गांधारी: गावाच्या उध्वस्तीकरणाची गोष्ट.
गोष्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या मधून कुठून तरी चालू होते. भारत स्वतंत्र होऊन काही महिने झाले आहेत, असं आपण म्हणू शकतो, पण हे स्वातंत्र्य सगळ्या भारताच्या पदरात आलेलं नाहीय अजून. उदाहरणार्थ हैदराबादची निझामी अजून संपलेली नाही. दिवा विझण्याआधी भडकतो, तसलं काहीतरी चालू आहे अजून निझामीमध्ये. लोक भेदरलेले आहेत गावोगावचे. कुठून कधी रझाकारी टोळ्या येतील आणि गाव घरदार लुटून घेतील, बाप्यांना जिवे मारतील, बायांना बाटवतील, याचा अजिबात नेम नाही. लोक धास्तावून रानाशेतातसुद्धा जाईनासे झाले आहेत. घरदार-पैसाअडका लुटला जात असेल, तरी एकापरीने कुणी सहन करील. पण तरण्याबांड बायांना उचलून नेतात. नागडं करून अब्रू लुटतात. कुठल्याशा जुम्मा मशिदीसमोर कितीतरी लोकांना छळ करून खलास करतात. अहमद घाउस नावाचा कुणी ठाणेदार आहे अजिंठ्याला, त्याने तिथे पळवून आणलेल्या बायकांचा जनानखानाच उघडलेला आहे. असलं काही काही कानांवर येत असेल तर माणसांनी धास्तावून जाऊ नये, तर काय व्हावं? अजिंठ्याच्या डोंगरातलं दोन अडीच हजार वस्तीचं एक चिमूटभर गाव आहे. म्हणजे फारतर शेचारशे घरांचं. पुरातन वहिवाटीप्रमाणे शेती कसून उदरनिर्वाह करणारं गाव.