सातपाटील : काळाची गोष्ट
'ज्याने त्याने आपला आपला वासोटा आणि कासोटा जिंकावा'. (सातपाटील कुलवृत्तांत. पृ.क्र. ६८१) 'वासोटा' हे महाराष्ट्रातल्या एका किल्ल्याचं नाव आहे, त्याचा कदाचित हा संदर्भ असेल. ज्याने त्याने आपापल्या आयुष्यात किल्यासारखं भव्य अवघड असं काही जिंकावं असा भावार्थ. आणि कासोटा जिंकावा. 'कासोटा' म्हणजे बाईच्या लुगड्याचा काष्टा, बहुधा. 'कासोटा जिंकणं' म्हणजे 'आपल्या आपल्या प्रेमाची बाई जिंकणं' हेसुद्धा किल्ला जिंकण्यासारखंच भव्य अवघड काम. वासोटा जिंकण्याइतकी धमक तुमच्यात असेल तर तुम्ही कासोटाही जिंकत राहता. म्हणजे साधा मेंढपाळ शिरपती असाल तरी तुम्ही ब्राह्मण एडके देशमुखाच्या स्त्रीला जिंकता, साहेबराव असाल तर पठाण आर्यानाबाईला जिंकता, दसरत असाल तर अफगाणी आफियाला, पिराजी असाल तर उल्फी कोल्हाटणीला, शंभूराव असाल तर देऊबाईला. माणूस जे जे काही करतो ते ते सत्ता, संपत्तीसाठी आणि अतिशय अंतिमत: सुंदरीच्या प्राप्तीसाठीच करतो, असं एरवी फ्राईड वगैरे लोकांनीही लिहून ठेवलेलं आहेच. फारतर असं म्हणता येईल की या तिन्ही गोष्टी एकमेकांचा अनुषंग म्हणूनच येतात. दुबळ्या, म्हणजे वास...