उत्तरार्ध
मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ पंचाहत्तर वर्षांचा आहे. माझ्या वयाची पहिली पंचवीस वर्षेसुद्धा अशी उदाहरणार्थ वगैरेच निघून गेली हे मी तुम्हाला आधी कधी सांगितलं होतं का? पूर्वी काय काय कसं कसं झालं होतं आणि मी कधी कधी कुणा कुणाला काय काय सांगितलं होतं हे तंतोतंत पंचाहत्तर वर्षे एवढ्या वयोमानामुळे हल्ली मला हुबेहूब आठवत नाही हे साहजिकच आहे. पूर्वी माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या सद-यांनाही नीटच माहित असायच्या. हल्ली त्या मलाच नीट माहित नसतात. हेही थोरच वगैरे. मात्र ज्याअर्थी हे माझं मलाच कधी कुठे काय कसं झालं हे हुबेहूब आठवत नाही त्याअर्थी पहिल्या पंचविसासारखीच ही पुढची पन्नास वर्षेही आधीसारखीच निव्वळ उदाहरणार्थ निघून गेली असावीत असं म्हणायला वाव आहे. आजवर इतकी वर्षे आपण इथे थेट वगैरे काढलीच अशी घमेंड अजूनही असल्यामुळे आणखी निदान पंचवीस तरी वर्षे आपण इथे थेट काढूच असं पूर्वी वाटायचं. तसं आता जग आधीपेक्षा ज्यास्तीच भयंकर थोर झालेलं असल्यामुळे आधीसारखं फारसं थेट वगैरे जगता येत नाही हे मात्र खरे आहे. वय झालंय हे खरंच आहे पण पंचाहत्तर म्हणजे काही फार थोर वय नाही हे म्हणणे पंचाहत्तर...