सैराटच्या निमित्ताने : बेबंद



निसर्ग आधी असतो की जात-धर्म आधी असतात? जीवशास्त्र आधी असतं की लोकांच्या टोळ्यांनी एकत्र येऊन लिहिलेलं सोयीचं समाजशास्त्र आधी असतं? शाश्वत काय असतं नि लादलेलं काय असतं? मातीतून रक्तात आलेलं अधिक खरं असतं की या-त्या सत्तेच्या माजातून उद्भवतं, ते खरं असतं? यांच्यात संघर्ष उभा होतो तेव्हा जिंकण्याचा हक्क कुणाला असतो मग

सैराटनावाच्या सिनेमानं हे प्रश्न मनात आणलेच. सैराटचं जेवढं प्रचंड कौतुक झालं तेवढीच प्रचंड विखारी टीकाही सैराटने सोसली आहे. या-त्या जातीचे लोक आमनेसामने आले, विशेषत: समाजमाध्यमातून ही तेढ अधिक मोठय़ा प्रमाणात उफाळून येताना दिसली. जाती-अंताच्या वाटेवरून हयातभर चालत आलेल्या महापुरुषांची नावे घेत घेत आपण तीच व्यवस्था मजबूत करण्याकडे चाललेलो आहोत, याचं अजिबात भान लोकांना उरलेलं दिसलं नाही. अगदी चित्रपटात दाखवलेल्या नायिकेच्या चित्रपटातल्याच जातीपासून, ती भूमिका करणार्‍या मुलीच्या वास्तवातल्या जातीची चर्चा करण्यार्पयत सोशल साइट्सवर वावरणार्‍या कथित सुज्ञ सुशिक्षितांनी पातळी सोडलेली दिसली. 

सैराटमध्ये असं वेगळं काय आहे की त्यानं एवढं चर्चेत यावं? एक चित्रपट करून आपण हे समाजातलं जातीपातीचं चित्र बदलून टाकू असा काही आशावाद मनाशी बाळगण्याइतका नागराज, या सिनेमाचा दिग्दर्शक, नक्कीच भाबडा नसणार. नागराजचा आजवरचा प्रवास लक्षात घेता, त्याच्या कवितेत तो जे म्हणतो ते पुरेसं बोलकं आहे यासंदर्भात. ‘‘माझ्या हाती नसती लेखणी, तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला. मी कशानेही उपसतच राहिलो असतो, हा अतोनात कोलाहल मनातला.’’ या त्याच्या कवितेतल्या ओळी नागराजची सबंध भूमिका खुलेपणाने सांगून टाकणार्‍या आहेत. त्याला लोकांना काही शिकवायचं नाहीये. या सबंध व्यवस्थेने भयानक गुंतागुंत करून व्यवस्थितपणे रचूनठेवलेला अराजकी कोलाहल त्याला बाहेर उपसायचा आहे. तो बाहेर मांडून ठेवला, तर त्यातलं भयावहपण दिसून येऊन कदाचित काही मानवी संवेदनांमध्ये पुनश्च प्राण फुंकले जातील, अशी काहीशी आशा त्याच्या मनात असू शकेल कदाचित. 

जातीबितींच्या पार पल्याड जाऊन निसर्गाने जन्मसिद्धपणे प्रदान केलेल्या ऊर्मी विरुद्ध बाहेरच्या कृत्रिम चौकटी असा हा संघर्ष. या झगडय़ात अंतिमतर्‍ निसर्गाचंच जिंकणं अपरिहार्य आहे. कारण तो शाश्वत असतो. 

याच निसर्गाने वयाच्या एकविसाव्या वर्षी मला स्वत:ला अत्यंत खोलवर प्रेमात पाडलं होतं. जिच्या प्रेमात पडलो ती मुलगी तेव्हा पंधरा वर्षाची होती. मला तुझ्याशीच लग्न करायचं आहेहे नंतर वर्षभरानं मी तिला सांगून टाकलं. जातीधर्मातल्या, आर्थिक स्तरांतल्या, कथित सामाजिकतेतल्या भेदांना आणि छोटय़ा गावातल्या अभेद्य जात-वास्तवातल्या निष्ठूर टणकपणाला भेदून त्यानंतर तब्बल सात वर्षानी आम्ही लग्न केलं. त्याही आधी पौगंडावस्थेपासून आणखी कुणाला पाहून माझ्या मनात उत्कट प्रेमसदृश असं काही उफाळून आलंही असेल, पण गंधित अत्तराच्या एखाद्या झुळुकीसारखं ते विरूनही गेलं असणार. तोही निसर्गाचाच एक नियम असतो. 

तेरा-चौदा ते सतरा-अठरा हे वयच असं असतं की शरीरात प्रचंड रासायनिक उलथापालथ घडत असते. प्रचंड ऊर्जा ओसंडून येत असते. काहीतरी अफाट घडून यावं, घडवावं अशा ऊर्मी उसळत असतात. हे वय धोक्यांना जुमानत नाही. उफाळत्या ऊर्मीना पायबंद घालण्याऐवजी बेबंदपणेत्या सैराटक्षणांना सामोरं जाऊन ते क्षण जगून घेताना आयुष्य पणाला लागलं तरी बेहत्तर !’ असं काहीसं छातीत धडका मारत असतं. 

गुटखा खाऊन मरण्यापेक्षा आर्चीवर प्रेम करून मरणं आपल्याला चालेलअसं त्या सिनेमातला परश्या त्याच्या जिवाभावाच्या दोस्तांना, लंगडय़ा आणि सल्ल्याला सांगतो ते उगीच नाही. मनातल्या उसळत्या ऊर्मींना दाबून ठेवण्यासाठी निरंतर सक्रिय असलेली जी एक बुलंद सामाजिक व्यवस्था असते, तिला या ऊर्मी अशाच पद्धतीने फाटय़ावर मारत असतात. यातून मग अफाट हिंमत छातीत असलेली एखादी आर्ची उभी राहते, समंजस बुजरा तरीही मातीत पाय रोवून ठाम उभा राहणारा परश्या येतो. ते तर प्रेमात पडलेलेच असतात, पण त्यांच्या दोस्तीसाठी व्यवस्थेच्या तटबंदीला आपल्या सर्व शक्तीनिशी धडका मारण्यासाठी लंगडा प्रदीप किंवा छातीच्या बरगडय़ा मोजता येतील एवढीच देहयष्टी असलेला सल्ल्यासुद्धा त्यांच्या जोडीला उभा राहतो. 

असे जिवाला जीव देणारे काही मित्र माझ्याही आयुष्यात होते, बहुतेकांच्या असतातच. 

या मित्रांनी त्या काळात माझ्यासाठी जे काही केलं ते कुठल्याही रक्ताबिक्ताचे नाते असलेल्या कुणीही माझ्यासाठी कधीही केलेले नव्हते. हे मित्र कुठल्या जातीचे होते, त्यांचा धर्म काय होता या गोष्टी इथे अत्यंत गौण ठरतात. निसर्गधर्माला साथ देण्याची जी ऊर्मी त्याच निसर्गधर्माने त्यांच्यात ठासून प्रज्वलित केलेली होती, ती शाश्वत मूल्यांना शाश्वतपणे जिवंत ठेवणारी आहे.

छोटय़ा गावांमधून अशा अनेक प्रेमकथा आकार घेतात. पूर्वी घेत होत्या, आजही घेतात. पण त्या प्रेमकथा आकारास येतात, उमलू लागतात तेव्हा सबंध भोवताल कसा क्रूर पद्धतीने प्रतिक्रिया देत असतो हे मी अनुभवलेलं आहे.

तुमची जात कुठलीही असू दे, कुठलाही असू दे तुमचा धर्म-वर्ग, माणसांनी उभारलेल्या कृत्रिम व्यवस्थेच्या हितसंबंधांना तुम्ही छेद देताय हे लक्षात आलं की ही व्यवस्था अत्यंत आक्रमक व हिंसक होते. 

कधी कुटुंब आडवं येतं, कधी सबंध गाव. कधी चिरेबंद जातवास्तव आणि कधी या सगळ्यांसहित सबंध पाषाणी व्यवस्था. कोवळ्या छातीतून उसळत असलेला बेलगाम निसर्ग. तो जुमानत नाहीच कशाला. त्याला ना परिणामांची तमा असते, ना माणसांनी उभ्या केलेल्या रूढी-रिवाजांच्या, जाती-धर्माच्या, गरिबी-श्रीमंतीच्या बेवकूफ चौकटी कबूल असतात.

म्हणून तर प्रेमात पडलेले गावोगावचे आर्ची आणि परश्या डरत नाहीत कशालाच.

सर्व शक्ती एकवटून ते लढत राहतात. भोवतालाशी, क्वचित एकमेकांशी, अनेकदा स्वत:शीही. पुरेपूर कोसळून पडावं अशा कित्येक वेळांनी चौफेर आक्रमणं केलेली असतात त्यांच्यावर. मात्र प्रेमनावाची गोष्ट त्यातूनही जिद्दीने उभं राहायला बळ देते त्यांना.

कधी अपुरं पडतं बळ, काही गाफिल क्षणांचा आधार घेऊन व्यवस्थेतले गारदी घेरतात त्यांना. काहींच्या गळ्यांतून रक्ताच्या लाटा उसळतात बाहेर. निसर्गाची म्हणा की प्रेमाची म्हणा,  ताकद एवढी अशरण असते की त्यांच्या वाहत्या रक्तालाही एकमेकांचा विरह कबूल नसतो. ते मिसळून जातं एकमेकांत. एकजीव होऊन.

आणि काहींच्या प्रेमाला बळजबरी लावलं जातं नख. वरकरणी दाबून टाकलं जातं सारं. कायमचं.
पण ते कायमचं मिटत नाही. मनातल्या डोहात ही बंडखोरी शाबूत राहते तसं ते प्रेमही. ते पुसलं जात नाही. मिटवता येत नाही. बाहेरून, लांबून पाहणार्‍यांना ती परिस्थितीशरणता दिसते. पण आत खोलवर ते सारं तसंच जागं असतं. कायम.

कुणाही तात्याला, कुणाही प्रिन्सला, त्यांच्या जातींना, त्यांच्या संपत्तीला, त्यांच्या सत्तेला आणि त्यांच्या कहर हिंसक माजाला पुरूनच उरतात हे प्रेम करणारे आर्ची आणि परश्या. रक्तीम पावलांचे ठसे उमटवत चालत गेलेलं त्यांचं एक बाळ मागे उरलेलं असतं, ते जेव्हा भविष्यात बारा-पंधरा वर्षाचं होतं तेव्हा त्याच्या रक्तातून, त्याच्या छातीतून उसळणार्‍या ऊर्मींतून, पुनश्च तरारून जिवंत सळसळत तीच बंडखोरी, तीच निसर्गओढ वाहू लागणार असते.

जातीबितींना, धर्माबिर्माना, सत्तेबित्तेला पिढय़ानपिढय़ा हे तरुण असेच आव्हान देत राहतील. जातीधर्मसत्तेच्या, घमेंडमाजाअभिमानाच्या पोकळ ओझ्यांनी मस्तक बधीर करून घेतलेल्या समाजपुरुषाला हे समजून घ्यावंच लागेल कधीतरी.

‘‘कारण
प्रेम आहे
माणसाच्या संस्कृतीचा सारांश,
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव !’’


- बालाजी सुतार, अंबाजोगाई

Comments

  1. ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ हा शोधप्रबंध लवकरच ईबुक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे.


    जयसिंगपूर (कवितासागर वृत्तसेवा) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अभ्यासक किशोरकुमार काशिनाथ कांबळे यांनी डिसेंबर २००९ मध्ये पीएच. डी. (मराठी) पदवीसाठी सादर केलेला व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरकडून अधिकृतरीत्या मान्यताप्राप्त झालेला शोध प्रबंध ‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ लवकरच ईबुक स्वरुपात कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर मार्फत प्रसिद्ध होत आहे. अशी माहिती प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनास देवचंद कॉलेज, अर्जुननगरचे यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर संशोधनातील सहा प्रकरणात खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे...

    • प्रकरण पहिले - प्राचीन मुस्लीम कवींची काव्य परंपरा: प्रास्ताविक, मुस्लिमांचे भारतात आगमन, भारतात इस्लाम धर्माचा स्वीकार, पार्श्वभूमी, मुस्लीम मराठी संतांचा उदय, मुस्लीम मराठी संत, मुस्लीम मराठी शाहीर, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण दुसरे - आधुनिक मुस्लीम कवींच्या मराठी कवितेचा उदय, विकास, स्वरूप व प्रेरणा: प्रास्ताविक, मुस्लीम साहित्याची पार्श्वभूमी, मुस्लीम साहित्य संकल्पना, मुस्लीम साहित्य व्याख्या, मुस्लीम साहित्याच्या प्रेरणा, मुस्लीम साहित्य प्रवाह, मुस्लीम कवितेचे स्वरूप आणि निष्कर्ष.

    • प्रकरण तिसरे - मुस्लीम मराठी कवितेचा आशय: प्रास्ताविक, सामाजिक आशय, धार्मिक - सांस्कृतिक आशय, राजकीय आशय, आर्थिक आशय, राष्ट्रीय एकात्मता, प्रबोधन, मानवतावाद आणि निष्कर्ष.

    • प्रकरण चौथे - मुस्लीम मराठी कवितेतील सांस्कृतिक संघर्ष: प्रास्ताविक, धर्मांतर, जातीयता, मूलतत्त्ववाद, उपरेपणाचं दु:ख, राष्ट्रनिष्ठा, मुस्लीम पुढा-यांचे राजकारण, मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न, आणि निष्कर्ष.

    • प्रकरण पाचवे - मुस्लीम मराठी कवितेचे वाङमयीन मूल्यमापन: प्रास्ताविक, कवितासंग्रहांची शीर्षके, कवितासंग्रहांची अर्पणपत्रिका, मुक्तछंदात्मक रचना, संवादात्मक, भाषा, प्रतिमा - प्रतीके, गझलेचा रचनाबंध, गझलेतील विषय.

    • प्रकरण सहावे - उपसंहार

    डॉ. किशोरकुमार कांबळे यांच्या ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ या संशोधनात उपरोक्त बाबींचा समावेश आहे. जवळपास ७५० - ८०० पृष्ठांचा हा समिक्षा / संदर्भग्रंथ कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून ईबुक स्वरूपात प्रसिध्द होत आहे. मुस्लिम मराठी कवींचे छायाचित्र / फोटो व त्यांच्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ सदर ग्रंथाच्या मुखपृष्ठावर प्रसिध्द करण्याचा विचार आहे. मराठी साहित्य आणि संस्कृती समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त असलेला सदर ग्रंथ इंटरनेटच्या माध्यमातून जगभर वाचला जाणार आहे. अधिकृतरीत्या आय. एस. बी. एन. नोंदणीकृत असलेला ‘मुस्लिम कवीची मराठी कविता’ हा समीक्षा ग्रंथ मराठी साहित्य विश्वातली एक अजोड कलाकृती ठरला आहे.

    संपर्कासाठी पत्ता: कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर, सुदर्शन बिल्डिंग, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, जयसिंगपूर - ४१६१०१, पोस्ट - जयसिंगपूर, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र. मुस्लिम कवींनी आपले छायाचित्र/पासपोर्ट आयडेंटीसाईज फोटो, आपला साहित्यिक परिचय व कवितासंग्रह / कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



    • पुस्तक - मुस्लीम कवींची मराठी कविता (समीक्षा ग्रंथ)
    • ISBN - 978-81-929803-4-8
    • लेखक - डॉ. किशोरकुमार कांबळे (7385218021)
    • प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
    • प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
    • संपर्क - 02322 - 225500, 9975873569
    • ईमेल - sunildadapatil@gmail.com


    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बाप घर के दरख़्त होते हैं..

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बोलबच्चन ते अबोलबच्चन