डॉ. भालचंद्र नेमाडे आणि मी : एक प्रेमप्रकरण.
मनी मेली. “ तिच्याबरोबरच तिचं इवलंसं गर्भाशय गेलं. तिनं एक मोठ्ठीच खानेसुमारीची ओळ वाचवली. ” माणूस हा खानेसुमारीच्या उतरत्या रचनेला फुटलेल्या फांद्यांना लटकवलेला एक रकाना असतो फक्त. पुढच्या रकान्यांना जन्म न देता तो मरून जातो तेव्हा बाकी काय उरतं ? काही नाही. काहीच नाही. पुढच्या फांद्या नाहीत, फांद्यांना फुलं-फळं नाहीत, म्हणजे पुढची बीजं, पुढचे जन्म, पुढचे रकाने नाहीत. पुढे पार नसतो, तीर नसतो , उरलाच तर निर्वातातला काजळदाट काळोख फक्त उरत असणार. मला अजून आठवतं, ‘तिच्याबरोबर तिचं इवलंसं गर्भाशय गेलं.’ ही ओळ वाचल्यावर अतिशय सैरभैर होऊन मी ‘कोसला’ मिटून ठेवली होती. बी.ए.च्या पहिल्या - दुस-या वर्षात असेन तेव्हा ‘कोसला’ माझ्या हाती आली. अठरा एकोणीस वर्षे वय होतं माझं. पुस्तकातून मेलेली अनेक माणसं मी त्यापूर्वी वाचलेली होती. प्रत्यक्षातही कुणी म्हातारा, कुणी ऐन कर्तासवरता, कुणी लेकुरवाळी, क्वचित कुणी लहान मूलही मेलेलं मी ऐकलं, पाहिलेलं होतं. पाणी भरायला गेलेली असताना विहिरीत बुडून मरून गेलेल्या एका मित्राच्या छोट्या बहिणीचं पाण्यावर तरंगणारं शव आणि बारावीला असताना आमच्या ...