पाचोळा: समकालीनत्वाची पन्नास वर्षे
मी सहावीसातवीला असेन शाळेत. आमच्या चिमूटभर गावात शेजारच्या गावाहून एक टेलर आला. त्याआधी आमच्या गावात शिंपी होतेच, अर्थात. पण ते फक्त बाप्यांचं खमीस किंवा बायकांच्या चोळ्या किंवा पोराटोरांच्या आडमाप चड्ड्या वगैरे शिवत असत. त्यांची दुकानं म्हणजे त्यांच्या घरातल्या ढाळजेत किंवा पुढच्या टीचभर ओट्यावर छपराचा आडोसा करून तिथे मांडलेलं शिवणयंत्र. कापड मोजायची टेपसुद्धा नसे त्यांच्याकडे. वीत–टीच, बोटे-कांडे अशा मापाने जुन्या कपड्यावरून अदमासाने बेतून ते खमीस शिवून द्यायचे. पोरांची चड्ड्यासदरे तर नुसत्या नजरेनेच माप घेऊन शिवली जात. ‘फिटिंगचे कपडे’ वगैरे काही मामलाच नसे. साधारण एकोणीसशे पंचाऐंशी-शहाऐंशीच्या दरम्यानची ही गोष्ट. गावाला शहरी वारा नव्हता अजिबात. मला आठवतं, गावातल्या कुठल्याही दुकानावर दुकानाच्या नावाचा बोर्ड नव्हता. दोनचार बारकी किराणा दुकाने होती. त्यांना फलाण्या मारवाड्याचं दुकान, बिस्तान्या वाण्याचं दुकान असं थेट मालकाच्या नावाने ओळखलं जायचं. एकुणातच कृष्णधवल टीव्हीतल्या चित्रासारखा बिनमोहक काळ होता तो. अशात, बाहेरगावाहून आलेला तो टेलर स्वत:सोबत अनेक नव्या गोष्टी घेऊन आ...