जो जे वाट्टेल तो ते बोलो..



काळ गोंधळाचा आहे.

‘जनतेपैकी’ लोकांसाठी तर फारच गोंधळाचा आहे,

मंडळी बोलायला लागली आहेत. अमाप आणि आडमाप बोलायला लागली आहेत. मंडळींना उमगत नाही, उकलत नाही असा एकही विषय नाही. एसटीच्या फाट्यापासून चार किलोमीटर आत अजूनही चालत जावं लागतं अशा ‘येड्याच्या वडगावा’तला कुणी बुद्रुक इसम शिवारात म्हशी राखता राखता अँड्रॉइड फोनवरून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर छातीठोक बोलताना दिसतो तेव्हा गंमत वाटते. चौथीच्या इतिहासात वाचलेल्यापैकी आजवर स्मरणात उरलेलं ‘शिवाजी महाराज नावाचा एक पराक्रमी राजा महाराष्ट्रात होऊन गेला’ हे एकच वाक्य माहित असलेला भिडू इतरांचं ऐकून ऐकून ‘अमुक तमुकाने इतिहासाचे विकृतीकरण केलं’ हे वाक्य उच्चारू लागला की इतिहासाच्याऐवजी भविष्याबद्दलच चिंता वाटायला लागते. स्वत:च्या म्हाता-या आईबापांकडे नीट न बघणारी माणसे, वृद्धाश्रमात सुन्नपणे बसलेल्या वृद्धांच्या व्हायरल झालेल्या फोटोखाली भावनाकुल कॉमेंट्स लिहिताना दिसली की चालू युगात ठासून भरलेल्या अद्भुत कोडगेपणाचा नव्याने साक्षात्कार व्हायला लागतो. स्वत:च्या गावातल्या ग्रामपंचायतीचा कारभार किती रामभरोसे चालू आहे हेही नीट माहित नसलेली माणसे मनमोहनसिंगांचं चुकलं कुठं, नरेंद्र मोदींनी यापुढे काय काय करायला हवंय, असदुद्दिन ओवैसीची खेळी नेमकी काय आहे, अमर्त्य सेनांना अर्थशास्त्रातलं काहीच कसं कळत नाही, अमिताभ बच्चनपेक्षा हॉलीवूडमधला तो अमका नट कसा दहा पट ‘भारी’ आहे, सानिया मिर्झाने पाकिस्तानी माणसासोबत लग्न करायला नको होतं, दाभोळकर-पानसरे-कलबुर्गींचे मारेकरी कोण, भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ द्यावं असं त्यांच्या लेखनात काय आहे, सचिन पिळगावकर हा केवढा किरकोळ इसम आहे, दि. पु. चित्रे आणि मन्या ओक (आणि रामदास आठवले) यांच्या कवितांचा तुलनात्मक अभ्यास, नागाल्यांडमधली परिस्थिती सुधारण्यासाठीचा नेमका उपाय काय आणि नक्षलवादाला आळा कसा घालता येईल इथपासून ते अशा-अशा ‘च्याणाक्ष’ पद्धतीने पाकिस्तानात घुसून दाऊद इब्राहीमला डायरेक्ट गोळ्या घालून मारून टाकावे (च्यामारी! कोण रे तो हलुवा है क्या?असं विचारतोय पाकिस्तानातून?) इथपर्यंतच्या अस्ताव्यस्त विषयांवर अत्यंत ऐसपैस अशी चौफेर तिरंदाजी करत असतात तेव्हा मी आश्चर्याने स्तिमित (की विस्मित? जे काय असेल ते..) होतो.

पूर्वी कसं होतं की, चार शहाणी म्हणवली जाणारी माणसं सांगायची ते प्रमाण मानून बाकीची बहुसंख्य जनता चालत होती. गावात, शहरात, राजकारणात, समाजकारणात, कलेत, संस्कृतीत, साहित्य महामंडळात, विद्यापीठात, विद्वत्तेत, एवढंच काय; अगदी ‘अडाणीपणा’तही त्या त्या क्षेत्रातले मोजके चार-सहा मुखंड बोलत असत आणि बाकीचे यच्चयावत लोक ते मुकाट ऐकून घेत. आता हे उरलं नाही. हल्ली सगळ्याच क्षेत्रांत तज्ञ मंडळींची लोकसंख्या अव्वाच्या सव्वा वाढलेली दिसते आहे. त्यामुळे कशातच ‘तज्ञपणा’ नसलेल्या माझ्यासारख्या ‘बिनतज्ञ’ इसमाची फार गोची होतेय.

पूर्वी छोट्या गावांत फारतर एखाद-दुसरा पेपर घरी यायचा. टीव्ही बाळगून असलेल्या भाग्यवान लोकांच्या घरीही दूरदर्शनसारखं अत्यंत ‘निरुपद्रवी’ माध्यम वगळता ज्ञानसंपादनाचं दुसरं साधन नव्हतं. याहून अधिक भूक असलेली काही नादिक माणसं ययाती, मृत्युंजय, पानिपत, छावाच्या पुढेमागे फारतर पु.ल. देशपांडे, बाबा कदम किंवा सुहास शिरवळकरांना वाचून झालं की तेवढ्यावर सांस्कृतिक समाधान मानून घेत असत. पेपर वाचून, दूरदर्शनवर बातम्या ऐकून किंवा करमणुकीखातर चार-सहा पुस्तकं वाचून माणसं गपगार बसत. ज्यात-त्यात नाक खुपसून आपणही आपली विद्वता जगाला दाखवूनच दिली पाहिजे असला सोस नसे. एकुणातच माणसे साधीभोळी, आपल्या मर्यादा मनोमन मान्य असणारी आणि नाकासमोर बघून चालणारी होती. काळ फार जुना नाही, अवघ्या बारा-पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे.

या बारा-पंधरा वर्षांत जग फार बदललं. गावातल्या दरेक गल्लीतून गेलाबाजार एखादा तरी ‘निर्भीड आणि निस्पृह’ बाण्याचा पेपर निघू लागला. टीव्हीची शेकडो च्यानेल्स थेट स्वयंपाकघरापर्यंत घुसून बसली. गावोगावी प्रकाशक आणि घराघरात कवी-लेखक ‘निपजू’ लागले. बोलणारे, लिहिणारे गडगंज संख्येने इथेतिथे दिसू लागले आणि हे बोलणं-लिहिणं मनोभावे ऐकणारे, वाचणारे मात्र रेशनमधून विकत आणलेल्या खड्यांतून तांदळाचे कण असतात तेवढे दुर्मिळ झाले.

या सगळ्यावर कडी केली ती फेसबुकसारख्या माध्यमांनी. मोबाईलच्या माध्यमातून थेट मुठीत आलेल्या सोशल मीडियामुळे वाचता-लिहिता येणारा प्रत्येकच इसम डायरेक्ट विचारवंतच होऊन बसला. एका ठराविक वयात आपोआप मिशा फुटाव्यात तितक्या सहजपणे प्रत्येकाला ‘मते’ ‘फुटू’ लागली आहेत. आपल्याला कळतं त्या विषयात आणि त्याहून अधिक, आपल्याला कळत नाही त्याही विषयात आपण काही बोललो नाही तर ‘आपण ‘पुरेसे’ विचारवंत नाहीत’ अशी लोकांची समजूत होईल की काय, अशा धास्तीने लोक दरेक विषयावर बोलत असतात.

गंमत अशी की हे लोक जे बोलत, सांगत, लिहित असतात त्याच्या पुष्टीदाखल पुरावेसुद्धा देत असतात. हे पुरावेही इतक्या उदंड संख्येने उपलब्ध असतात की सांगता सोय नाही! कुणाही लेखकाच्या पुस्तकातली अधलीमधलीच काही पाने किंवा ओळी स्कॅन करून दाखवण्याला ‘पुरावा’ असं मानण्याची प्रथा हल्ली बेफाम जोरात आहे. हा मजकूर लिहिणा-या इसमाचा या विषयातला अधिकार काय नि त्याचा व्यासंग किती असल्या गोष्टी विचारात घेण्याची कुणाला काही गरजच वाटत नाही. आणि ‘बोली’पेक्षा ‘लेखी’वर अजूनही माणसांचा विश्वास बसत असल्यामुळे अनेक परस्परविरोधी युक्तिवादही वाचणा-यांना सहजी पटून जातात. निदान माझं तरी तसंच होतं. मला अनेकदा अनेकांची विसंगत मते पटून गेलेली आहेत.

त्यांचं वाचलं की सावरकरांसारखा देशभक्त दुसरा नव्हता असं वाटतं. यांचं वाचलं की सावरकरांसारखा माफ्या मागून सुटणारा भित्रा हिंदुत्ववादी दुसरा नसेल असं वाटतं. त्याचं वाचलं की गांधींसारखा महात्मा निव्वळ एकमेवाद्वितीयम् वाटत राहतो. यांचं वाचलं की गांधींनीच देशाची फाळणी करून वर पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपयांचं दान दिलं हे पटत राहतं. यांचं वाचलं की बाबासाहेब पुरंदरेंएवढा शिवभक्त दुसरा नाहीच असं वाटतं. त्यांचं वाचलं की पुरंदरेंएवढा विकृत शिवचरित्र सांगणारा दुसरा झालाच नसावा हे छातीठोक पटतं.

मी स्वत:शी म्हणतो, बालाजीभौ, फुक्कट रे, फुक्कट इतिहासात एमे केलंस.

त्यांचं वाचलं की नेमाडेंच्या एवढा जबरी साहित्यिक दुसरा नसावा हे लगेच लक्षात येतं. यांचं वाचलं की नेमाडेंच्या इतका बोगस लेखक दुसरा नसावा हे मनात ठसतं. त्यांचं वाचलं की पुलं-वपु-बाबा कदम हेच फक्त लेखक हे कबूल करावं लागतं. यांचं वाचलं की ढसाळ-चित्रे-कोलटकर हेच खरेखुरे कवी आहेत हे मान्य करावं लागतं. त्यांचं वाचलं की फमुं-फुटाणे-नायगावकर यांच्याबाहेर कविताच नाही हे लक्षात येतं आणि यांचं वाचलं की पोस्टमॉडर्न भानगडी लिहिणारेच समकालातले खरे ग्रेट कवी आहेत हे वाक्य मनात अगदी बोल्ड टायपात दुमदुमून जातं.

मी स्वत:शी म्हणतो, बालाजीभौ, फुक्कट रे, फुक्कट बीएला मराठीचे आठ पेपरं सोडवून पास झालास.

यांचं वाचलं की मोदींसारखा युगपुरुष प्रधानमंत्री आजवर झालाच नाही अशी खात्री होते. त्यांचं वाचलं की देवेगौडांसारखा झोपाळू गृहस्थसुद्धा अद्भुतच कार्यक्षमतेचा पंतप्रधान होऊन गेला असा समज होऊ लागतो. यांचं वाचलं की शरद पवारांसारखा ‘जाणता राजा’ होणेच नाही असे वाटते. त्यांचं वाचलं की मुलायमसिंग यादवच खरे समाजवादी आहेत यावर विश्वास बसायला लागतो. यांचं वाचलं की गोपीनाथ मुंडेच ओबीसींचे सच्चे तारणहार होते असं सिद्ध होतं आणि त्यांचं वाचलं की छगन भुजबळांशिवाय ओबीसींचा नेता दुसरा असूच शकत नाही हे मी शपथेवर कबूल करायला लागतो.
सिनेमावेड्या काहींचं जग स्मिता पाटीलच्या पुढंच जात नाही, (फेसबुकवर निदान अर्ध्याअधिक बायकांच्या प्रोफाईल फोटोमध्ये स्मिता असते. काही काही वेळा तर पुरुषांच्या देखील.) काही जण अजून मीनाकुमारी आणि मेरिलिन मनरोच्या काळात रमून असतात. दादा कोंडके हाच सर्वश्रेष्ठ नटश्रेष्ठ मायमराठीत होऊन गेला असं कुणी शड्डू ठोकून सांगत असतो आणि कुणी ‘आणि काशिनाथ घाणेकरांच्या’ कथा ठायीठायी सांगत राहतात. काहीजण शाहरुख खान हाच ‘किंग खान’ आहे असं मानत राहतात आणि कुणाला सलमान खान ‘बॉलीवूड बादशहा’ वाटत राहतो.

यांचं वाचलं की.. त्यांचं वाचलं की.. मी स्वत:शी म्हणतो,.. सोडा ! ही यादी कुठपर्यंतही वाढवता येणे शक्य आहे.

या सगळ्यांनी त्यांना काय हवं ते म्हणत राहायला आपला अजिबात विरोध नाहीय. पण हे भिडू तेवढ्यावर संतुष्ट होणा-यांपैकी नसतात. आपलं म्हणणं इतरांनाही तंतोतंत कबूलच असायला हवं यावर यांचा कटाक्ष असतो. हे म्हणणं मान्य नसणा-यासोबत हुज्जत घातली जाते. तेवढ्याने आवरला नाही तर अन्फ्रेंड किंवा ब्लॉक केलं जातं. ब्लॉक करणं ही व्हर्च्युअल जगातली सर्वोच्च सजा असते. आपण एखाद्याला ब्लॉक केलं तर त्याचं काहीतरी अपरंपार नुकसान होईल आणि नंतर त्याला पश्चात्ताप होईल असं मानून चालणा-या मंडळींची संख्याही अमाप आहे. ‘राम कृष्णहि आले गेले, त्यांविन जग का ओसचि पडले?’ वगैरे ओळींनीसुद्धा या मंडळींवर काही परिणाम होत असल्याचे दिसून येत नाही.

एक मात्र कबूल करावं लागतं, या सगळ्या निव्वळ बोलभांडाभांडीत अनेकदा मीही सर्व विषयांत दांडपट्टा फिरवत असतो. अभ्यासाचं काडीइतकंही पाठबळ नसलेली माझी मते रेटून नेत असतो. आणि वर उल्लेख केलेले ‘जनतेपैकी’ लोक एवढे बावळे असतात की ते माझ्या मतांशी सहमत होतात आणि माझ्या मतांच्या विरोधकांच्या मतांशीही सहमत होतात. माझ्या मतांशी सहमत नसणा-यांना मी ब्लॉक ‘मारतो’ आणि असणा-यांना विरोधी मतांवाले ब्लॉक मारतात.

हे लक्षात आल्यावर मात्र मी म्हणतो, यू टू, बालाजीभौ?

मग मी हसतो आणि स्वत:शी म्हणतो, हत्तेरेकी गुणिले महापद्मवेळा!

एकंदरीत काय, तर स्वत:लाच ‘हत्तेरेकी!’ म्हणून घ्यावं एवढा गोंधळाचा काळ आलेला आहे.
मोठ्ठाच गोंधळाचा.
---0---

(पूर्वप्रकाशित 'कृष्णाकाठ' दिवाळी अंक-२०१५)


- बालाजी सुतार. 

Comments

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध