उत्तरार्ध
मी पांडुरंग सांगवीकर.
आज उदाहरणार्थ पंचाहत्तर वर्षांचा आहे.
माझ्या वयाची पहिली पंचवीस वर्षेसुद्धा अशी उदाहरणार्थ वगैरेच निघून गेली हे मी तुम्हाला आधी कधी सांगितलं होतं का? पूर्वी काय काय कसं कसं झालं होतं आणि मी कधी कधी कुणा कुणाला काय काय सांगितलं होतं हे तंतोतंत पंचाहत्तर वर्षे एवढ्या वयोमानामुळे हल्ली मला हुबेहूब आठवत नाही हे साहजिकच आहे. पूर्वी माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या सद-यांनाही नीटच माहित असायच्या. हल्ली त्या मलाच नीट माहित नसतात. हेही थोरच वगैरे. मात्र ज्याअर्थी हे माझं मलाच कधी कुठे काय कसं झालं हे हुबेहूब आठवत नाही त्याअर्थी पहिल्या पंचविसासारखीच ही पुढची पन्नास वर्षेही आधीसारखीच निव्वळ उदाहरणार्थ निघून गेली असावीत असं म्हणायला वाव आहे. आजवर इतकी वर्षे आपण इथे थेट वगैरे काढलीच अशी घमेंड अजूनही असल्यामुळे आणखी निदान पंचवीस तरी वर्षे आपण इथे थेट काढूच असं पूर्वी वाटायचं. तसं आता जग आधीपेक्षा ज्यास्तीच भयंकर थोर झालेलं असल्यामुळे आधीसारखं फारसं थेट वगैरे जगता येत नाही हे मात्र खरे आहे. वय झालंय हे खरंच आहे पण पंचाहत्तर म्हणजे काही फार थोर वय नाही हे म्हणणे पंचाहत्तरी उलटलेल्या कुणालाही लगोलग पटेलच. त्यांची पंचाहत्तरी मात्र हुबेहूब उलटलेली असली पाहिजे. तर ते असो.
सांगायचा मुद्दा असा की या मधल्या सनावळीच्या हाफ सेन्च्युरीत मी काय काय केलं.
तर काही झालं तरी लोक आपल्याला खुंट्यावर आणून उभं करतातच हे उमगल्यावर मग नेमकं आपणच खुंट्यावर येऊन उभं राहिलेलं बरं असं ठरवून मी एकदाचा खुंट्यावर येऊन उभा राहिलो या गोष्टीचा फायदा घेऊन घरच्यांनी लगोलग सोय-याची एक पोरगी मला दाखवली आणि ती हुबेहूब कुणाही पोरीसारखीच असल्यामुळे मी तिच्याशी लग्न करण्याचे कबूल केले. तेव्हा आमच्या वडलांना आणि आईला आणि आजीला स्वर्गप्राप्तीच्या ग्यारंटीने अतोनात आनंद झाला. एकंदरीत माझे लग्न होऊन त्यांना नातू पणतू झाला तरच इथून बस्तान उठल्यावर आपल्याला मोक्ष मिळून स्वर्गप्राप्ती होईल असे त्यांचे मत होते. आता वडलांचं सोडा, आपल्या आईला आणि आजीला मेल्यानंतर स्वर्गात जागा मिळू नये असे कुणाला वाटेल? मग मी खुंट्यावर येऊन उभे राहणे उदाहरणार्थ रास्तच आहे असे मलाही वाटले. मग मी जरासे प्रयत्न केल्याबरोब्बर माझ्या बायकोला हुबेहूब पहिलाच पोरगाही झाला. पुढे आठ वर्षांनी वडील वारले. तेव्हा ते गावातल्या सोसायटीचे चेअरमन होते. गांजेकस मालगुजाराने निव्वळ गड्यांच्या जीवावर वावराचा कारभार हाकावा तशा अघळपघळ शैलीत ते नामू नामक सेक्रेट्रीच्या जीवावर सोसायटीचा गाडा हाकत असत. पुढे काय झालं तर काहीतरी चमत्कारिक खेळी करून नामूसेक्रेट्रीने सोसायटीत पंचवीस तीस हजारांची रोख अफरातफर केली. ती भानगड सह्यात गुंतलेले असल्यामुळे वडलांच्या अंगाशी आली तेव्हा त्यांनी नामूसेक्रेट्रीला निव्वळ जोड्याने हाणले. पण तो काहीच कबूल करेनासा झाला. तेव्हा यांनी तात्पुरती उधार-उसनवार, काही सावकारी कर्ज असं करून ते पैसे सोसायटीत भरून टाकले आणि ‘उराला वाळू लागली तेवढी पुरे’ असं म्हणून राजीनामा खरडून दिला. पुढे दर सुगीला अडत्याकडून पट्टी आली की फेड कर्ज असं करून दोन-तीन वर्षांत त्यांनी ते कर्ज फेडलं. उघड दाखवली नाही पण त्या भानगडीत त्यांनी बरीच हाय खाल्ली होती. कर्ज फेडून झाल्यावर काहीतरी आठ-दहा दिवसात एका दिवशी दुपारी रानात झाडाखाली झोपलेले असताना झोपेतच ते मरून गेले. एक माणूस आपल्या अंगाशी आलेले किटाळ दूर करून मुक्त होतो आणि शांतपणे मरून जातो ही गोष्ट मला अजूनही थोर वाटते. एव्हाना मला पुत्ररत्न झालेले असल्यामुळे मेल्यानंतर त्यांना निश्चितच स्वर्गप्राप्ती झाली असेल अशी आमच्या गावातल्या अनेकांची तेव्हा खात्री झाली असल्याचे त्यातल्या काहींनी मला बोलून दाखवले होते. हे तर त्याहून थोर. वडील गेल्यानंतर चारच महिन्यांत आई वारली आणि मुलाचं आणि सुनेचं मरण बघेपर्यंत देवा चांडाळाने मला का ठेवलं इथं असा धोसरा खाऊन खाऊन पुढे वर्षभराने आजी गेली. माझ्या लग्नानंतर दोन वर्षांनी जाईचं आणि लगेचच एका वर्षाने नलीचंही लग्न वडलांनी लावून टाकलं होतं. त्यामुळे आजीच्या मरणानंतर मी उदाहरणार्थ फक्त माझ्या बायको-पोरापुरताच उरलो.
आता दिवस माझे आणि रात्रीही माझ्या होत्या. वडील वारकरी आणि गावाचे महाजन वगैरे पूर्वापार असल्यामुळे अडीनडीला त्यांच्या आठवणी काढून हैराण होणारे कित्येक लोक गावात होते. शिवाय सोटम्या, लखुशेट, लालाजी वगैरे जगण्यातून मुळं उखडलेली आणि मेंदूला अस्तर नसलेली आमची मूलभूत कंपनी गावात होतीच. त्यामुळे मला गावात दिवस वगैरे रेटून काढणं काहीच कठीण नव्हतं. आपण शिक्षणावगैरेसाठी काही वर्षे हुबेहूब पुण्यासारख्या भंपक शहरात राहून आलेलो आहोत याचा समूळ गंड मनातून निघून जायला तरीही काही वर्षे जावीच लागली. एकदा हा गंड गेल्यावर मात्र मी निव्वळ गावकरी बनून गेलो. शहरातल्या आणि गावातल्या माणसात फक्त कपड्यांचाच फरक असतो आणि शहरी लोक दिवसातून चारदा तरी केसांचा नीट भांग पाडून जगत राहतात आणि त्यांच्याकडे केस कापण्याची ऐटबाज सलूनं, सिनेमांची थेटरं आणि उडप्यांची हॉटेलं असतात आणि आपल्याकडे ती नसतात एवढाच फरक असलाच तर असतो हे मला नीटच कळून चुकले. पण आपल्याकडे त्याहून थोर अशा कैक गोष्टी असतात. उदाहरणार्थ कुठल्याही थेटरापेक्षा थोर असा वडाभोवतीचा पिढ्यानपिढ्या पार आणि कुठल्याही उडप्यापेक्षा ज्यास्त जिवंत असं सदू कोळ्याचं कुडाचं हॉटेल आणि कुठल्याही लायब्रीहून ज्यास्ती थोर शहाणपण शिकवणारं पिकांसकट शिवार आणि नदीसकट डोंगर आणि पाखरांसकट झाडं हे सगळं शहरात नसतंच. कुणब्यांसकट खेडं ही तंतोतंत कशाहीपेक्षा थोरच गोष्ट असते. शिवाय आपल्याकडं वर्तमानपत्रांसकट संपादक वगैरे हुबेहूब बंडलबाज गोष्टीही नसतात. आणि कुटुंबनियोजनावर रेडिओतून श्रुतिका वगैरे तिकडे ऐकू येतात त्याच इकडेही हा वैताग सोडला तर लता, रफी वगैरे लोक आपल्यासाठीही गातच असतात. एकदा हे सगळं मूलभूत पक्केपणानं उमजल्यावर निव्वळ नंगधडंग होऊन मी गावरहाटीत मिसळून गेलो. मग पुढचं सगळं सोपंच होऊन गेलं.
गावात असं बस्तान बसल्यावर मग मी गावपातळीवर एकदमच उत्साहात आलो. बाकी काही आपल्याला नाहीच जमलं तर निदान वावरात नीट लक्ष घालून आपण उत्तम शेतकरी का होऊ नये अशा विचाराने शेतात जाऊ येऊ लागलो. मी म्हटलं शेती हा रोजगार नसून ती जीवनशैली आहे अशा वगैरे धारणांनी ही वंशपरंपरा रक्तात मुरलेली काबाडकष्टी जीवनशैली आपणही जगूनच पाहू. तेणेकरून जवळजवळ कामातून गेलेला पांडूतात्या रानात काही झोंब्या घेतोय हे पाहून उत्तरोत्तर गावात आणि पाव्हण्यारावळ्यात माझी प्रतिमा फारच सुधारून गेली. उदाहरणार्थ गावातल्या सप्त्यात किंवा गावजेवणात यंदा गुळवणीभात करायचा की गुळाचा शिरा नि कढी करायची असल्या किंवा फलाण्याच्या पोरीचं लग्न जमवू घातलेला पोरगा मास्तरच्या हुद्यावर आहे तर त्याला ज्यास्तीत ज्यास्त किती हुंडा द्यावा असल्या एकदम महत्वाच्या नियोजनात लोक माझा सल्ला विचारू लागले तेव्हा मी पुरताच प्रतिष्ठित झालो असल्याची मला खात्री पटली. आपले लोक एखाद्याच्या प्रतिमा सुधारणेच्या कामात इतक्या उत्साहाने मदत करतात ही हुबेहूब थोर गोष्ट नाही असे कोण म्हणेल ? म्हणेल तो म्हणेल.
एकदा खुंट्यावर येऊन नेमके उभे राहिलो की आपल्याला चाराचंदी, कडबावैरण वगैरे गोष्टी तर उपलब्ध होतातच पण जगण्याइतका प्राणवायूही आपल्यापर्यंत तंतोतंत पोहचायला लागतो. आपल्याआतली अस्सल मानसिक वस्त्रं आणि त्याआतली चिलखताइतकी टणक अस्तरं विरघळू लागली की मग आपण माणसात आलो असं मानणारं हे खेड्यातलं जग अतोनात गधडं असतं. इथल्या रहाटीत एकट्यादुकट्या माणसाला शून्य किंमत असते. तुमचा शेजारी, तुमची भावकी, तुमचे सोयरे, तुमची गल्ली, पलीकडची गल्ली आणि वेशीतलं लखूशेटचं दुकान आणि ग्रामपंचायत हद्दीतल्या भानगडी ते सटीला माळावर भरणारी जत्रा इथपर्यंत आपल्या कक्षा संकोचता आल्या की मग तुम्ही सबंध गावाचे होऊन जाता. त्या पलीकडं असतंच काय ? तर शहरं, महानगरं, एसट्या, ट्रेनी, विमानं, रणगाडे, तोफा आणि क्विक मार्च आणि शूट ॲट साईटच्या आदेशांनी व्यापलेलं मानसिक कर्फ्यूग्रस्त सत्ताधीश अंतराळ आणि वर्तमानपत्रं, मासिकं, पुस्तकं, कथा, कादंब-या, कविता, समीक्षा, वाचकांचे पत्रव्यवहार आणि अश्लील पुस्तकं विकणारी एस्टीस्टॅंडवरची स्टॉल्स. हे जगणं नाही, याला मुळांशी भिडणं म्हणत नाहीत. पण याला इलाजही नाही. आपण आपले कोश इथल्यापुरते मर्यादित अधिक बंदिस्त करून घेतले तरच इथला रहिवास निदान प्रथमदर्शनी सुखाचा होऊ शकेल.
होता होता असं झालं की इंदिरा गांधी नामक एका जनहितैषु सत्तालोलूप पंतप्रधान बाईंनी एकदा रातोरात आणीबाणी नावाच्या एका घटनादत्त अमानुष कायदेशीर यंत्राला गती देऊन चालू केले ही गोष्ट आम्ही फक्त रेडिओवरून ऐकली. त्यावर चार-सहा महिने उलटून गेले तरी आमच्या गावापर्यंत या चक्राची चाकं काही आली नव्हती. मुंबई दिल्लीत काय असेल ते असो, आपल्याला त्याचं काय असं म्हणून आम्ही गपगार होतो. पण एका सकाळी झालं काय तर सोटम्या उठून देवळासमोरच्या पारावर उभा राहिला आणि त्याने इंदिरा गांधी मुर्दाबाद अशा पाचपंचवीस घोषणा दिल्या. आमच्या गावातले लोक इतके तंतोतंत थोर की त्यांनी हसून सोडून देण्यापलीकडं सोटम्याची काहीएक दखल घेतली नाही. आपण चाळीशीला पोचलो तरी हे कर्मदरिद्री लोक आपल्याला अजून सोटम्याच म्हणतात याने सोटम्या ज्यास्ती दुखावलेला होता. सोटम्याने मग इंदिरा गांधी मुर्दाबाद हा घोष जपाला बसावं तसा रोज सकाळ संध्याकाळ पारावर चालू केला. कुणी कळवलं, की त्यांची स्वत:ची काही यंत्रणा होती कोण जाणे, चार सहा दिवसानंतर तालुक्याहून येऊन एके रात्री पोलिसांनी सोटम्याची उचलबांगडी केली. सकाळी गावात सगळ्यांना कळलं तेव्हा ‘बरं झालं, पीडा गेली’ इतक्या स्वस्तात लोकांनी सोटम्याला झटकून टाकला. अठरा महिने सोटम्या नाशिकच्या जेलमध्ये होता. त्याला त्याच्या घरूनसुद्धा कुणी भेटाबिटायला गेलं नाही. तिथून आल्यावर घरी न जाता तो थेट देवळात राहू लागला. कुणाशी काही काहीही बोलेनासा झाला. त्याच्या घरून सवड मिळेल तसं कुणीतरी त्याला दिवसातून एकदा भाकरीभाजी फडक्यात बांधून आणून द्यायचा. भूक लागेल तेव्हा खाऊन देवळातल्या खांबाला पाठ देऊन तो बसून असायचा. होता होता एक दिवस गिरधरसारखाच तो देवळातून कायमस्वरूपी गायब झाला. पुढे तो कुणालाच भेटला नाही. तो पळून गेला की त्याचं भस्म झालं हे कुणालाच कळलं नाही. नाही म्हणायला तो तुकारामासारखा सदेह स्वर्गाला गेला अशी एक बातमी रात्री देवळात पोथीला जमणा-या काहींनी उठवली होती. पण सोटम्यासारख्या थोर निरुपयोगी माणसाचा देवाला तरी काय उपयोग असं म्हणून गावातले काहीजण हसत सुटले तेव्हा हळूहळू वावड्या बंद झाल्या. मी लालाजीला म्हणालो, सोटम्यासारखी माणसं चांगलीच असतात. ती अशी जातात हेही चांगलंच असतं. लालाजी म्हणाला, खरं आहे. हे जग सोटम्यासाठी योग्य नव्हतंच. आज ना उद्या सोटम्याला जावंच लागलं असतं.
मध्यंतरी एकदा राजकारणाने गावाचे फार वाटोळे झाले असल्याची चर्चा सुरु करून गावातले जुने म्हातारे फारच भावनावश झाले आणि त्यातून गावातल्या गल्लोगल्लीच्या म्होरक्यांनी मिळून निदान आपल्या गावात आपण एकोप्याने राहू, तालुक्याचा आमदार आणि पंचायत समितीचा सभापती असल्या ति-हाईत लोकांनी इकडे लक्ष देऊ नये अशी भूमिका घेतली. ही भूमिका खरोखर थोरच होती. त्यामुळे कधी नव्हे ते मी त्या भानगडीत लक्ष घातले तेव्हा गावातल्या लोकांनी प्रत्येक वार्डातून एक सदस्य बिनविरोध काढून आणि मला सरपंच म्हणून नेमून माझ्या तंगड्या माझ्याच गळ्यात घातल्या. वडलांच्या सोसायटी प्रकरणात आमच्या घराचे चांगलेच हात पोळून निघालेले होते. तरी आपण स्वत: सगळ्या कारभारात काटेकोर लक्ष घालू कारण ऐन उमेदीच्या काळात आपण पुण्यात वगैरे राहून आलेलो असल्याने निदान आता आपण कुणाकडून फसणं शक्य नाही आणि निदान पुण्याइतके भामटे आपल्या सांगवीत नक्कीच नाहीत असे स्वत:शी म्हणत मी सरपंच व्हायला मान्यता दिली. तेव्हा घरी परतल्यावर दारातच बायकोने मला पंचारतीने ओवाळून काढले ही मात्र अतोनातच विनोदी गोष्ट झाली. पुढे मग असं झालं की मी कुणाच्याच गटात शिरून गावात भाऊबंदकी वाढवत नाही आणि मतांच्या दृष्टीने दिवसेंदिवस ज्यास्तीच निरुपयोगी होत चाललो आहे हे पाहून आमदार आणि सभापती या दोघांनीही आमच्या गावाच्या सगळ्या विकासयोजना तालुक्यातच अडवून ठेवायला चालू केलं. एरवी या दोघांमधून विस्तवही जात नसे पण सांगवीच्या बाबतीत हे दोघे सख्ख्या भावासारखे एकत्र येऊ लागले. ही अडवणूक माझ्या आडमुठेपणामुळेच होते आहे, मी त्या दोघांपैकी कुणाशी तरी जुळवून घ्यावे असे सांगून तरीही मी ऐकत नाही म्हटल्यावर शेवटी मला बिनविरोध सरपंच म्हणून निवडणारे आमचे गल्लोगल्लीचे म्होरकेही माझ्यावरच भयंकर वैतागून पुढच्या वेळी अगदी बुंगाट सोन्याला सरपंच करू पण पांडूतात्या नको असे एकमेकांत बोलू लागले. बुंगाट सोन्या हा आमचा सद्गृहस्थ ग्रामबंधू दिवसरात्र डोंगरात भिल्लांनी लावलेली हातभट्टी पिऊन ल्हास होऊन पडलेला असायचा. तो चालेल पण मी नको इथवर लोक येऊन पोहचले तेव्हा मला उदाहरणार्थ जरासे वाईटच वाटले. तरी मी पाच वर्षे रेटून काढलीच. गावातल्या नाल्या नीट उतार बघून काढणे आणि पावसाळ्यात अतोनात चिखल होणा-या गल्लीतल्या मातीच्या रस्त्यांवर मुरुमाचे रस्ते करणं एवढा तरी मी सांगवीत विकास केलाच. पुढच्या वेळी मी सरपंच होण्याचा प्रश्नच नव्हता. लोकांनी मला फक्त तोंडदेखल्या सल्ल्यापुरतेच मानायला सुरुवात केली. मी म्हणालो हे असंच असणार पांडूतात्या. लोकांना स्वाभिमानात रस नसतो, कुणाच्या पायातळी लोटांगण घालून का होईना मतलब साधण्याशी लोकांना कर्तव्य असते. मी म्हणालो, बहुत पाकीज़ा समझ बैठे थे इस शहर को. यहां तो राहजनों की बस्ती निकली. मग मी राजकारण वगैरे भाकड गोष्टी डोक्यातून काढून टाकल्या. हा मात्र माझा आजवरचा सगळ्यांहून थोरच निर्णय.
एकाअर्थी आपण या झंझटीतून सुटलो हे बरंच झालं. इथल्या जगात क्रूरपणाला काही सीमा नाही. मल्हार जाधवाने एके दिवशी बायकोची मान कडबा कापायच्या कात्रीत दाबून धरून तिचं मस्तक धडावेगळं केलं. कारण काय तर दुपारची भाकरी घेऊन तिला शेतात यायला बराच उशीर झाला. मल्हारने तिला उशिराचं कारणबिरण काहीही विचारलं नाही. त्याने एक जोरकस लाथ मारून तिला आडवं केलं आणि कडब्याच्या कात्रीने मध्ययुगीन शैलीत तिचा शिरच्छेद केला. म्हणजे एका भाकरीची बाजारभावाने किंमत काय असेल ? मल्हारच्या बायकोची किंमत एका भाकरीएवढीही नसेल तर इथे जन्म घेऊन तिनं मल्हारची बायको का व्हावं? उसने घेतलेले दहा रुपये माघारा देईनासा झाल्याचा राग मनात धरून यंकटी लव्हाराने सख्ख्या भावाच्या म्हणजे रघू लव्हाराच्या डोक्यात औताची लोखंडी पास हाणली आणि तोंडातून अवाक्षरसुद्धा न काढता जागच्या जागी रघू मरून गेला. अपघातात दोन्ही पाय तुटलेल्या ट्रक ड्रायव्हर हरीची बायको दिवसेंदिवस त्याचं हगणं मुतणं न करवेनासं होऊन इबू मुसलमानाशी संधान बांधून पळून गेली. नारायण भटजीचा इंजिनिअर पोरगा बांधकाम खात्यात नोकरीला लागून बापाला खडकूदेखील पाठवेनासा झाला. आता असल्या गोष्टींनी आपला भोवताल व्यापलेला असल्यावर कधीतरी आपणही असेच क्रूर होऊन जगरहाटी ही अशीच असते असं मानायला लागून फक्त आपल्यापुरतं बघू लागलो तर मात्र कठीण होईल असं वाटून मला सरपंचकी सुटल्याचा एकुणात आनंदच झाला.
भोवरे आपली पाठ सोडत नाहीत. काही केल्या इथल्या पेशी आपल्या रक्तात मुरत नाहीत. मग मी म्हणतो इथल्या जमिनीशी आपलं जुळत नाहीच तर आपण आकाशाशी जुळवून घ्यावं. मग शीर्षासन करून मी आकाशगामी होऊ पाहती. जमिनीतली मुळं उलट्या दिशेने आकाशात रुजवण्याचा प्रयत्न करतो. श्वासात माजलेला धुळीचा गदारोळ शमवण्याचा प्रयत्न करतो आणि आकाशातल्या स्वच्छ हवेने फुफ्फुसं भरून घेण्याचा प्रयत्न करतो. उंची गाठलेल्या आकाशात ऑक्सिजन विरळ असतो हे मी का विसरतो ?
वावरात रेघ धरून भुईमुगाचे वेल उपटत असताना माझी बायको तडकाफडकी नाग चावून गेली तेव्हापासून घर अगदीच अंगावर येऊ लागलं की अधूनमधून मी दुपारचा इकडे वडाच्या सावलीत येऊन बसतो. आमच्या गावातल्या बारक्या ओढ्याच्या अगदी काठावर चित्रात दाखवतात तसा एक प्रचंड मोठ्ठा वटवृक्ष आणि त्याखाली एक प्रचंड छोटं महादेवाचं देऊळ आहे. निदान तीन चारशे वर्षे तरी त्याची उमर असेल. मुळ्यांचा, फांद्यांचा आणि पारंब्यांचा महाप्रचंड थोर पसारा. लहानपणी शाळा बुडवून तिथल्या डोहात आम्ही पोहायला जायचो. आता पाऊसकाळाशिवाय ओढ्याला पाणी नसतं. पोहण्याची नादिक पोरं मग उन्हातान्हाची शिवारातून विहिरी धुंडाळत हिंडतात. गावरहाटीतून बाहेर फेकलेले आणि घरातही किंमत नसलेले काही म्हातारे दुपारी वडाच्या झाडाखाली झोपायला येतात. झोप असतेच असं नाही, मग जमेल तोवर स्वत:च्या जवानीपासून पुराणकाळापर्यंतच्या कथा एकमेकांना सांगत बसतात. अनेकदा बाकीचे झोपी गेले तरी बोलणारा तसाच बोलत राहतो. यात सगळ्यांहून चिवट बोलणारा म्हणजे पोराकडून खडकूसुद्धा येत नसलेला नारायण भटजी. नारायण भटजीला फक्त टीचभर घर आहे. पंचक्रोशीभर भिक्षुकी करून त्याने आईविना पोराला जिद्दीने शिकवलं होतं. हल्ली त्याचं डोकं लाख विवंचनांनी हल्लक झालेलं असतं. त्याला बोलायला सोबत लागत नाही. एकदा पारावर बसून तो बोलत असताना शेजारी मी ऐकत होतो. शेवटी काय पोरगा काय न कोण काय. कुणी किती नवकोट नारायण झाला तरी त्याने माझ्या दारातला वठलेला पिंपळ जीव धरत नाही. मग देवा सोनाराचं अर्धांग कुठून बरं होणार ? घागरीघागरीनं अर्ध्या मैलाहून पाणी आणून आणून जाईबाईनं माळवं जोपलं. धग असते रे राजा, धग असते पेरलेली मनुष्ययोनीतल्या जन्मात. नाद सोड. गिरक्या घे. उडत्या पाखराची पिसं मोजू नकोस. आपली म्हणावीत अशी पिसंच असतात रे त्यांच्याजवळ. दुपारभर उंबराच्या फांदीवरून कातीव विहिरीत झोकून दे अंग आणि उपरणं रे कशाला हवंय ? वाळूत पड उताणा जरा वेळ. योगेश्वरा, गायीला घास नकोस देऊ, घरोघर खातातच त्या पुण्यवंतांच्या हातून शिळ्या भाकरीचे दगडी तुकडे आणि पाप्यांच्या हातून रेशमी पुरणपोळ्या. त्यापेक्षा माळवदावर दुपारी येतंय त्या शेपूटतुटल्या भयाण तान्हेल्या वानराला पाणी पाज, मग शेंगा फोडत निवांत बस ओसरीवर. लक्षात ठेव लेकरा की नाकर्त्याच्या वावरात जवारी उगवत नाही कधीच. भयंकर कशाचा कशाला मेळ नाही अशा शैलीत नारायण भटजी बोलत राहतो. त्याचं बोलणं ऐकून घेणारा कुणी त्याच्यासोबत नसतो ही केवढी तरी थोर गोष्ट. ऐकून घेणारा आठ पंधरा दिवसांत स्वत: तसाच बोलायला लागण्याची खात्रीच तंतोतंत.
मुठीतून वाळू भुरभुरत जावी आणि तिचा मागमूसही राहू नये तशा निरुद्देश दिवसांची फोलफटे उडून जातायत दर दिवसाच्या भिंगराट वा-यावर. कितीही आणि कसाही हिशोब मांडला तरी आयुष्याच्या ताळेबंदात दोन्ही बाजूंना निव्वळ अर्थहीन शून्यांचीच गिचमिड मांडणी शिल्लक राहू पाहतेय. महिनोमाल ठरलेला पगार घेणा-यांचं सोडा; बाकी सत्तर-पंचाहत्तर वर्षे इथं तगून राहणा-या आमच्यासारख्यांचं क्रूर शौर्य चिवटपणाच्या कोणत्याही कसोट्या लावल्या तरीही कौतुकास्पदच उरतं. मी म्हणालो, कैसे सांस लूं इस गाँव में, इस हवा के किसी कतरे पे मेरा नाम ही नहीं है| ते म्हणाले, कहीं और न हुआ, न सही, आखरी सांस पर तो तेरा ही नाम होगा |
अन्शा नावाच्या एका मुसलमान पोराने मध्यंतरी व्हिडीओ नावाचा एक भूलभुलैय्या गावात आणला. याचं नाव ‘अनिस’ असं होतं. पण तशी हाक त्याला त्याच्या आईनेसुद्धा कधी मारलेली कुणी ऐकली नव्हती. घरातल्या अपरंपार थोर दारिद्र्याला वैतागून हा लहानपणीच कुठेसा पळून गेला होता. तिकडून लाख धंदे करत करत शेवटी ड्रायव्हिंग शिकला आणि पुन्हा लाख उचापती करत कुणा शेखाच्या कंपनीत ड्रायव्हरकी करायला थेट दुबईला निघून गेला. आठ दहा वर्षे तिकडे राहून अचानक एका दिवशी तो सांगवीत परत आला. काही दिवस चैनचमन केल्यानंतर वेशीत लखुशेटच्या दुकानाशेजारी त्यानं हा व्हिडीओ चालू केला. पहिल्या रात्री त्याने वेशीतच बाहेर मांडामांड करून जगप्रसिद्ध थोर असा शोले हा सिनेमा गावक-यांना फुकट दाखवला तेव्हा वेशीबाहेरचं पटांगण बायापोरांनी आणि पुरुषांनी वट्टात भरून गेलं. लोकांना असं फुकटात नादी लावून झाल्यावर पुढे त्याने रुपया तिकीट लावून रोज तीन खेळ चालू केले. रोज तालुक्याच्या गावातून कॅसेट यायला लागली. करमणुकीच्या या नव्या प्रकाराने सबंध गावाला वेड लावून टाकलं. व्हिडीओ येण्यापूर्वी गावभर सरळसोट वाटणी अशी होती की बाप्यांनी पारावर लष्कराच्या भाकरी भाजून, पान-तंबाखू चोळून, कोळ्याच्या हाटेलीत चहापाणी करून, टोटल वेटाळाच्या उखाळ्यापाखाळ्या काढून, पत्तेबित्ते पिसून, दिल्लीच्या ऐकीव राजकारणावर अधिकारवाणीने मतप्रदर्शन करून उरलेल्या वेळेत रानामाळात कामं करायची आणि बायकांनी दोन्हीवेळा स्वैपाकपाणी नीट करून, धुणीभांडी करून, पोराबाळांसकट खरकटी निस्तरून, आडावरून 'येना' देत निदान चारसहा घागरी पाणी भरून उरलेल्या वेळेत रानामाळात कामं करायची. रिकामटेकडी तरणी पोरं रानामाळात हिंडून किंवा शाळेमागच्या तालमीत झोंब्या खेळून दिवस घालवायची. आता अधूनमधून घरावावरातली कामंही करणारी ही सगळी रिकामटेकडी माणसं आणि पोरं कायम व्हिडीओत किंवा व्हिडीओच्या अवतीभोवती असायला लागली. बायांवर कामांचा दुप्पट जोर पडू लागला हे तर झालंच पण वेळेला घरात गाडग्यामडक्यातून बायांनी ठेवलेले पैसेही हे भिडू चोरायला लागले. शिवाय बेकार डायलॉगबाजी आणि गावठी प्रेमप्रकरणांनाही गावभर ऊत आला. होता होता काही वेळा मीही तिथे जाऊन घाणेरडे हिंदी सिनेमे पाहायला लागलो ही मात्र एकंदरीतच थोर गोष्ट ठरली.
तवायफों-के-से दिन हैं, इमानदार-सी रातें. क्या मैंने कहा, क्या तुमने सुनां, सब धुआँ-धुआँ, बेमानी सी बातें.
बायको नाग चावून वारली तेव्हा आमचा संसार काहीतरी तेवीस किंवा पंचवीस वर्षांचा झाला असेल. लग्न झाल्यावर माझ्यासारखा तंद्रीबाज नवरा पाहून सुरुवातीला ती बरेच दिवस जराशी सचिंत असायची. आमचा एकूण बारदाना मोठाच असल्यामुळे घरात माणसं, गडीमाणसं गडगंज संख्येनं होती. लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांत तिला चुलीवर बसावं लागलं. म्हणजे तिला कुणी सक्ती केली असं नाही. सासरी गेल्यावर कसं कसं वागलं तर आपल्या माहेरच्या कुळीला बट्टा लागणार नाही याचं दरेक पोरीला जन्मजात मिळणारं मूलभूत प्रशिक्षण तिलाही जन्मापासूनच मिळालेलं होतं. बाईजन्माची वहिवाट म्हणून तिने चुलीवर तीच, धुण्याभांड्यावर तीच, पुन्हा आईसोबत वावरात तीच असा पायंडा ठेवला. सबब आमच्या घरातच नव्हे तर सबंध पाव्हण्यारावळ्यात तिने अत्युकृष्ट अंगापिंडाने मजबूत विनम्र सून अशी दिगंत कीर्ती मिळवली. हे ओझं पुढेही तिने शेवटपर्यंत देहावर आणि देहभानावर अलंकारासारखं मिरवलं. तिला वाचतालिहिता येत होतं पण माहेरच्या पत्रांशिवाय तिने कधी काही वाचलं नाही. लग्नापूर्वी तिने कधी गावही फारसं ओलांडलेलं नव्हतं. सबब माझ्यातिच्या डोक्यातले भुंगे नेहमीच वेगवेगळे असायचे. पण तरीही ती माझ्याहून ज्यास्ती मूलभूत होती. आमच्या संसारातलं घरादाराचं, गणगोताचं बिढार तिनं मानेचा कळस न मोडू देता पेललं. त्याहून थोर म्हणजे तिनं माझं नाव लावणारं मूल आमच्या संसारात प्रसवलं. तिनं जन्म घेतला, तिनं माहेरची कुळी उद्धरली, तिनं माझ्याशी लग्न केलं आणि आमची कुळी उद्धरली. तिनं सृजनाचं जिवंत प्रतिक अशा राना-वावरात पिकं जोपली, तिनं मूलद्रव्यासारखं नितळ असं एक पोर जन्मा घातलं आणि बाईजातीत जन्म घेतल्याचे असले थोर मूलभूत लाख सोहळे भोगून एका संध्याकाळी ती मरून गेली. मी म्हणालो, असशील तेथे सुखात अस, बाये, तू मला नखशिखांत पुरुष बनवलंस. तू आदिमायेइतकीच थोर होतीस.
- आणि एका क्षणी असं जाणवतं की हे आपल्या सभोतीचं काहीही खरं नाहीय. आपल्यासकट. तू बघ, अगदी पृथ्वीपासून तू राहतेस त्या आकाशगंगांपर्यंत कशाचं काहीही खरं नाहीय. हे बाजूचं झाड, तो रस्ता, हा डोंगर, तो ओहळ, अहेवपणी गेलेल्या तुझ्या भाळावर भरवलेल्या मळवटापर्यंत, तुझ्या सोशिक आयुष्यातून बाकी उरलेल्या प्रखर तेजोवलयापर्यंत सगळ्या गोष्टी कधीतरी नामशेष होतील. नामशेष असंसुद्धा म्हणता येत नाहीच. नावांइतकं आभासी तर काहीच नसतं. पण एवढं लक्षात असू दे की हाडांचीसुद्धा माती होते काहीशे किंवा काही लक्ष वर्षांनी. आणि कधीतरी प्रलय होईल तेव्हा मातीही असणार नाही इथं. अंतराळ असेल नसेल; अस्तित्व मात्र नसेलच माझ्यासकट तुझ्या कितव्याही पिढीचं ! जिवंत असेस्तो अंतरातलं काही बोलली नाहीस तू आणि मी म्हणत राहिलो की तेरा कुछ भी कुबूल नहीं है मुझे. मै सिर्फ अपनी सुनाने में यकीं रखता हूं!
जाईचं लग्न इंदूरला आत्याच्या मुलाशीच लावून दिलेलं होतं. तिचा नवरा तिथेच तहसील कचेरीत पेशकार होता. शिवाय गडगंज शेतीवाडी होती. आधीचंच नातं असल्यामुळे जाईला तिथे काहीच अडचण नव्हती. तिला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. एका सुट्टीत इकडे आलेली असताना तिने कबीरला म्हणजे माझ्या मुलाला सुट्टीपुरतं म्हणून इंदूरला नेलं. आणि मागाहून ‘त्याला इथेच शाळेत घालते, तू त्याचा दाखला पाठवून दे. तुझ्याकडं राहून तो तुझ्यासारखाच एकलकोंडा होईल त्यापेक्षा इथे पोराबाळात राहील आणि शिकेल’ अशी पत्रं तिने दोन वेळा टाकली. या भाकड गावात कुणाचाही कधीही पांडूतात्या किंवा सोटम्या होऊ शकतो तेव्हा पोरगा आधीपासूनच बाहेर राहिला तर निदान आपल्यासारखा होणार नाही असं म्हणून मी विचारपूर्वक इथून दाखला काढून त्याला तिकडेच शाळेत घातले. तेव्हा निर्वेधपणे शिकतशिकत इंटरनंतर तो मेडिकलला गेला. शिकून परत आल्यावर त्याने तिकडेच हॉस्पिटल चालू केले आणि आणि जाईनेच त्याचे लग्नही लावून दिले. जाई ही एकंदरीतच अतिशय थोर जिव्हाळा असलेली बहीण होती. तेव्हा लग्नानंतर तो कायमचा तिकडचाच होऊन गेला. मुलगा म्हणून माझा त्याच्यावर आणि बाप म्हणून त्याचा माझ्यावर कितीही जीव असला तरी धागे हळूहळू विरळ होतातच. तो अधूनमधून मला तिकडे बोलावतो. कधी स्वत: इकडे येतो. दरवेळी तो मला तिकडे त्याच्यासोबत राहायचा आग्रह करतो. मी म्हणतो, राहवेल तोवर राहू दे मला सांगवीत. पुढे मी येईनच तुझ्याकडे. मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे वगैरे. पण खरं सांगायचं तर मी त्याच्याकडे जाणार नाही. ही सांगवी मला इथून सोडणार नाही. बाळा, माझ्या व्यथांचे कॉपीराईट्स कुणाला दिले नाहीत मी आजवर. तुझ्या सुखांचे हक्कही तुझ्याकडेच असू देत.
कुणी जोडले तुझ्यामाझ्यातले चिवट धागे? तुटता तुटत नाहीत. झाडाचं सूर्याशी, मुळांचं मातीशी, वावराचं पाटाशी आणि शब्दाचं अर्थाशी, ते, कोण दावेदार तेच तुझ्यामाझ्यातही घडवत जातो ? उन्हं पडलीयेत, पाठ सणाणून तापतेय आणि चिरंतन नदीचा डोह कोरडाठाक आहे. पांडूतात्या, कुठे जाशील आता? "और फिर यूँ हुआ के घड़े का सारा पानी कंकड़ ही पी गए, और कौआ बेचारा प्यासा का प्यासा ही रह गया.." ही कुणाची व्यथा? "सुया घे, पिना घे, दाबन बी घे गंss माssय.." - ही कुणाची माय अशी लेकराला पाठीशी बांधून कुणाच्या भुकेतला घास मागत हिंडतेय असल्या रणरणत्या उन्हात? हा रामा माळ्याचा बैल नुसत्या मुरमाड बांधावर काय बरं खात असेल? इब्राहीमचाचा कालपासून जेवलाच नाही म्हणे. मला मोठ्यानं ओरडावंसं वाटतं. मी ओरडत नाही. मला शब्द फुटत नाहीत. मी म्हणतो, अल्फाज सांस रोके खड़े है कबसे, सुन ले , या तू जान ले ले मेरी.
मग मी म्हणालो की हे असं नसतं. हे जे कथित चिवट धागे असतात असं आपण म्हणतो त्यांनी माणसांना तहहयात बांधता येत नसतं. उदाहरणार्थ मी तुझ्यामागे तुझ्याबद्दल काय बोलेन हे तुलाच काय मलाही सांगता येणार नाही. तुझं माझं सोड; आपण आज असू, उद्या नसू. या इथल्या चिरंतन नदीबद्दल, त्या डोंगराबद्दल, त्या चारचा आकडा करून उडणा-या पाखरांबद्दल, या वाटेबद्दल, या पणजोबांच्या वयाच्या झाडाबद्दल आणि या अवर्षणग्रस्त वावराबद्दल याक्षणी तुला जे वाटतं आहे ते यापूर्वी लक्षावधी वेळा लक्षावधी जणांना वाटून गेलेलं आहे. तुझं-माझं नातं फारतर या क्षणाशी असतं, जो यानंतर कधीच तुझ्या-माझ्या आयुष्यात येत नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण एक स्वतंत्र पायवाट जगत असतो. जी आपल्यालाच मळवावी लागते नेहमी. आणि शेवट काय कसाही कुठूनही होतोच. त्याची वाट पाहण्यात अर्थ नसतो. तुला सांगायची महत्वाची गोष्ट अशी, की, आपण प्रवास करत राहावं. रस्ता आपला नसतो, स्टेशनं, सहप्रवासी; तेही आपले नसतातच. ज्याचीत्याची व्यवधाने ज्याच्यात्याच्या पाठी असतात, आणि ज्याचीत्याची अवधानेही ज्याच्यात्याच्या सोबत असतात. त्याचातुझा, तुझामाझा, माझातुझा आणि तुझात्याचाही सबंध फक्त प्रवासापुरता. एवढं लक्षात घेतलं की तुला तुझा प्रवास निर्लेपपणे करता येईल. लक्षात ठेव, निर्लेप प्रवास हीच इथल्या वास्तव्याची एकमेव फलश्रुती असू शकते. सुरुवात मातीतून आणि शेवट मातीत हा, हाच, एवढाच फक्त, कलशाध्याय असतो. बस्स. शतकांवारी दिवस, महिने, वर्षे इथे काढली आणि जगज्जेतं होऊन वावरलो तरी शेवटी फक्त मातीच उरते हे आपल्या अध्यात्माच्या सगळ्याच प्रवाहांनी सांगून ठेवलंय. आपल्या अस्ताव्यस्त आणि सैरावैरा वाटचालीचा शेवट असा अध्यात्माशी जाऊन भिडतो हे निव्वळनिव्वळ थोर आहे.
आता शेवटी असं झालंय की इथली कुठलीही गोष्ट आपली उरलेली नाहीय. धागे विरले आहेत. वीण उसवली आहे. स्मरणांचं बाष्प होऊ घातलं आहे. आता हे देहामनाश्वासाभोवतालाचं महावस्त्र फिरून आधीसारखं होणं नाही. पांडूतात्या, इथल्या कोवळ्या उन्हात चैतन्य नाही, इथली थंडी आपलीशी नाही, पाऊस फारच परका झालेला, समईतली वात तजेलदार नाही, देवळातली फरशी उबदार नाही, गायीतला देव भाकड झालेला. सोनाराच्या नळीतून वारा जात नाही. कुंभाराचा आवा उध्वस्त झालेला. माझे प्राण माझ्यात उरत नाहीत. क्षणाएवढी कोंडी फोडून दिगंतापार जाण्याच्या वेळा आता कधीही पत्ता शोधत येऊ शकतील हे सगळं खरंच खरं असलं तरी हे अंतिम खरं नाहीच. तेव्हा तू असं समज की मी हे जे सांगतोय तेही खरं नाही आणि तुझ्यासाठीही नाहीच. तू नाहीस आणि मीही नाहीय इथं !
तर उत्तरार्ध हा असा. एवढाच. फक्त. वयानुरूप साहजिक विस्मरणांना भेदून स्मरला तेवढा नि तसा. आणि यात थोर वगैरे काही उदाहरणार्थसुद्धा नाही.
----0----
- बालाजी सुतार.
(पूर्वप्रकाशन- 'साहित्य सूची' दिवाळी अंक- 2014.)
(इ.स. 2014 मध्ये 'साहित्य सूची' आणि 'राजहंस प्रकाशन' यांच्या वतीने आयोजित 'सीक्वेल-कथा' लेखन स्पर्धेत ही 'उत्तरार्ध' या शीर्षकाची कथा 'प्रथम पारितोषिक विजेती' ठरली होती. ही कथा 'ज्ञानपीठ'प्राप्त मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' या कादंबरीवर आधारलेली आहे.)
(सर्व हक्क: बालाजी सुतार.)
लय भारी
ReplyDeleteअफाट..अप्रतिम..हुबेहूब वगैरे..
ReplyDeleteपाच सहा वर्षे वाट पहावी लागली.हे ही थोरच.
एकूण काय तर..पांडुरंग सांगविकर चिरंतन आहे.पिढयानपिढया छळतो आहे..ईतकी वर्षे ऊलटूनही छातीत सळसळतो आहे.. अर्थात वर्षे नीटच असतात.त्यामुळे ईतकी तितकी हे ही हिशेब खोटेच असतात.म्हणजे बरोबरच.
लेख भयंकर आवडला.
तुम्ही प्रतिसांगवीकर आहात.
हे मात्र अतिच झालं...
God bless you बासूदा
हा अनुभव, ती पत्रं आणि एकूणच उत्तरार्धाचा प्रवास फारच थोर आहे,बासू दा.
ReplyDeleteमाझ्या व्यथांचे काॅपी राईट्स मी आजवर दिले नाहीत कुणाला. तुझ्या सुखांचे हक्कही तुझ्याकडेच राहू देत.
ही जगण्यातील आर्तता आणि...
निर्लेप प्रवास हीच इथल्या वास्तव्याची एकमेव फलश्रुती असू शकते. सुरवात मातीतून आणि शेवट मातीत हा,हाच. एव्हढाच फक्त कलशाध्याय असू शकतो.
हेच त्रिकालाबाधित सत्य.
रा. रा. नेमाडेदादांच्या पांडूरंग सांगवीकरला चिरजिंव केलत तुम्ही. इतके दिवस हे मोठं यश आणि खुद्द पांडुरंग सांगविकरच्या जन्मदात्या कौतुक आपण थोपवून ठेवलं. हे ही थोरच.
तुमचं मनापासून अभिनंदन!
निव्वळ अप्रतिम!
ReplyDeleteबासुदा, तुम्ही खरच कोसलाच्या उत्तरार्धाला न्याय दिलाय हे दस्तुरखुद्द नेमाडेंनीच काबुल केलंय त्यामुळं आम्ही काय लिहावं तरीपण राहुन हा अट्टाहास. "बाळा, माझ्या व्यथांचे कॉपीराईट्स कुणाला दिले नाहीत मी आजवर. तुझ्या सुखांचे हक्कही तुझ्याकडेच असू देत". हे वाक्य अस्वस्थ करतय राहुन राहुन.
जबरदस्त.. कोसला तंतोतंत भिनली आहे तुमच्या आत..
ReplyDeleteसूंदर
ReplyDeleteब्लॉग वर आले आता कधीही वाचता येत.
अभिनंदन!
इम्पॅक्ट तोच, कल परवाच कोसलाचं दुसरं पारायण झालं. आणि आता हा उत्तररार्ध. कोसला वाचून संपली तरी काही तरी राहून गेलाय असं सारखं वाटत होतं. कोसला अपूर्ण वाटत होती हा उत्तरार्ध वाचून आता ती पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.
ReplyDeleteमस्त!
ReplyDeleteबासुदा कसलं सुंदर लिहीलं आहे ...❤️❤️❤️
ReplyDeleteपरत कोसला वाचावी लागणार!!
ReplyDeleteअप्रतिम.. ओघवतं 🙏🙏👏👏
नेमाडे सरांचा अभिप्राय किती तंतोतंत वगैरे आहे हे कथा प्रत्यक्ष वाचूनच समजलं. बालाजी तू थोर आहेस.
ReplyDeleteबासुदा,तुम्ही खरंच थोर लिहलं आहे !👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम! उत्तरार्ध समजावा म्हणून कोसला ची उजळणी केली एकदा.
ReplyDelete'कोसला'हून अधिक पोएटिक आहे.
ReplyDelete