मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..
एक महेंद्र आहे, आणि एक माया. महेंद्रच्या नावात फार काही विशेष नाही, पण माया म्हणजे ‘माया’च! मायेत एकदा गुरफटलं की काही खरं उरत नाही. भोवतालातलं सगळं जग विलक्षण मोहमयी होऊन जातं. त्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर जीव जडून बसतो, आणि तो तिथून निघता निघत नाही. असा जोरकस दिललगाव असा जीव जीवात रुतून बसलेला काही काळ सरतो आणि मग एखादं वळण असं येतं, महेंद्रला मायेपासून वेगळं व्हावं लागतं. वेगळं म्हणजे लौकिकार्थाने वेगळं. जगरहाटीमुळे वेगळं. माया एवढी मनस्वी असते कि तिला कायम चिमटीत पकडून ठेवणं महेंद्रला अशक्य असतं आणि तिला सोडून देणंही. म्हणजे तिच्यापासून दूर गेला तरीही त्याला तिच्यापासून दूर जाता येत नाही. आणि माया एवढी मनस्वी आहे की महेंद्रला सोडून गेली तरी महेंद्रला ‘सोडणं’ तिला शक्य होत नाही. तरीही, महेंद्र आता तिचा उरलेला नाही, त्याच्या आयुष्यात एक ‘सुधा’ आलेली आहे. महेंद्र आणि मायाने एकमेकांना स्पर्श करण्याच्या दरम्यान एक अदृश्य काचेरी भिंत निर्माण झालीये, ज्याच्यातून ते दोघेही एकमेकांच्या देहा-आत्म्याला सतत दिसत, भासत, जाणवत राहतात, पण त्यांना एकमेकांना स्पर्श नाही करता येत. तगमग तगमग तगमग होते त्यांची. एकमेकांच्या अतूट प्रेमात असलेल्या प्रत्येकाचीच होते तशी तगमग. आणि आता त्या तगमगीच्या भोव-यात महेंद्रशी लग्न करून त्याच्या आयुष्यात अपरिहार्यपणे आलेल्या सुधाचंही जगणं भिरभिरायला लागतं. एकमेकांत विलक्षण जीव गुंतलेले तीन जीव!
लग्न आपल्याशी झालं असलं तरी मायेच्या छायेतून बाहेर पडणं महेंद्रला शक्य नाहीये, हे कळल्यावर होणारी सुधाची उलघाल. तिची उलघाल समजून येत असलेल्या महेंद्रची उलघाल, आणि महेंद्र आता अप्राप्य झालेला आहे हे कळून होत असलेली मायाची उलघाल.
प्रेम जितकं तीव्रोत्कट असतं, तितकं अधिक ते जखमी करत राहतं माणसाला. कधीकधी माणूस त्यावर सोपे उपाय शोधायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ एकदा सुधाला मफलरसारखं एक लांबलचक वस्त्र सापडतं. काही गॉगल्स असतात, एक लोकरीचा महागडा देखणा कोट असतो, मेकअपचं खूप सारं सामान असतं. ती महेंद्रला विचारते, तर तो तिची नजर चुकवत, पण खरं खरं सांगून टाकतो की हे सगळं मायाचं आहे. यावर खरंतर सुधाला राग यायला हवा, तिने चिडायला हवं. पण ती अतोनात मृदुल स्वरात म्हणते, तिला पाठवून देऊयात या वस्तू. तुझ्या कामाच्या नाहीत, आणि मी या वापरणार नाही. ठेवून काय करायचं! पाठवून देऊ मायाकडे परत.
महेंद्र काहीतरी शोधतोय घरात. सुधा विचारते काय शोधताय? तो म्हणतो, काही कागद होते इथे ठेवलेले. ती म्हणते, मायाची पत्रं ना? मी ठेवलीयत व्यवस्थित. देते.
ती एक छोटीशी पेटी आणून देते. त्यात ठेवलेली पत्रं पाहून तो विचारतो, पण ही तुझ्या दागिन्यांची पेटी आहे नं?
ती म्हणते, होती. मी त्यात ‘तुमचे दागिने’ ठेवले.
त्याचे दागिने म्हणजे मायाची पत्रं. नव-याच्या प्रेयसीच्या पत्रांना त्याचे दागिने म्हणणारी ही विलक्षण मृदू स्वभावाची कथा-कादंब-यांमधून किंवा चित्रपटांतूनच दिसावी अशी खास ‘भारतीय स्त्री’! सुधा !
आणि ती म्हणते, वस्तू पाठवा, तिची पत्रं नका परत पाठवू तिच्याकडे. तिला वाईट वाटेल खूप.
कुणाही भारतीय पुरुषाला विचाराल, तर तो म्हणेल, पत्नी सुधासारखी हवी आणि प्रेयसी मायासारखी.
पाठवून दिल्या जातात सगळ्या वस्तू मायाकडे. त्या मिळतात तेव्हा मायाला वाटतं, की तिथे महेंद्रच्या घरी आपलं एवढंच सामान नाहीय. तिथे खूप खूप खूप काही काही उरलेलं आहे आपलं. ती महेंद्रला पत्र लिहून म्हणते, माझं उरलेलं सामानही परत पाठव.
उरलेलं सामान?!
तिला आठवायला लागतं, महेंद्रकडे आपलं काय काय राहिलेलं आहे. मग ती त्याला उलट-टपाल पाठवून म्हणते, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है.. माझं काही सामान तुझ्याकडे आहे अजून. उदाहरणार्थ, सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं, और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो..
प्रियकर-प्रेयसीचं एकमेकांकडे काय फक्त मफलर, कोट, चष्मे आणि मेकअपचं सामानच राहिलेलं असतं का? बाजारातून विकत घेतलेल्या वस्तून खरंतर खिजगणतीतच नसतात त्यांच्या. श्रावणातल्या अतिशय हव्याहव्याशा पावसात एकमेकांसोबत भिजून चिंब झालेले दिवसच्या दिवस असतात. ऋतूंवर ऋतू असतात एकमेकांकडे एकमेकांचे. आणि पत्र लिहिलेले नुसते कागद परत पाठवून दिलेयत, त्याचं मी काय करू? तू-मी चादरीसारखी पांघरलेली उबदार रात्रही होती त्या पत्रात, तीही परत पाठवायला हवी न? ती रात्र, ती उब, ते रात्रभर एकमेकांना लपेटून असणं, हे सगळं ‘सामान’ तिथे आहे, तेही पाठव!
आणि, ती म्हणते, श्रावणासारखाच जिव्हाळ असा पानगळीचा ऋतू आठवतोय? पतझड़ है कुछ ... है ना ? पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट कानों में एक बार पहन के लौट आई थी, पतझड़ की वो शाख अभी तक कांप रही है, वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो..
हे सगळंही परत दे.
पानगळीच्या त्या दिवसातल्या स्तब्ध शांततेत रानातून हिंडताना कानांमध्ये उतरत जाणारे झाडांवरून शुष्क पानं ओघळत असलेले ते आवाज, पानं झडून गेल्यावर त्यांच्या बहराच्या आठवणीने आतल्या आत गहिवरून गेलेल्या त्या फांद्या; पानगळ-स्वरांचं, त्या फांद्यांच्या आत दाटून येत असलेल्या त्या संवेदनांचं काय? आणि पानगळ फक्त झाडांचीच असते असंही कुठे असतं? एकमेकांमध्ये जीव जडवून बसलेल्यांच्या हृदयात होणा-या पानगळीचं काय? कधीकाळी तजेलदार टवटवीत हिरवीगर्द असलेली मनाच्या आतली पानं जगरहाटीतल्या उन्हामुळे झरून जातात, आणि विरहाच्या कठोर जाणीवेने आपल्या आतल्या फांद्या थरथरल्या, ती थरथरही तिथेच उरलेली आहे अजून, तेही सगळं पाठवून दे तू.
माया पानगळीबद्दल हे सगळं बोलते, तेव्हा न बोलताही ती स्वत:च्या भावनिक पडझडीबद्दलही बोलत असते. मनातला हिरवा ऋतू सरून गेल्यावर तिथे झालेल्या पानगळीबद्दल!
आणि मध्येच ऋतू बदलून पाउस यायला लागला तेव्हा एकाच छत्रीत आपण अर्धवट भिजत चालायचो ते? एक अकेली छतरी में जब आधे आधे भीग रहे थे, आधे सूखे आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी, गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो ! वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो.. नीरव रात्र आहे आणि अंधुकधूसर काळोख्या भोवतालभरात ओसंडून येत असलेल्या पावसाच्या रेषा. एकच छत्री होती, आणि तिच्याखालून चालत असलेले अर्धवट कोरडे, अर्धवट ओले आपण. त्यातलं कोरडेपण माझ्यासोबत आलंय, पण त्या पावसात भिजून चिंब झालेलं माझं मन तिथेच बिछान्यावर पडलेलं आहे, आंघोळीहून आल्यावर ओला टॉवेल पडलेला असतो नं, तसं! तेही पाठव तू परत माझ्याकडे.
माझं खूप सामान आहे रे तुझ्याकडेच अजून. काही तर शब्दांत बांधतासुद्धा येणं कठीण! आणि त्या पौर्णिमेच्या चंद्ररात्री कितीतरी!
एक सौ सोला चांद कि रातें एक तुम्हारे कांधे का तिल.. गीली मेंहदी कि खुशबू, झुठ-मूठ के शिकवे कुछ, झूठ-मूठ के वादे सब याद करा दूँ, सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो.. हे असलं सगळं कसं पाठवू शकेल महेंद्र परत मायाकडे? मायाला सगळं नेमकं आठवतंय संख्येसहित! एकशे सोळा पौर्णिमेच्या रात्री होत्या, त्या दोघांनी सोबत काढलेल्या.
तब्बल एकसौ सोलह चांद कि रातें आणि त्या स्वप्नील रात्री मी ओठ ठेवलेला तुझ्या उघड्या खांद्यावरचा तीळही परत पाठव. आणि ओल्या मेंदीचा गंध, एकमेकांबद्दलचे खोटेखोटे रुसवे, खरी-खोटी वचनं, त्या सगळ्यांच्या आठवणी, सगळं सगळं सग्गळं परत पाठव माझ्याकडे.
आणि या सगळ्यांसोबत एक परवानगीही दे शेवटची.. एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी, मैं भी वहीं सो जाऊंगी, मैं भी वहीं सो जाऊंगी..
या सगळ्या आठवणींचं, या ‘सामानाचं’ करायचं काय शेवटी? दफन करायचं! आणि हे सगळं नसेल तर मीही नसेन. मै भी वहीं सो जाऊंगी.. तिथेच निद्राधीन होईन मी. निद्रा म्हणजे झोप नव्हे, काळझोप. चिरनिद्रा!
तू नसशील तर या सगळ्या तरलधूसरहळव्या आणि तीव्रकोमल सामानाचं दुसरं काय करता येईल?
काही नाही. काहीच नाही.
एवढं सगळं तुझ्याकडेच आहे अजून. पाठवून हे सगळं सामान तू.
तुझ्या इजाजतीसह!
-०-
आणि हे सगळं पडद्यावर गाण्यातून सांगत असलेली अनुराधा पटेल ही अभिनेत्री. तिला इतर कुठल्या चित्रपटातून पाहिल्याचं मला स्मरत नाही. पाहिलं असेलच, पण ते आठवत नाही. ‘इजाजत’ हे नाव उच्चारल्यावर मात्र नसिरुद्दीन शहा आणि रेखा या कसलेल्या कलावंतांइतक्याच तीव्रतेने अनुराधा पटेलही आठवते. गाणं म्हणताना गुडघ्याला हातांची मिठी घालून गुडघ्यावर डोकं ठेवून, आत्ता या डोळ्यांमधून पाणी ओघळेल, अशी दिसणारी अनुराधा पाहताना आपल्या मनात गलबलून यायला लागतं. परीसारख्या शुभ्र छटा असलेला फ्रॉक घातलेली अनुराधा. ‘एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी, मैं भी वहीं सो जाऊंगी..’ म्हणत खिडकीच्या फ्रेमला टेकून बाहेर पाहत उभी असलेली एकटी-एकाकी अनुराधा पाहताना आपल्याला आतही खोल काहीतरी तुटून यायला लागतं.
‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है’ हे इजाजत’ चित्रपटातलं गाणं केवळ एक गाणं नाही. पुन्हा भेटण्याचे सर्वसंमत मार्ग संपलेल्या आणि तरीही एकमेकांवर प्रचंड प्रेम असलेल्या प्रियकर-प्रेयसीच्या दरम्यानचे सगळे गहिरे भावबंध चितारलेली, ऐकताना श्रोत्याच्याही मनात अतिशय आर्त प्रकटवणारी ही एक अतिशय सुंदर कविता आहे. सिद्धहस्त गीतकार गुलजार यांनी लिहिलेल्या आणि आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात आशा भोसलेंच्या स्वरांनी एक अविस्मरणीय भावावस्था निर्माण केली आहे. त्यात एकाकीपण आहे, विरह आहे, धुंद आठवणींचा अत्तरी गंध आहे, आणि त्याचसोबत अखेरच्या एकाकीपणाचा अपरिहार्य असा स्वीकारही आहे.
भावनांच्या खोल खोल आवर्तांमधून गटांगळ्या खात खात अखेरीस महेंद्र आणि माया परस्परांपासून दूर गेलेले आहेत, पण वास्तव हे आहे की मानसिक पातळीवर ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. त्यांची एकमेकांबद्दलची जिव्हाळ स्मरणं कधीही न विरून जाऊ शकणारी आहेत. गाण्याची सुरुवात शांत आणि हळुवार सुराने होते. आणि गाण्यातली दृश्ये वगळून ते नुसतं ऐकतानाही आपल्या प्रियकराच्या आठवणींमध्ये हरवलेली ती उत्कट भावनाप्रधान तरुण मुलगी हळूहळू साकार व्हायला लागते. दिसायला लागते.
अतिशय तरल संदर्भांनी व्याप्त असं हे गाणं एका अनावर क्षणी अतिशय शारीरही होतं. माया जेव्हा ‘एक सौ सोलह चाँद की रातें, एक तुम्हारे कांधे का तिल, एक तुम्हारे कांधे का तिल..’.असं म्हणते आणि तो तीळ उघडा करून त्यावर ओठ टेकवते, तो क्षण या गाण्याला कमाल उंचीवर घेऊन गेला आहे. माया फक्त महेंद्रच्या देहावर असलेल्या एका बारीक शारीरिक खुणेचा उल्लेख करत नाही, तर महेंद्रसोबतच्या उत्कट नात्याला एक तेवढंच उत्कट परिमाण प्राप्त करून देते. देहाला वगळून प्रियकर-प्रेयसीने एकमेकांवर प्रेम करणं ही गोष्ट झूठच असते. त्यांनी एकमेकांसोबत जगलेल्या अनेक रात्री त्या तिळासोबत जोडलेल्या आहेत. अनेक गंधित क्षण, अतोनात उत्कट भावनांचा तो संदर्भ आहे. आणि हे सगळं ‘सामान’ तिच्यासाठी केवळ वस्तू नाहीत, तर ती एक आठवण, एक भावना, एक जीवन आहे. ते जीवन तिला परत हवं आहे.
गाणं ऐकताना, अनेक वेळा डोळे भरून येऊ पाहतात, पण ते वाहत नाहीत, हे या गाण्यातलं संयतपणही कमाल आहे. या समजूतदार गीतामध्ये कुठेही भावनांचे भडक क्षोभ नाहीत, तरीही त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना हृदयाला थेट भिडणाऱ्या आहेत.
‘इजाजत’ हा चित्रपट आणि त्यातलं हे गाणं, ‘गुलजार’ नावाच्या असामान्य प्रतिभावंताने भारतीय चित्रपटसृष्टीला आणि या देशातल्या कोट्यावधी प्रेक्षकांना भेट दिलेलं एक अमूल्य ‘सामान’ आहे.
-०-
- बालाजी सुतार । प्रकाशित - 'स्पर्शज्ञान' - 'ब्रेल' दिवाळी अंक -२०२५
अप्रतिम!
ReplyDelete"चिरंतन वेदनेचा दाह.."खूप संयतपणे मांडला आहे..
ReplyDelete#The_Anna