या रिकामपणाचं करायचं काय ?



काय मग बंटीशेठ, लागल्या सुट्ट्या ?

लागल्या की !

मग आता काय मामाच्या गावाला जाणार ?

मामाच्या गावाला ? हे हे हे..बंटी खळखळून हसला. लहानंय काय मी आता, सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जायला ?

मग काय प्लान सुट्टीचे ?

प्लान कसले करणार ? सकाळ संध्याकाळ इथंच गावात इकडं तिकडं करायचं, दुपारी शेतात जायचं..

शेतातली कामं करतोस तू ?

न करून सांगतोय कुणाला ? दादाच्या किरकिरीपेक्षा शेतात जाणं परवडतं.. काम असू, नसू..

किरकिर करतात दादा ? का ?

गावात बोंबलत हिंडू नकोस’ म्हणतात..

गावाला हिंडायचंच कशाला पण ? काही वाचन लेखन करावं, काही खेळावं..

काय वाचणार इथं आपल्या गावात ? रोजच्या पेपराशिवाय आहे काय इथे वाचायला ?

तेही खरंच ! बाकीची मुलं काय करतात मग गावातली आपल्या, अशा सुट्ट्याबिट्ट्यांच्या दिवसात?

तुम्ही करायचा तेच ! बंटी पुन्हा हसला.

बंटीचं उत्तर ऐकून मी बराचसा ओशाळलो. कॉलेज चालू असताना सुट्ट्यांची परोपरीने वाट बघणारे आम्ही, प्रत्यक्षात सुट्ट्या लागल्यावर चार-दोन दिवसांतच वैतागून जायचो. कॉलेज चालू असताना जवळपासच्या शहरात असलेल्या कॉलेजला जाऊन येण्यात दिवस सरायचा. सुट्ट्यात अख्खा दिवस भारून टाकणा-या रिकाम्या वेळेचं काय करायचं हेच उमजत नसे. भारतातल्या लाखो दरिद्री खेड्यांसारखंच आमचं गाव. अर्धी अधिक वस्ती शेतक-यांची, अर्धी अधिक घरे पांढ-या मातीची धाब्याची, पाच-पंचवीस नोकरीवाले, उरलेले याच्या त्याच्या वावरात काहीबाही कामे करणारे. कमीअधिक फरकाने तेव्हा आणि आजही गावाचं हेच चित्र. आम्ही सकाळी उठलो की दणकेबाज न्याहारीबिहारी करून घराबाहेर पडायचो. गावाच्या बाहेरून जाणा-या रस्त्यावर स्टॅंड आहे, तिथं जाऊन या हॉटेलसमोर थांब, त्या टपरीसमोर उभा राहा, तिथे कुणाची वादावादी चाललीय, तर त्यात पडून ती मिटव किंवा त्यात तेल ओतून ती भडकाव असले उद्योग करायचो. या चित्रात अजूनही फार काही बदल झालेला असेल असा माझा समज नव्हताच. पण मी म्हटलं, चालू पिढीपेक्षा पंधरावीस वर्षांनी का होईना आपण पुराणेच. हल्लीची मुलं स्मार्ट आणि फास्ट असतात, वरवर उथळ वाटली तरी तीही गंभीरपणे विचार करतात वगैरे आपण सातत्याने इकडे तिकडे ऐकतच असतो तर आपल्या वेळी होतं त्याहून काहीतरी वेगळं चित्र हल्ली असू शकेल असं मनाच्या कोप-यात कुठेतरी होतं. तुम्ही करायचात तेच आम्ही करतो. या उत्तराने त्याला छेद दिला.
जरासा विचार केल्यावर असं लक्षात आलं की यापेक्षा काही वेगळं आजही गावात असणे शक्य नाही. वेळ घालवायचा म्हटलं तर स्टॅंड, तिथली मोडक्या कुडाची किंवा पत्र्याच्या शेडमधली हॉटेलं, पानटप-या किंवा फारच झालं तर सकाळी संध्याकाळी काही खेळण्यासाठी शाळेचं मैदान यापलीकडे दुस-या जागाच नाहीयेत. दहाएक हजार लोकवस्तीच्या या गावात एकसुद्धा ग्रंथालय नाही. हा लेख लिहिण्याचा विचार केला तेव्हा मी मुद्दाम आठ दहा खेड्यांतल्या मित्रांना फोन करून ग्रंथालयाबाबत विचारलं. फक्त एका गावात ग्रंथालयाची नुसती पाटी एका खोलीवर लावलेली आहे. आत एकही पुस्तक नाही. अर्थातच हे ग्रंथालय नुसत्या अनुदानापुरते असणार. जरा मोठ्या लोकवस्तीच्या गावात एखादा व्हिडीओही असतो. आता डीटूएचच्या माध्यमातून घरोघरीच व्हिडीओ अवतरल्यामुळे मूळ व्हिडीओचा धंदा तेजीत चालण्यासाठी करकरीत नव्या मसाला हिंदी फिल्म्स किंवा अधूनमधून ‘तसल्या’ फिल्म्स लावल्या जातात. त्यामुळे उजळ माथ्याने तिथे जाऊन बसण्याची सोय नसते. मग करायचं काय ? तर रानावावरातली कामं करायची किंवा गावातल्या गावात उचापती करत हिंडत राहायचे. तालुक्याच्या वगैरे जरा ब-या शहरातली पोरं निदान ‘स्पोकन इंग्लिश’ किंवा कॉम्प्युटर वगैरेंची क्लासेस जॉईन करतात. वाचनवेड्यांसाठी तिथे लहानमोठं एखादं का होईना, ग्रंथालय असतं. या पांढरमातीच्या गधड्या खेड्यात असलं काहीच नसतं. मग पोरांनी करायचं काय ?
काही ब-या घरची किंवा ज्यांचे आई वडील सुशिक्षित नोकरदार वगैरे असतात अशी किंवा कॉलेजच्या निमित्ताने शहरात राहून ज्यांना नवी क्षितिजे खुणावत असतात अशी काही चार सहा मुलं कुठून कुठून पुस्तके गोळा करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. बहुतेक वेळा या अभ्यासाला फार काही शिस्त नसते. साईटवरून MPSC – UPSC चा अभ्यासक्रम घ्यायचा आणि जमेल तसा अभ्यास करत राहायचं. मागच्या जवळजवळ वीस वर्षांत गावातली फक्त तीन मुलं स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी झाली. उरलेली बहुसंख्य मुलं बारावीनंतर डी.एड. करतात किंवा पदवी-पदव्युत्तर शिक्षणानंतर बीएडला जातात. डी.एड. झालेल्या मुलांची सीईटी होणार, होणार अशा वर्षानुवर्षे आवया उठत असतात. मध्येच कधीतरी ती होते आणि एखाददुसरा पोरगा लागून जातो. बी.एड. करणा-यांचे हाल आणखी वेगळे असतात. त्यांना सेट नेट व्हावं लागतं. जमल्यास पीएचडीही. तरीही प्राध्यापकी मिळेलच याची अजिबात खात्री नसते. मग स्थानिक गावपुढा-यांकडे अजिजी करून त्याच्या मध्यस्थीने कुणातरी संस्थाचालकाकडे लग्गा लावून खेटे घालत राहायचं. शिक्षकाच्या नोकरीचा भाव किमान दहा लाखांवर आणि प्राध्यापकाच्या पंधरा ते वीस किंवा अधिकही. हे परवडणारे फारच थोडे असतात. गबरगंड बागायतदाराच्या किंवा मुळातच गर्भश्रीमंतांच्या पोरांनाच ते जमू शकतं. बाकीच्यांनी काय करायचे ? गावात गटाळ्या मारत हिंडणे एवढाच एक मार्ग त्यांच्यापुढे उरतो. मग ही मुलं या - त्या सभापती, आमदार, खासदाराची कार्यकर्ती होऊन जातात. गावात दहावीपर्यंत शाळा असेल तर यातली काही मुलं एकत्र येऊन ‘अमुक ढमुक कोचिंग क्लासेस’ असं भारदस्त नाव देऊन एखाद्या खोलीत शिकवण्या घेतात. या शिकवण्यांची फीस शहराच्या तुलनेनं फारच कमी म्हणजे फारतर पन्नास ते शंभर रुपये महिना एवढी असते. शिकवण्या घेणा-या या तरुणांना गावात जराशा आदराने ‘सर’ म्हणून हाक मारली जाते एवढाच यात कमाईचा खरा भाग.
गावातल्या काही हॉटेलांच्या दारात कॅरमचे किंवा हल्ली गावोगावी आमदार-खासदार निधीतून सांस्कृतिक सभागृहं बांधलेली असतात, तिथे, ओसाड पडू घातलेल्या ग्रामदैवताच्या देवळात पत्त्यांचे फड भरतात, तिथे कोंडाळे करून अनेक जण बसलेले असतात. दहा-वीस रुपये औटिंगने दुपारभर खेळत राहतात. काहीजण दिवसभर सगळ्याच फडात टाईमपास करून जेवायच्या वेळेला घरी येऊन पुन्हा इकडे तिकडे टाईमपास करण्याच्या ड्युटीवर रुजू होतात. काहीजण संध्याकाळी शाळेत किंवा आणखी तशाच कुठल्या पटांगणावर व्हॉलीबॉल खेळतात. तो खेळ बघत पाच-पंचवीसजण तिथे बसून राहतात. इतर ‘क्रीडा’ प्रकारांमध्ये मोबाईलवर गेम्स खेळणं हा प्रकारही हल्ली जोमात असतो. काही मुलं पोलीस किंवा मिलिटरीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत असतात. ही मुले सकाळी-संध्याकाळी धावायला, व्यायाम करायला गावाबाहेर डांबरी सडकेवर जमतात. बकाल शहरीकरणाच्या सुजकट वाटेवरून प्रवास करत असलेल्या गावात हल्ली व्यायामासाठी तालमी वगैरे उरलेल्याच नाहीत. यातलाही एखाद-दुसरा मुलगा पोलिसात भरती होऊन जातो. बाकीची मुलं कंडक्टरच्याही परीक्षा देण्याचे प्रयत्न करून दमल्यावर चार दोन वर्षांत पुन्हा गावरहाटीतल्या ठरलेल्या खुंट्यावर येऊन उभी राहतात.  
शिक्षकांची किंवा तशाच सुस्थितीतल्या काहींची मेडिकल-इंजिनिअरिंग वगैरे करणारी मुले सोडली तर बहुसंख्य गावांतल्या बीए, बी.कॉम, बी.एस्सी करणा-या बहुसंख्य तरुण मुलांची ही अवस्था असते. यातले काही कंपन्यांमध्ये काहीबाही जॉब शोधत पुण्या-मुंबईकडे जातात. उरलेले रात्री उशिरापर्यंत बाजाराच्या पटांगणावर, कुणाच्या कट्ट्यावर, ओट्यावर गटागटाने बसून गावातल्या उखाळ्यापाखाळ्या, गावठी राजकारण किंवा क्वचित कुणा पोरीबाळींबद्दल काही चावटसावट बोलत बसतात.
शंभर घरांचे गाव असले तरी हल्ली तिथे बारीकमोठ्या आठ-दहा पक्षांच्या शाखा असतात. शिवाय जातनिहाय संघटनाही सध्या जोरात आहेत. पक्षीय, जातीय अस्मितांचे टोकदार भाले इथल्या बेकार पोरांच्या हातात देऊन या शाखा आणि संघटना जोमाने तरारून आलेल्या असतात. पोरांच्या या रिकामपणाबद्दल स्थानिक पुढा-यांना काही देणेघेणे नसते. दिवसेंदिवस एकानंतर एक अशा पिढ्यांची माती होतेय, हेही कुणाच्या गावी नसते. पोरांना उभारी मिळेल असे काही उपक्रम गावात राबवावेत, धंदेवाईक कीर्तन-प्रवचनकारांचे सोहळे घडवून आणण्याऐवजी, त्याच वर्गणीतून, पुढच्या पिढ्यांचं वैचारिक-मानसिक विश्व अधिक समृद्ध करू शकेल असं, हजारपाचशे पुस्तकांचं एखादं ग्रंथालय उभं करावं, असंही कुणा मुखंडांना वाटत नाही.
प्रत्येकच गावात हे चित्र इतक्याच काळ्या रंगाचं असेल असं नाही, पण पोरांना उजळ दिशांचं भान देणारी अशी गावं संख्येनं नजरेत भरण्याइतकीही नाहीत, हा यातला सर्वात दुर्दैवी भाग आहे. बहुतेक खेड्यांमध्ये आलेला प्रत्येक दिवस उगवला तसाच संपतो. पुन्हा दुसरा दिवस मागच्या पानावरून पुढे चालू होतो. जागतिकीकरणाच्या आणि दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होत चाललेल्या बाजारीकरणाच्या या काळात ऐन उमेदीचे दिवस असं बसून खाण्यात व्यर्थ घालवणं या मुलांच्याच नव्हे, तर तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणा-या एकूणच देशाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.
कुणा भाग्यविधात्याची वाट पाहत न बसता या रिकामपणाचं करायचं काय ?याचं उत्तर आता या मुलांनीच शोधायला हवंय ! 
(पूर्वप्रकाशित - दै. लोकमत 'ऑक्सिजन' - १ मे २०१५.) 
---0---
-          बालाजी सुतार, अंबाजोगाई.

Comments

  1. Replies
    1. FB वर तुमचे फ्यान हुतोच ....आता ब्लोगवर पण ....रिकामपणा म्हून नाय बरं

      Delete
    2. @Vaze Santosh- सर, आन्देव ! :D

      Delete
  2. ऐकू तर येत असतं आता खूप बदललाय भारत पण प्रत्यक्षात तसं चित्र खरंच आहे का हा प्रश्न तर पडतोच पण गोंधळूनही जायला होतं असं वाचलं की.

    ReplyDelete
    Replies
    1. ग्रामीण भारतात शहरीकरणाने आणून सोडलेली बकाली वगळता काहीही बदललेलं नाहीय.

      Delete
  3. माझं सासर तालुक्याच्या गावाच्या जवळ आहे. अगदी खेडं नाही. वर उल्लेख केलेल्या समस्या तिथेही आहेत.
    बऱ्याचदा दिवसा मित्राच्या garage वर जाऊन बस, संध्याकाळ झाली की तळ्याकाठी वेळ काढ़, असे उद्योग करतात मुलं. यातून fruitful असं काहीही निष्पन्न होत नाही. शिवाय दिवसेंदिवस असे गेल्या मुळे मनाला एक साचलेपणा येतो तो वेगळाच.
    छोटी मोठी नोकरी करावी तर तशा संधी अगदीच कमी. जवळपास नाहीतच. त्यामुळे रिकाम्या वेळाचं करायचं काय हां फार मोठा प्रश्न असतो.
    घरचा काही व्यवसाय किंवा शेती असेल तर तिथे contribute करू शकतात, पण यापैकी काही नसेल, नसेल वेळ खायला उठतो.
    माझा नवरा एक दोन दिवस सुट्टीला गेला तरी चुलतभावाच्या दुकानावर जाऊन बसतो. कारण दुसरं करणार काय? सुट्टीला गेलेल्या माणसाची ही कथा ती सुद्धा जेमतेम दोन दिवसांसाठी, मग तिथेच राहतात त्यांचं काय? वेळेचं करायचं काय?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

बाप घर के दरख़्त होते हैं..

उत्तरार्ध