त्येंच्या..

गोष्टी किती अवघड असतात आणि किती निर्दयपणे जगण्याला भिडतात?

पेरणी झालीय किंवा व्हायचीय आणि पाऊस पडत नाहीय, तेव्हा अशी साध्या साध्या सुखांना मारत राहतात माणसं. चप्पल ही काही फार महाग गोष्ट नसते. दोन-चार महिने पायांचा सांभाळ करू शकेलशी स्लीपर साठ-सत्तर रुपयांना मिळते आणि दीड-दोनशे रुपयांपर्यंत ब-यापैकी चप्पल मिळू शकते. पाऊस पडत नाहीय म्हणून ती विकत घेणं लांबणीवर टाकणं किंवा एरवी शांत कुटुंबवत्सल असलेल्या कुणा भल्या शेतक-याने दारू पिऊन घरात बायको-पोरांवर राग काढणं, यातली दाहकता काय असते ते सामान्य मध्यमवर्गीय माणसांना लवकर उमगणं कठीण. देशातले साठ टक्के लोक शेतकरी आहेत आणि राष्ट्रीय उत्पन्नातला फक्त सोळा टक्के वाटा शेतीचा आहे, ही शेती आणि समृद्धी यातली भयंकर दरीही कुणी मुद्दाम सांगितल्याशिवाय कुणाच्या लक्षात येणे कठीण आहे. दरवर्षी चार चार नक्षत्रं ओळीने कोरडी जायला लागतात आणि रांगेनं शेतक-यांच्या आत्महत्या घडायला लागतात तेव्हाच फक्त शेतीच्या चर्चा आपल्याकडे सुरु होतात. शेतीव्यवसायाच्या बाहेरचे लोक हळहळायला सुरुवात करतात. काहींच्या आतली करुणा उफाळून येऊ लागते, त्यांच्याकडून आणि शासकीय यंत्रणेकडून मदती जाहीर होतात. सुखवस्तू लोकांमधला गिल्ट कमी होतो. सरकारही ‘आपण जाणते राजे आहोत’ असं म्हणवून घ्यायला मोकळं होतं.

पुढे काय होतं?

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ हे घडण्याऐवजी पुढच्या वर्षीही नेमेचि फक्त दुष्काळ येतो आणि सगळ्या गोष्टी मागच्या पानावरून पुढे चालू होतात.

शेतक-यांच्या आत्महत्या होतात पण शेतक-यांच्या बायकांच्या आत्महत्या होत नाहीत, हे एक वाक्य आपल्याकडे अनेकदा उच्चारलं जातं. तुलनेने शेतक-यांच्या बायका आत्महत्या करत नाहीत हे खरं आहे पण ते पूर्ण खरं नाही. आत्महत्याग्रस्त असू दे की नुसती दुष्काळग्रस्त, या बायका मनातल्या मनात हजार मरणं प्रत्यही पेलत असतात. अगदी नवरा जिवंत असतानाही कष्टांतून सुटका नसते, पोराबाळांचा लबेदा मागे असतो, घरात पाणी भरण्यापासून, स्वैपाक ते धुणीभांडी आणि पुन्हा शेतातली कामं असला रामरगाडा असतो. जोमदार देहयष्टीचा शेतकरी आणि त्याची उत्साहाने सळाळणारी कारभारीण हे चित्र लोप पावलं त्यावर कित्येक दशकं उलटून गेली आहेत. लाख काळज्यांनी खंगलेला शेतकरी आणि त्याची अँनिमिक बायको हे चित्र आता सर्रास पाहायला मिळतं. बहुसंख्येनं बायका-मुलं सकस आहाराअभावी हिमोग्लोबिन कमी असणे वगैरे प्रकारांनी ग्रस्त असतात. दवाखान्यांमध्ये चक्कर मारली तर लक्षात येतं अर्ध्याहून अधिक बायकांना (पुरुषांनाही) ‘पांढ-या पेशी कमी झाल्याचं’ डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. सरकारी दवाखान्यांच्या ओपीडीमध्ये बाजार भरावा तसली गर्दी असते. ग्रामीण भागातल्या कुठल्याही व्यथेच्या मुळाशी जायचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की शेती हेच इथलं मूळ दुखणं आहे.

बहुतांश शेती पावसाळी पाण्यावर अवलंबून असते त्यामुळे पावसाच्या येण्या, न येण्यावर लक्षावधींची आयुष्ये हेलकावत राहिलेली असतात. अत्यंत बेभरवशी पाऊसकाळामुळे ही माणसे अत्यंत अनिश्चितपणे दिवस काढत असतात. याचा परिणाम एकूणच शारीरिक-मानसिक स्वास्थ्यावर होतो. कुठलीही गोष्ट आपल्या हातात नाही हे लक्षात येतं तेव्हा माणूस चप्पल विकत घ्यायचं टाळतो. राग काढण्यासाठी हक्काचं ठिकाण असलेल्या बायकोला मारझोड करतो. पोरांना उठता लाथ, बसता बुक्की असं वागवत राहतो. मुक्या जनावरांवर तुटून पडतो. चुकून चित्त स्थिर होऊन आपल्या वागण्याचे अन्वयार्थ लागलेच तर मनातल्या मनात स्वत:ला खात राहतो.

मे-जून पासून पुढं थेट शेतातली पिकं हाती लागेपर्यंत तीन-चार महिने शेतकरी कुटुंब असं सतत काट्याच्या अणीवर चालत असल्यासारखं दिसतं. त्यातही पुरुषांना जीव रमवायला काही जागा असतात. अष्टौप्रहर कष्टांना जुंपलेल्या बायकांना ना मन उकलून दाखवण्यासाठी जागा असते, ना तेवढा वेळ असतो. पायात रुतून राहिलेल्या काट्याची व्हावीत तशी मनातल्या गोष्टी मनात साचून त्यांची कुरूपे होतात. या कुरुपांना जपत, सांभाळत मूकपणे या बायका घरा-वावराचा गाडा रेटून नेत असतात. बायकांच्या मनातल्या या गाथा कुणी उलगडल्याच सविस्तर, तर त्याला वेड लागायचीच पाळी.

घरधनी अस्वस्थ असतो, बायको तगमगत असते आणि बेकार पोरे गावात इकडे तिकडे हिंडून वेळ काढत असतात. उत्पन्नाची कसलीही खात्री नसते, बॅंकेच्या, सोसायटीच्या, खाजगी सावकाराच्या कर्जाची टांगती तलवार भीती दाखवत असते, धीर सुटून जीव दिलेल्या कुणब्यांच्या बातम्यांनी वृत्तपत्रातली अर्धी पानं व्यापलेली असतात, वृत्तवाहिन्यांचाही अर्धा-अधिक वेळ याच प्रकारच्या बातम्या दाखवण्यात संपत असतो, तेव्हा हे असहायपणे हे पाहत असलेल्या फाटक्या शेतक-याच्या बायकोला काय वाटत असेल? कपाळावरच्या कुंकवाशिवाय कशाचाही आधार नसलेल्या तिचं मनोविश्व किती सैरभैर होत असेल? ‘गाभ्रीचा पाऊस’ मधली शेतक-याची बायको आठवली, तिची तगमग आठवली तर कदाचित इतरांना हे अधिक नेमकं उमगू शकेल.

परवा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ना.धों. महानोरांना ऐकलं. ते सांगत होते की दुष्काळात एका अडचणीच्या वेळी अवघे पाचशे रुपयेसुद्धा त्यांना उसने द्यायला कुणी तयार नव्हतं. महानोरांसारख्या त्याही काळात बाहेर नाव असलेल्या शेतक-याची ही गत होत असेल तर सामान्य शेतक-याची अवस्था काय असू शकते याची कुणालाही कल्पना करता येईल.

दुबळ्या नव-याशिवाय जिच्याकडे काहीही नसतं, तिची अवस्था समजून घेणं मात्र सोपं नाही. जिच्या सबंध भोवतालावर आणि देहभानावर दाहक व्यथांच्या जळजळीत रांगोळ्या रेखलेल्या असतात, तिचं जळणं फक्त तीच उमजू शकेल.

कोरडवाहू शब्दांनी ती आग शमवणे सोडा, समजून घेणेसुद्धा अशक्यच.

(पूर्वप्रकाशित दै. दिव्य मराठी. दि. ०२ ऑक्टो. २०१५)
----0----
-बालाजी सुतार, अंबाजोगाई.

Comments

  1. प्रचंड दाहकता ....... भोगणाऱ्यां व्यतिरिक्त इतरास अगम्य .

    ReplyDelete
  2. आग शमवणे सोडा, समजून घेणेसुद्धा अशक्यच.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध