अघळपघळ संमेलनात लैच प्रतिभावंत बेचाळीस कवी...
कलाप्रिय महाराष्ट्राच्या महन्मंगल भूमीत सिनेमा-नाटकांच्याखालोखाल लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे कविसंमेलने. पैकी नाटके आणि सिनेमे हल्ली डायरेक्ट टू होम शैलीत घरपोच होत असल्याने औटडोअर मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी जायचे म्हणजे कविसंमेलनाला जायचे अशीच महाराष्ट्रभर रसिकांची कल्पना झालेली असते. खरंतर औटडोअर मनोरंजनाच्या क्षेत्रात सगळ्यांत पहिला नंबर निवडणुकीतल्या भाषणांचा असतो, मात्र हल्ली एकमेकांची सरकारे ‘पाडणे’ वगैरे दहाबारा वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेले खेळ कॉंग्रेस सरकारच्या - नवी पिढी ज्या चिवटपणाने फेसबुकला अष्टौप्रहर चिकटून बसते तसल्या- सत्तेला घनदाट चिकटपणे चिटकून राहण्याच्या गुणधर्मामुळे फारसे घडताना दिसत नाहीत. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभांच्या गंमतीदार निवडणुका लैच लै तर चार-पाच वर्षांत एखाद-दुस-याच वेळी ‘लागतात’. स्थानिक नगरपालिकांच्या किंवा ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही विनोदी असतातच पण तिथल्या विनोदाला उघडपणे हसायचे म्हणजे हसणा-यावर दणकावून मार खायचीच पाळी असते. सबब सर्वाधिक निरुपद्रवी औटडोअर मनोरंजनासाठी लोकांना कविसंमेलनावरच अवलंबून राहावे लागते. सांप्...