Posts

बोलबच्चन ते अबोलबच्चन

शाहरुख खानची एक मुलाखत पाहत होतो. त्यात तो म्हणाला, मुझे कभी भी नही लगा था की मै स्टार बन जाउंगा. मुझे लगता था की मेरी सूरत हीरो जैसी नही है. लेकीन मै खुशकिस्मत था के जब मै फिल्मो मे आया तो जमाना बदल रहा था और बदलते जमाने की मांग शाहरुख खान थी. ‘देखणा चेहरा’ हेच एकेकाळी चित्रपटात हीरोगिरी करण्यासाठीचं महत्वाचं भांडवल मानलं जाई. शाहरुखकडे ते नव्हतं. तरीही तो मागच्या पंचवीस वर्षांतला सर्वात मोठा यशस्वी स्टार झाला. हे स्टारपद त्याला मिळण्यामागचं महत्वाचं कारण होतं – बदलत असलेला काळ. ‘शक्तीमान नेता आणि सुपरस्टार अभिनेता हे काळाचं अपत्य असतं’ असं एक सर्वमान्य विधान आहे. प्रत्येक बदलत्या काळाचं स्वत:चं असं एक ‘स्टेटमेंट’ असतं. हे ‘स्टेटमेंट’ ज्यांना सशक्तपणे करता येतं, ती माणसे पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी किंवा अमिताभ बच्चन होतात. हिंदी चित्रपटाच्या क्षेत्रात असं ‘सोशिओ-पोलिटिकल स्टेटमेंट’ सर्वाधिक प्रभावीपणे करून दाखवणारं कदाचित एकच नाव असू शकेल - अमिताभ बच्चन! शहेनशहा. स्टार ऑफ द मिलेनिअम. जगातलं कुठलंही ‘सुपरलेटिव्ह’ बिरूद आणा. अमिताभ बच्चनला ते सार्थपणेच शोभून दिसतं.  ...

पाचोळा: समकालीनत्वाची पन्नास वर्षे

मी सहावीसातवीला असेन शाळेत. आमच्या चिमूटभर गावात शेजारच्या गावाहून एक टेलर आला. त्याआधी आमच्या गावात शिंपी होतेच, अर्थात. पण ते फक्त बाप्यांचं खमीस किंवा बायकांच्या चोळ्या किंवा पोराटोरांच्या आडमाप चड्ड्या वगैरे शिवत असत.  त्यांची दुकानं म्हणजे त्यांच्या घरातल्या ढाळजेत किंवा पुढच्या टीचभर ओट्यावर छपराचा आडोसा करून तिथे मांडलेलं शिवणयंत्र. कापड मोजायची टेपसुद्धा नसे त्यांच्याकडे. वीत–टीच, बोटे-कांडे अशा मापाने जुन्या कपड्यावरून अदमासाने बेतून ते खमीस शिवून द्यायचे. पोरांची चड्ड्यासदरे तर नुसत्या नजरेनेच माप घेऊन शिवली जात. ‘फिटिंगचे कपडे’ वगैरे काही मामलाच नसे. साधारण एकोणीसशे पंचाऐंशी-शहाऐंशीच्या दरम्यानची ही गोष्ट. गावाला शहरी वारा नव्हता अजिबात. मला आठवतं, गावातल्या कुठल्याही दुकानावर दुकानाच्या नावाचा बोर्ड नव्हता. दोनचार बारकी किराणा दुकाने होती. त्यांना फलाण्या मारवाड्याचं दुकान, बिस्तान्या वाण्याचं दुकान असं थेट मालकाच्या नावाने ओळखलं जायचं.  एकुणातच कृष्णधवल टीव्हीतल्या चित्रासारखा बिनमोहक काळ होता तो. अशात, बाहेरगावाहून आलेला तो टेलर स्वत:सोबत अनेक नव्या गोष्टी घेऊन आ...

पळसाचं चौथं पान: नागराज मंजुळे

१. कविता लिहिणं एकुणात कितपत परिणामकारक असतं? कवीसाठी किंवा एकूणच समाजासाठी? कवी कविता लिहितो ती नेमकी कुणासाठी, कशासाठी? कसल्या का स्वरुपात असेना; माणसाला बोलावं वाटत असतं, हे खरं आहे. पण नक्की काय घडतं तेव्हा माणसाला वाटतं की आता आपण कागदावर लेखणी झिजवून कविता लिहायला हवी? हा किंवा असलाच काही प्रश्न कवींना विचारला तर प्रत्येकाकडून वेगवेगळी असंख्य कारणं समोर येतील. कुणी स्वत:तल्या आनंदाला वाट करून देण्यासाठी लिहित असतील, कुणी स्वत:त दाटून राहिलेल्या साकळल्या वेदनेचा दुखरा प्रवाह वाहता करण्यासाठी. काहींची तर अशीही समजूत असते की यमके जुळवत जुळवत करायची लेखी गंमत म्हणजेच कविता. जो तो आपापल्या त-हेने आपापल्या कविता कागदावर उतरवत असतो. कुणी-कुणी कविता लिहिणं हाच जीवनभराचा ‘धंदा’ असल्यासारखं कविता लिहित असतात आणि कुणी कुणी जीवनाबद्दल बोलण्यासाठी कवितेचा आधार घेतात. कुणाचं जीवन हीच एक कविता असते. कुणा-कुणाचं मात्र जरासं वेगळं असतं.  ओठांत कुठवर चिरडाव्यात  अंतरीच्या हाका  कवितेच्या सुईने किती  घालावा टाका?        जखम चिघळते  घातलेल्याच टाक्यातून...

अवकाळाचा अभिलेख

“Power will go to the hands of ras¬cals, rogues, free¬boot¬ers; all Indian lead¬ers will be of low cal¬i¬ber and men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight amongst them¬selves for power and India will be lost in polit¬i¬cal squabbles. A day would come when even air and water would be taxed in India.” - Winston Churchill  “पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा येतात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे योग्य ठरेल.” - पं. जवाहरलाल नेहरू.  "गोरं घालविलं अन काळं आणलं. आमचं चुकलंच जरा! खुर्च्याच जाळायला पाहिजे होत्या त्या, मग खरं स्वातंत्र...

सातपाटील : काळाची गोष्ट

'ज्याने त्याने आपला आपला वासोटा आणि कासोटा जिंकावा'. (सातपाटील कुलवृत्तांत. पृ.क्र. ६८१)  'वासोटा' हे महाराष्ट्रातल्या एका किल्ल्याचं नाव आहे, त्याचा कदाचित हा संदर्भ असेल. ज्याने त्याने आपापल्या आयुष्यात किल्यासारखं भव्य अवघड असं काही जिंकावं असा भावार्थ. आणि कासोटा जिंकावा. 'कासोटा' म्हणजे बाईच्या लुगड्याचा काष्टा, बहुधा. 'कासोटा जिंकणं' म्हणजे 'आपल्या आपल्या प्रेमाची बाई जिंकणं' हेसुद्धा किल्ला जिंकण्यासारखंच भव्य अवघड काम. वासोटा जिंकण्याइतकी धमक तुमच्यात असेल तर तुम्ही कासोटाही जिंकत राहता. म्हणजे साधा मेंढपाळ शिरपती असाल तरी तुम्ही ब्राह्मण एडके देशमुखाच्या स्त्रीला जिंकता, साहेबराव असाल तर पठाण आर्यानाबाईला जिंकता, दसरत असाल तर अफगाणी आफियाला, पिराजी असाल तर उल्फी कोल्हाटणीला, शंभूराव असाल तर देऊबाईला. माणूस जे जे काही करतो ते ते सत्ता, संपत्तीसाठी आणि अतिशय अंतिमत: सुंदरीच्या प्राप्तीसाठीच करतो, असं एरवी फ्राईड वगैरे लोकांनीही लिहून ठेवलेलं आहेच. फारतर असं म्हणता येईल की या तिन्ही गोष्टी एकमेकांचा अनुषंग म्हणूनच येतात. दुबळ्या, म्हणजे वास...